Beed News : बीड जिल्ह्यात जागा वाटपात महायुती आणि महाविकास आघाडींमध्ये दोन्ही ‘राष्ट्रवादीच’ मोठा भाऊ ठरणार आहेत. महायुतीत शिवसेनेलाही राष्ट्रवादी अजित पवार गटाने ऑक्सिजनवर ठेवले आहे. तर, महाविकास आघाडीमध्येही काँग्रेस आणि शिवसेनेच्या (यूबीटी) हाती काही लागेल असे चित्र नाही. दरम्यान, सहा आमदारांपैकी केवळ दोघांच्या उमेदवारीवर आजघडीला तरी मोहर आहे. उर्वरित चार आमदारांच्या उमेदवारींचा फैसला बदलत्या राजकीय समीकरणांनुसार होणार आहे.
महायुतीमधून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना परळीची उमेदवारी निश्चित मानली जाते. केजमध्येही भाजपच्या नमिता मुंदडा यांचे तिकीट फिक्स आहे. भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणुक लढविणार नसल्याची घोषणा केली असली तरी ते लढणारच नाहीत असेही सांगता येत नाही. त्यांच्या घरातून भावजय गीता पवार किंवा पुतणे शिवराज पवार यांचीही चर्चा आहे. मात्र, पवारांनी भाजप सोडल्यात जमा आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही लढणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्यांच्या वारसाला उमेदवारी मिळेल का, असाही प्रश्न आहे. आष्टीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आमदार असले तरी या ठिकाणी भाजपच्या सुरेश धसांसाठी जागा सोडण्याबाबत खलबते सुरु आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर यांना स्वकियांनीच घेरले आहे.
महायुतीत शिवसेनेच्या बीडच्या एकमेव जागेवर अतिक्रमणाची तयारी राष्ट्रवादीकडून सुरु आहे. आज (गुरुवारी) अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी बोलविलेली इच्छुकांची बैठक आणि २० तारखेला समाजाच्या सभेत ते काय घोषणा करतात, यावरही समीकरणे अवलंबून आहेत.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीत ‘लोहे को लोहा’ असे सुत्र अवलंबिण्यासाठीच बबन गित्ते, सुनिल गुट्टे, राजाभाऊ फड, फुलचंद कराड, सुदामती गुट्टे यांच्या यादीत आता माजी आमदार संजय दौंड यांचेही नाव पुढे येत आहे. या चौघांसह काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख, माधव जाधव यांची एकत्रित मोट बांधण्याचे शरद पवारांचे प्रयत्न आहेत.
माजलगावमधून प्रकाश सोळंके यांनी लढणार नसल्याची घोषणा केली आहे. तर, पाच दिवसांपासून भाजपच्या रमेश आडसकरांच्या सोशल मीडियावरही ‘घेऊ भरारी’चा नारा आहे. त्यांची ‘तुतारी’ निश्चित मानली जात आहे. जयसिंग सोळंके, अशोक डक, माधव निर्मळ, बाबरी मुंडे हे महायुतीकडून तर माजी आमदार राधाकृष्ण होके, नारायण डक, मोहन जगतापही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांच्या यादीत आहेत.
केजमधून भाजपच्या नमिता मुंदडा यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुकांची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचे होमपिच असलेल्या केजमध्ये पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पृथवीराज साठे यांच्यासह आता डॉ. अंजली घाडगे, संगीता ठोंबरे, रमेश गालफाडे अशी नावे वाढत आहेत.
महायुतीत राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे आमदार असले तरी ही जागा भाजच्या सुरेश धस यांच्यासाठी सोडण्याच्या हालचाली आहेत. उमेदवारी कोणालाही भेटली तरी आजबे, धसांसह माजी आमदार भीमराव धोंडे रिंगणात असतीलच. त्यामुळे महायुतीत बंडखोरी निश्चित आहे. राष्ट्रवादीकडून युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचे नाव आघाडीवर आहे. यासह नरसिंग जाधव, सतीश शिंदे, राम खाडेही इच्छुक आहेत.
गेवराईचे आमदार लक्ष्मण पवारांनी भाजप सोडल्यात जमा आहे. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रयत्न असले तरी शिवसेनेचे (यूबीटी) माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या तयारीचा त्यांना अडसर आहे. महायुतीतली भाजपची जागा राष्ट्रवादी ( अजित पवार गट) सोडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना उमेदवारी निश्चित मानली जाते.
दोनदा पक्षफुटीनंतर शरद पवारांशी एकनिष्ठ राहीलेल्या संदीप क्षीरसागर यांना उमेदवारीत स्वकियांनीच गतीरोधक टाकले आहेत. त्यांचे चुलते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याबाबतही चर्चा होत आहे. शिवसेनेकडून अनिल जगताप तर शिवसंग्राामंच्या डॉ. ज्योती मेटे देखील येथून तयारी करत आहेत. पक्षाकडे जागा नसली तरी डॉ. येागेश क्षीरसागर, फारुक पटेल, शेख तय्यब देखील राष्ट्रवादीकडून प्रयत्नशिल आहेत. एमआयएमचे शेख शफिक यांचीही पायाभरणी सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.