
Solapur, 01 August : पावसाळी अधिवेशनात विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेले माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रीपद काढून ते इंदापूरचे आमदार तथा क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. छत्रपती साखर कारखान्याचे संचालक ते राज्याचे कृषिमंत्री या वाटचालीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भरभक्कम पाठबळ भरणेंना मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश सर्व महत्वाच्या संस्थांवर भरणेंनी संधी देण्यात अजितदादांनी कधीही हात आखडता घेतला नाही. त्यातूनच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांसारख्या बड्या नेत्याशी दोन हात करण्यासाठी अजितदादांनी मोठी ताकद भरणेंच्या पाठीशी उभी केली आणि राज्याच्या कृषिमंत्रीपदापर्यंत त्यांना पोचवले.
दत्तात्रेय भरणे हे इंदापूर तालुक्यातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा तिसऱ्यांदा पराभव करून निवडून आले आहेत. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याऐवजी पुणे जिल्ह्यातून दत्तात्रेय भरणे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. महायुती सरकारमध्ये भरणेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. पण, कमी महत्वाच्या खात्यामुळे भरणे नाराज होते. अडवळणाने त्यांनी ती बोलून दाखवली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रेय भरणेंची (Dattatray Bharane) राजकीय कारकिर्द एकाच संस्थेतून सुरू झाली हेाती. दोघेही इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक होते. पुणे जिल्हा बॅंकेवरही दोघांनी संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पुढे अजित पवार हे राज्याच्य राजकारणात रमले. पण ते भरणेमामांना विसरले नव्हते. त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या २०१२ च्या निवडणुकीत संधी दिली आणि झेडपीचे अध्यक्षही केले.
तत्पूर्वी विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीत दत्तात्रेय भरणे यांनी काँग्रेस आघाडीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. दोन्ही काँग्रेसची आघाडी असल्याने ही जागा तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सुटली होती. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भरणे यांना माघार घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या वेळी भरणेवाडीतील त्यांच्या घरी अभूतपूर्व प्रसंग घडला होता. निवडणुकीतून माघार घेऊ नये यासाठी त्यांना घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्यावेळी अजितदादा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी अजित पवार यांनी भरणे यांना २०१२ मध्ये लाल दिव्याची गाडी दिली होती. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना संपूर्ण मोकळीक भरणे यांना देण्यात आली होती. आगामी २०१४ ची विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठीच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पुरेपूर वापर भरणेंनी केला आणि झालेही तसेच. दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि पुरेपूर तयारी केलेल्या भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून विधानसभा गाठली.
भरणेंनी २०१४ नंतर मागे वळून पाहिलेच नाही. पुढे २०१९ च्या निवडणुकीतही भरणेंसाठी अजितदादांनी ठोकाची भूमिका घेतली हेाती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडी सरकारमध्ये भरणे हे पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. तसेच सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. भरणेंनी २०२४ मध्ये हॅट्ट्रीक केली आणि महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आणि माणिकराव कोकाटेंचे ऑनलाईन रमी खेळणे भरणेंच्या पथ्यावर पडले आणि कृषिमंत्रीपदासारख्या मोठ्या खात्याची लॉटरी लागली.
भरणेंच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत अजितदादा पवार हे सर्व शक्तीनिशी पाठीशी उभे राहिले. त्यांच्या पाठबळावर दत्तात्रेय भरणे यांनी कृषिमंत्रीपदापर्यंत मजली मारली आहे. पण कृषिमंत्रीपद हे संवदेनशील खाते असून भरणेंनी जपूनच वागावे, बोलावे लागणार आहे.
दत्तात्रेय भरणे यांची राजकीय कारकिर्द
१९९२ : श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक
१९९८ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक
२००० : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन
२००३-०८ : श्री छत्रपती कारखान्याचे चेअरमन
२००९ : विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा अपक्ष म्हणून लढवली (पराभूत)
२०१२-१४ : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय आणि झेडपीचे अध्यक्ष बनले
२०१४ : विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढवली आणि जिंकली
२०१९ : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री, सोलापूरचे पालकमंत्री
२०२४ : महायुती सकारमध्ये क्रीडा विभागाचे कॅबिनेट मंत्री
जुलै २०२५ : राज्याचे कृषिमंत्री
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.