Congress News : सिद्धरामय्यांना 'मास लीडर' बनवणारा 'अहिंदा' पॅटर्न' : काँग्रेसमध्ये एन्ट्री घेताच खर्गे-शिवकुमारांनाही दिला होता धोबीपछाड

Congress News : कर्नाटकच्या राजकारणातील ‘अहिंदा’ समीकरणाने सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाला मजबूत पाया दिला.
Siddaramaiah record
Siddaramaiah recordSarkarnama
Published on
Updated on

Congress News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज (गुरुवारी) दुपारी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर डी.के. शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत. दोन दिवसांमध्ये त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या घडामोडींनंतर शिवकुमार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण त्याचवेळी सिद्धरामय्या यांच्यासारखा 'मास लीडर' सत्तेतून बाजूला होत असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. खास करून 'अहिंदा' समाज ही त्यांची मतपेढी नाराज असल्याची चर्चा आहे.

'अहिंदा' हे कर्नाटकच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी आणि गेम-चेंजर सोशल इंजिनिअरिंग समीकरण आहे. सिद्धरामय्या यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा आणि सत्तेचा पाया याच समीकरणावर उभा राहिला आहे. या संकल्पनेची मूळ सुरुवात १९७० च्या दशकात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांनी केली होती, पण त्याला आधुनिक काळात एक आक्रमक राजकीय ब्रँड बनवण्याचे काम सिद्धरामय्या यांनी केले.

सर्वात आधी 'अहिंदा' म्हणजे काय? हे समजून घेऊ.

'अहिंदा' हा कन्नड भाषेतील एक संक्षिप्त शब्द आहे.

  • अ (Alpasankhyataru) : अल्पसंख्याक (Minorities - प्रामुख्याने मुस्लिम आणि ख्रिश्चन)

  • हि (Hindulidavaru): मागासवर्गीय

  • दां (Dalitaru) : दलित (Scheduled Castes / SCs आणि Scheduled Tribes / STs)

कर्नाटकातील पारंपारिक राजकारणावर आणि सत्तेवर नेहमीच लिंगायत आणि वोक्कलिगा या 2 प्रबळ समुदायांचे वर्चस्व राहिले आहे. या समुदायांना शह देण्यासाठी आणि राज्यातील इतर शोषित, वंचित व बहुसंख्येने असलेल्या छोट्या-छोट्या जातींना एकत्र आणण्यासाठी देवराज अर्स यांनी 'अहिंदा'ची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा सर्वाधिक फायदा सिद्धरामय्या यांनाच झाला. सिद्धरामय्या हे स्वतः 'कुरुबा' (मेंढपाळ/धनगर) या मागासवर्गीय समाजातून येतात. कर्नाटकात लिंगायत आणि वोक्कलिगांनंतर कुरुबा समाज हा तिसरा मोठा समाज आहे. सिद्धरामय्या यांनी या समीकरणाचा वापर करून आपले नेतृत्व उभे केले.

सिद्धरामय्या यांनी 'अहिंदा' चा कसा वापर केला, ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊ :

अ) काँग्रेसबाहेर 'अहिंदा'ची मोट बांधली (२००४-२००६)

२००५ च्या सुमारास जेव्हा सिद्धरामय्या एच. डी. देवेगौडा यांच्या 'जेडीएस' पक्षात होते. त्यादरम्यान, त्यांचे देवेगौडांशी मतभेद झाले. देवेगौडा हे वोक्कलिगा राजकारणाला प्राधान्य देत असल्याचा आरोप करत सिद्धरामय्या यांनी 'अहिंदा' संघटना पुनरुज्जीवित केली. त्यांनी संपूर्ण कर्नाटकात दलितांच्या, मागासवर्गीयांच्या आणि मुस्लिमांच्या अफाट रॅली काढल्या. या आंदोलनाने सिद्धरामय्या यांना या सर्व वंचित घटकांचे 'एकमेव मोठे नेते' म्हणून स्थापित केले.

ब) काँग्रेसमध्ये प्रवेश आणि मुख्यमंत्रीपद (२०१३)

२००६ मध्ये जेव्हा सिद्धरामय्या यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिद्धरामय्या यांच्याकडे त्यांच्या 'अहिंदा' (अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित) या हक्काच्या मतपेढीची अफाट ताकद होती. काँग्रेसलाही कर्नाटकात लिंगायत आणि वोक्कलिगांच्या प्रभाव तोडण्यासाठी अशाच एका मोठ्या 'मास लीडर'ची गरज होती. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत याच 'अहिंदा' मतपेढीने काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली.

Siddaramaiah record
Karnataka CM news : नाश्ता करता करताच सिध्दरामय्यांनी नेत्यांसमोर टाकला बॉम्ब; थेट राजीनाम्याची घोषणा, मंत्र्यांनी पायच धरले...

