Pune News : राज्यातील राजकारण खालच्या स्थरावर गेले आहे. गेल्या काही दिवसातील घटना पाहता महाराष्ट्राचा बिहार अथवा उत्तरप्रदेश झाला असेल अशी कोण टीका करीत असेल तर चुकीची असून येत्या काळात बिहार अथवा उत्तरप्रदेशवाले आपला महाराष्ट्र्र होऊ देऊ नका, असा सल्ला देत आहेत. ठाणे, दहिसरमधील गोळीबाराच्या घटना पाहता राज्यात होणारी यंदाची निवडणूक ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्तरंजित असणार, अशा शब्दांत पत्रकार निखिल वागळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर पुण्यात सडकून टीका केली.
पुण्यात शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी 'निर्भय बनो सभेचे आयोजन केले होते. यावेळी मुक्त पत्रकार निखिल वागळे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. या सभेला येत असताना भाजपकडून (Bjp) या सभेला जोरदार विरोध केला. खंडूजी बाबा चौक येथे निखिल वागळे यांच्या गाडीवर अंडी आणि दगडफेक केली .
दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत "लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा" या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात पत्रकार वागळे, ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
गाडीवर हल्ला झाल्यानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहे. कार्यक्रमस्थळी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्यात स्वागत केले. निखिल वागळे यांची मंचावर एन्ट्री होताच फुले शाहू आंबेडकरांच्या गगनभेदी घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले होते. काहीही होऊ द्यात आपण सभा घेऊ, असा निर्धार वागळे यांनी बोलून दाखवल्यानंतर जमलेल्या गर्दीने घोषणा देऊन वागळे यांना प्रतिसाद दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निखिल वागळे भाषण करायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर निखिल वागळे आता जिवंत झाल्यासारखं वाटतंय. मी धक्क्यात होतो, पण आता मी घोषणा झाल्या तेव्हा नॉर्मल झालो. जेव्हा काचा फुटल्या, गाडीच्या मागच्या काचा फुटल्या तेव्हा असीमने माझ्या डोक्याला हात लावला. श्रेया फ्रंट सीटला बसली होती. तिचं आम्ही डोकं खाली केलं म्हणून ती वाचली. जोपर्यंत आमची लोकं वाचतील तोपर्यंत तुमचं काही खरं नाही”, असं मोठं वक्तव्य वागळे यांनी केले.
“हे खरंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे. पण या शहराचं गेल्या 100 वर्षांपासून असा इतिहास आहे. कलंक तर लावलाच आहे, या शहरात 1942 मध्ये आचार्य अत्रे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता, हे लक्षात ठेवा. त्यावेळी आचार्य अत्रे असे म्हणाले होते की, आम्हाला मारणारे मेले. आम्ही जिवंत आहोत. मी एवढंच म्हणतो. तेही जिवंत राहो आणि आम्हीसुद्धा जिवंत राहो. या सर्व हल्लेखोरांना मी माफ केले, असे निखिल वागळे म्हणाले.
“हा सातवा-आठवा हल्ला आहे. माझ्यावर 1979 साली पहिला हल्ला झाला. तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती. मागून हल्ला केला होता. भेकड लोकांचा हल्ला”, अशी टीका निखिल वागळे यांनी केली. यावेळी निखिल वागळे यांनी भाषणातून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.