Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आता हालचालींना वेग दिला आहे. सर्वच पक्ष राज्यभरात दौरे काढत आहेत. जास्तीत जास्त मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा यामागे हेतू आहे. तर जास्तीत जास्त जागा आपली पदरी पाडून घेण्यासाठी त्यांनी रणनिती आखण्यासही सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेना या राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षातील फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने, असली कोण आणि नकली कोण याचा फैसला या निवडणूक निकालातूनही एकप्रकारे होणार आहे. त्यामुळेच यंदाची निवडणूक ही अधिकच रंगतदा असणार आहे.
या पार्श्वूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) हे उद्यापासून मराठवड्याची राजधानी असलेल्या आणि एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.
विशेष म्हणजे नुकत्याच पार पडेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्याकडून पराभूत व्हावं लागलेलं आहे. मराठवाड्यात महायुतीने जिंकलेली एवढी एकमात्र जागा आहे. बाकी अन्य ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
आता संभाजीनगरचं खासदार पद जरी हातून गेलं तरी देखील जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर आपल्या पक्षाच पकड ठेवण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रय़त्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बघितलं जात आहे. आदित्य ठाकरे यांचा उद्यापासून दोन दिवस छत्रपती संभाजीनगर दौरा आहे.
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या चार आमदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत. संभाजीनगर मधील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र स्वाभिमान सभा' होणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat), अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आदित्य ठाकरे हे 25 ऑगस्ट रोजी सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दुपारी दोन वाजता तर छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजता सभा घेणार आहेत.
तसेच, 26 ऑगस्टला सकाळी दहा वाजता पैठण विधानसभा मतदारसंघ तर दुपारी सव्वा बारा वाजता गंगापूर, दुपारी दोन वाजता वैजापूर आणि साडेचार वाजता कन्नड विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. आता आदित्य ठाकरे यांच्या या सभांचा आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कसा फायदा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.