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचे सर्वात नैसर्गिक दावेदार मल्लिकार्जुन खर्गे होते. खर्गे हे अत्यंत ज्येष्ठ, निष्ठावंत आणि दलित चेहरा होते. परंतु, सिद्धरामय्या यांनी आपल्या 'अहिंदा' आंदोलनाद्वारे संपूर्ण कर्नाटकातील मागासवर्गीय आणि दलितांना आपल्या बाजूने उभे केले होते.

सिद्धरामय्या यांनी हाच पॅटर्न २०२३ मध्येही रिपीट केला. २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेसला १३५ जागा मिळाल्या. पक्षाला निवडून आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी रात्रीचा दिवस केला होता. शिवकुमार हे वोक्कलिगा समाजाचे सर्वात श्रीमंत आणि ताकदवान नेते मानले जातात. सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे ते अत्यंत विश्वासू 'ट्रबलशूटर' आहेत.

पण जेव्हा मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली, तेव्हा सिद्धरामय्या यांच्या 'अहिंदा' मतपेढीचा 'अंडरकरंट' (Undercurrent) इतका तीव्र होता की, बहुतांश आमदारांनी सिद्धरामय्यांच्याच नावाला पसंती दिली. डी. के. शिवकुमार यांच्यासारख्या 'बाहुबली' नेत्यालाही सिद्धरामय्या यांच्या जनमानसातील पकडेपुढे माघार घ्यावी लागली आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते.

क) 'भाग्या' योजनांद्वारे मतपेढी मजबूत करणे

मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी आपल्या 'अहिंदा' मतपेढीला खुश करण्यासाठी अनेक लोकप्रिय आणि कल्याणकारी योजना सुरू केल्या, ज्यांना 'भाग्या' योजना म्हटले जाते.

अन्न भाग्या: गरीब कुटुंबांना मोफत तांदूळ देणे.

क्षीर भाग्या: शाळकरी मुलांना मोफत दूध देणे.

शादी भाग्य: अल्पसंख्याक मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत.

या योजनांमुळे गरीब, दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये सिद्धरामय्या यांची प्रतिमा 'गरिबांचा कैवारी' अशी बनली.

Siddaramaiah record
विलासरावांचे सरकार वाचविणारा 'हा' नेता किती ताकदवान? राजकीय वर्चस्व, संपत्ती पाहून तुम्ही थक्क व्हाल...

ड) २०११ ची जातनिहाय जनगणना

सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कर्नाटकात जातनिहाय जनगणना केली होती. लिंगायत आणि वोक्कलिगा समाजाची लोकसंख्या प्रत्यक्षात तितकी जास्त नाही, जितका त्यांचा सत्तेवर प्रभाव आहे; उलट 'अहिंदा' वर्गाची लोकसंख्या खूप जास्त आहे, हे कागदोपत्री सिद्ध करणे हा त्यामागील राजकीय हेतू होता.

'अहिंदा' राजकारणाचे यश आणि मर्यादा

यश : या राजकारणामुळेच सिद्धरामय्या हे देवराज अर्स यांच्यानंतर कर्नाटकचे 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री बनले. तसेच २०२३ मध्ये काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड विजयातही (१३५ जागा) याच अहिंदा मतपेढीचा आणि सिद्धरामय्या यांच्या लोकप्रियतेचा मोठा वाटा होता.

मर्यादा/विरोध : या राजकारणामुळे लिंगायत आणि वोक्कलिगा हे प्रबळ समुदाय काँग्रेसपासून दुरावले. ते काँग्रेसला 'अहिंदा' म्हणजेच उच्चवर्णीयांच्या विरोधी असलेला पक्ष मानू लागले.

आज जरी सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिला असला आणि डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार असले, तरी कर्नाटकच्या राजकारणातून सिद्धरामय्यांचा 'अहिंदा' पॅटर्न मिटवणे अशक्य आहे. शिवकुमार यांनाही आपली सत्ता टिकवण्यासाठी सिद्धरामय्यांनी तयार केलेल्या या गरीब आणि मागासवर्गीय मतपेढीला सोबत घेऊनच चालावे लागणार आहे.

याचा फायदा काँग्रेसलाही आगामी निवडणुकांमध्ये होऊ शकतो. कारण डी. के. शिवकुमार स्वतः 'वोक्कलिगा' समुदायाचे मोठे नेते आहेत. सिद्धरामय्या यांच्या 'अहिंदा' समीकरणासोबतच डी. के. शिवकुमार यांच्या 'वोक्कलिगा' मतांना जोडून कर्नाटकात एक नवीन आणि सर्वसमावेशक सोशल इंजिनिअरिंग तयार होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com