Indira Gandhi and Dr. Shivajirao Patil Nilangekar
Indira Gandhi and Dr. Shivajirao Patil NilangekarSarkarnama

Shivajirao Patil Nilangekar Birth Anniversary : निलंगेकरांचा आग्रह अन् इंदिरा गांधींनी नेसली इरकल साडी..!

Dr. Shivajirao Patil Nilangekar : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 9 फेब्रुवारी हा जन्मदिवस. यानिमित्त जुन्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ म्हणून ओळखले जायचे. बॅ. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना डॉ. निलंगेकर हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. महाराष्ट्र विधान भवनाचे रखडलेले काम त्यांच्या नेतृत्वात पूर्ण झाले अन् त्यांनी 1981 मध्ये झालेल्या या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निमंत्रण दिले. इंदिरा गांधी यांनी ते स्वीकारले आणि महाराष्ट्राची ओळख असलेली 'इरकल' साडी परिधान करून त्यांनी विधान भवनाच्या इमारतीचे उद्घाटन केले. निलंगेकर हे गांधी घराण्यासोबत एकनिष्ठ असल्यानेच हे शक्य झाले होते. Shivajirao Patil Nilangekar Birth Anniversary

1962 ते 2009 अशी तब्बल सहा दशके माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Dr. Shivajirao Patil Nilangekar) यांची त्यांच्या निलंगा मतदारसंघासह लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड होती. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ नेतृत्व म्हणून आजही त्यांच्या नावाचा उल्लेख महाराष्ट्रभर (Maharashtra) केला जातो. आज म्हणजे 9 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्याकडे पाटबंधारे खाते असताना राज्यात अनेक मोठ्या सिंचन प्रकल्पांची उभारणी झाली. कायम दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला मराठवाडा व विदर्भातील मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे तेथे सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या.

Indira Gandhi and Dr. Shivajirao Patil Nilangekar
CM Eknath Shinde Birthday : राजकारण विसरून तांबड्या मातीत घाम गाळणारा मुख्यमंत्री...

1974 नंतर महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) पक्षात दोन गट निर्माण झाले होते. एक वसंतदादा पाटील यांचा, तर दुसरा शंकरराव चव्हाण यांचा. त्यावेळच्या उस्मानाबाद (आताचे धाराशिव) जिल्ह्यात या दोन्ही गटांचे नेते होते. शंकरराव चव्हाण यांच्या गटात विलासराव देशमुख, तर वसंतदादांच्या गटात शिवाजीराव पाटील निलंगेकर अशी विभागणी होती. इंदिरा गांधी (Indira Gandhi) सत्तेच्या बाहेर होत्या त्या वेळी 1978 मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. पुलोद आघाडी स्थापन झाली, बरखास्त झाली, अनेकांचे पद गेले. महाराष्ट्रात मोठी उलथापालथ झाली. काही मातब्बर नेते काँग्रेसच्या बाहेर गेले. निलंगेकर मात्र गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशी झाली जडणघडण...

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे पाच महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. त्यांच्या मातोश्री वत्सलाबाई यांनी मोठ्या जिद्दीने त्यांना शिक्षणाचे धडे देत त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले. डॉ. निलंगेकरांचा जन्म 9 फेब्रुवारी 1931 रोजी झाला. तो काळ तसा सामाजिक, राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल व तितकाच संवेदनशील होता. एका बाजूला ब्रिटिशांचे साम्राज्य तर दुसऱ्या बाजूला हैदराबादच्या निजामशाहीची दडपशाही, अशा प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मातोश्रींनी त्यांची सकारात्मक पद्धतीने जडणघडण केली.

स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांना शासनाने गौरवले असले तरी त्यांनी कधीही त्यासाठी मिळणारे मानधन स्वीकारले नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निलंगा येथे वकिली व्यवसाय सुरू केला. त्यातच आर्य समाजाच्या विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. निलंगा येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निजाम राजवट असतानाही त्यांना 1945- 46 मध्ये पुढील शिक्षणासाठी गुलबर्ग्याला (आताचे कलबुरगी) पाठवण्यात आले. तेथील नूतन विद्यालयामध्ये शिक्षण सुरू असताना संघटनकौशल्य, संयम, शांत वृत्ती, चिकित्सक दृष्टिकोन आदी गुणांमुळे ते शिक्षकांमध्ये प्रिय झाले होते.

