
Pune News : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव वाढला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं गळफास घेत आपलं जीवन संपवलं होतं. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हगवणे कुटुंबावर असून याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हगवणे कुटुंबातील जणांना अटक करण्यात आली आहे.त्यातच दुसरीकडे हगवणे यांचे नातेवाईक असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर (Jalinder Supekar) यांना राज्य सरकारनं दुसरा मोठा दणका दिला आहे.
वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेचा मामा असलेले कारागृह उपमहानिरीक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार राज्य सरकारनं गुरुवारी (ता.29) काढून घेत पहिला झटका दिला होता. आता सरकारनं त्यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारनं शुक्रवारी(ता.30)जारी केले आहेत. हा सुपेकर यांच्यासाठी दुसरा मोठा दणका मानला जात आहे.
जालिंदर सुपेकर यांच्याकडे कारागृह उपमहानिरीक्षक या पदाचा नाशिक,छत्रपती संभाजीनगर,नागपूर येथील या तीन ठिकाणच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आला आहे.तशा स्वरूपाचे लेखी आदेश दिले आहेत. कारागृह उप महानिरीक्षक हे महत्त्वाचे व जबाबदारीचे पद आहे.सुपेकर यांच्याकडे रिक्त असलेल्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर,नागपूर येथील कारागृह उप महानिरीक्षक या पदाचा कार्यभार होता.
जालिंदर सुपेकर हे येरवडा जेलचे महानिरीक्षक असून त्यांच्यावर तीन ठिकाणची अतिरिक्त जबाबदारी होती. आता त्यांच्याकडे असलेली ती जबाबदारी काढून घेण्यात आली. वैष्णवी हगवणे हिचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली. यादरम्यान अजित पवारांनी थेट फोन सुपेकरांना केला होता. वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. हगवणे कुटुंबियांच्या वकिलाने तर वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला होता.
हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर झाले त्यावेळी त्यांचे मामा जालिंदर सुपेकर हे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता. कारण त्यावेळी ठोस असं काही कारण नव्हतं. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस शहर दलामध्ये शस्त्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यावरती जालिंदर सुपेकर यांची सही देखील आहे. या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली होती अशी माहिती समोर आली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांकडे हगवणे कुटुंबानं 2022 मध्ये बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलीसांनी दोघांचेही अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर दोघांनी ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते दिले. त्यासाठी ते भाड्याने राहत असल्याचे कागदपत्रे दाखवण्यासाठी भाडेकरार तयार केला.
शशांकने वारजेला तर सुशीलने कोथरुडला रहात असल्याचा पत्ता सादर केला. त्याआधारे पुणे पोलीसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी करण्यात आली. याप्रकरणी दोघां भावांवरती गुन्हा दाखल आहे, मात्र, आता या प्रकरणामध्ये हगवणेंचा पाहुणा आणि शशांक, सुशील यांचा मामा जालिंदर सुपेकर यांचं नाव देखील समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.