भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण? : वासुदेव काळे की धर्मेंद्र खांडरे

भाजपचा नवा जिल्हाध्यक्ष कोण? : वासुदेव काळे की धर्मेंद्र खांडरे
Published on: 
Updated on: 

पुणे : पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष बाळा भेगडे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या जागी नवा जिल्हाध्यक्ष कोण होणार याची चर्चा भाजपाच्या जिल्हा वर्तुळात रंगू लागली आहे. वासुदेव काळे, ऍड. धमेंद्र खांडरे, गणेश भेगडे तसेच रोहिदास उंद्रे यांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट यांची पसंती कुणाला आहे. यावरच सारे काही अवलंबून असल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

बाळा भेगडे विद्यमान अध्यक्ष आहेत. तीन वर्षापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून भेगडे यांची निवड झाली. त्या वेळीदेखील जिल्ह्यातून अन्य काहीजण इच्छुक होते. मात्र, आमदारांना जिल्हाध्यक्ष करण्याच्या पक्षाच्या धोरणात्मक निर्णयानुसार त्यावेळी भेगडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

मावळमधून बाळा भेगडे, शिरूरमधून बाबूराव पाचर्णे व दौंडमधून भाजपाच्या पाठिंब्यावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर राहुल कुल आमदार आहेत. त्यांच्याशिवाय भाजपाचा जिल्ह्यात आमदार नाही. पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आता शिवसेनेत आलेले जुन्नरचे आमदार शरद सोनवणे तसेच भोरमधून निवडून आलेले कॉंग्रेसचे संग्राम थोपटे वगळता जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या पार्श्‍वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नवीन जिल्हाध्यक्ष लवकर जाहीर करावा, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत.

जिल्हाध्यक्ष असलेल्या बाळा भेगडे यांना राज्यमंत्री करण्यात आल्याने मावळमधून गणेश भेगडे यांना संधी मिळण्याची शक्‍यता कमी आहे. वासुदेव काळे हे पक्षाचे एकनिष्ठ व जुने कार्यकर्ते आहेत. मात्र, यापूर्वी ते दोनदा जिल्हाध्यक्ष होते. पक्षाने त्यांना दौंडमधून दोन वेळा आमदारकीची उमेदवारी दिली होती.

दौंड तालुक्‍यात नामदेव ताकवणे, वासुदेव काळे व विद्यमान सरचिटणीस तानाजी दिवेकर असे तिहेरी नेतृत्व आहे. ऍड. धर्मेंद्र खांडरे 1990 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत. गेल्या काही वर्षापासून त्यांच्याकडे भाजपाची संघटनात्मक जबाबदारी आहे. सध्या त्यांच्याकडे जिल्हा संपर्कप्रमुख अशी जबाबदारी आहे. ऍड. खांडरे शिरूरचे आहेत. माजी आमदार बाबूराव दौंडकर यांच्यानंतर शिरूरला अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. हवेलीमधील कार्यकर्ते व बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे यांचेदेखील नाव चर्चेत आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.