एक जमीनदार शेतकरी अशी त्यांच्या वडिलांची ओळख होती. त्या काळात दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे ते घोड्यावर बसून गुलबर्ग्यावरून गावाकडे यायचे. त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण करून कायद्याचे (एलएलबी) शिक्षणही पूर्ण केले होते. 1948 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झालेली होती. 17 ऑक्टोबर 1948 रोजी दादरला महाराष्ट्राचे अधिवेशन होते. या अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. काँग्रेस पक्षाचे विद्यार्थिदशेपासून निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आजही महाराष्ट्राला परिचित आहे.

Indira Gandhi and Dr. Shivajirao Patil Nilangekar
CM Eknath Shinde Birthday : मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना कुटुंबीयांचीही काळजी घेणारे एकनाथ शिंदे!

राजकीय वाटचाल...

शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपतराव सोळुंके यांच्याविरुद्ध 1952 मध्ये त्यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. 1962 नंतर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून निलंगा विधानसभा मतदारसंघावर त्यांनी आपली पकड मजबूत ठेवली. त्यांचे इंदिरा गांधी यांच्याशी अतिशय निकटचे संबंध होते. काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवात ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. गांधी घराण्याशी निकटचे संबंध असल्यामुळे मंत्रिमंडळात त्यांची उपमंत्री म्हणून वर्णी लागली. नंतर ते राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व मुख्यमंत्रीही बनले. मुख्यमंत्री असताना मराठवाडा, विदर्भातील विकासकामांवर लक्ष केंद्रित केले.

औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) येथे जवळपास चाळीस एकरांत विमानतळाची उभारणी त्यांच्या काळात झाली. मराठवाड्यासाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ त्यांनीच मंजूर करून घेतले. लातूर व जालना जिल्ह्याची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री बॕ. ए.आर. अंतुले यांच्या काळात झाली. यासाठी निलंगेकरांनी पाठपुरावा केला होता. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी भीमा नदीवरील उजनी येथे मोठ्या प्रकल्पाची उभारणी केली. पुणे जिल्ह्यातील डिंभे प्रकल्प, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील मध्यम प्रकल्प, तेरणा नदीवरील लोअर तेरणा प्रकल्प, विदर्भात अप्पर वर्धा धरण, लातूर बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा नदीवर धनेगाव येथे धरण, तेरणा व मांजरा नदीवर अनेक ठिकाणी बॅरेजेस अशा अनेक सिंचनाच्या योजना त्यांनी पाटबंधारे मंत्री असताना पूर्ण केल्या.  

लोअर तेरणा प्रकल्पासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा द्यावा लागला होता. निलंगा विधानसभा मतदारसंघात अनेक लहान, मोठे प्रकल्प त्यांनी उभे करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न केला. मसलगा मध्यम प्रकल्प, बडूर मध्यम प्रकल्पासह विविध लघुप्रकल्प, मांजरा नदीवरील अनेक बॅरेजेस हे त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आजही देतात.

इंदिरा गांधींना आणण्याची जबाबदारी...

बॅ. अंतुले व निलंगेकर यांचे अतिशय स्नेहाचे संबंध होते. विधान भवनाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी येतील की नाही, अशी शंका अंतुलेंना होती. त्यांना आणण्याची जबाबदारी अंतुलेंनी निलंगेकरांवर सोपवली होती. निलंगेकरांनी दिल्लीला जाऊन इंदिरा गांधीची भेट घेतली उद्घाटन करण्यासाठी येणे किती महतत्त्वाचे आहे, हे त्यांना सांगितले. इंदिरा गांधी यांनीही नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून महाराष्ट्र विधान भवनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारले. इरकल साडी परिधान करून उद्घाटन करण्याची विनंती निलंगेकरांनी इंदिरा गांधी यांना केली. त्यांनी स्मितहास्य करून निलंगेकरांची मागणी मान्य केली होती.

R

Indira Gandhi and Dr. Shivajirao Patil Nilangekar
Eknath Shinde Birthday: ठाणेकरांचे 'भाई' बनले राज्याचे मुख्यमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com