Shivsena UBT Vs Shivsena : यापूर्वी कधीही फारशी चर्चेत नसलेली 'बेस्ट' कामगार पतपेढीची निवडणूक यंदा प्रचंड चर्चेत आली आहे. याला कारणेही तशीच आहे. एक तर एकसंध शिवसेनेची गेली 20 वर्षे या पतपेढीवर सत्ता होती. पण यंदा शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. त्याचवेळी यंदा उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोबतीने निवडणूक लढवत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकाच उत्कर्ष पॅनेलमधून निवडणुकीसाठी उतरवण्यात आले आहेत. दोन्ही पक्ष आणि भाऊ अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण या उत्साहाला एका महिलेच्या उमेदवारीमुळे गालबोट लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बबिता पवार यांना ठाकरे बंधू प्रणित उत्कर्ष पॅनेलमधून उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे पक्षात प्रवेश करण्यास जाहीरपणे नकार देऊनही त्यांची उमेदवारी कायम ठेवल्याने ठाकरे समर्थक कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे ठाकरेंचे शिवसैनिक निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे लांब राहत आहेत.
बबिता पवार या माजी आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याची बातमी 13 ऑगस्ट रोजी 'सामाना'मध्ये प्रसिद्ध झाली होती. पण त्याचवेळी 'माजी निष्ठा यशवंत जाधव आणि यामिनी यशवंत जाधव यांच्याशी आहे, माझ्या संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
आदित्य ठाकरेंना अंधारात ठेवून निर्णय?
परळमधील बेस्टच्या वसाहतीत पतपेढीचे सर्वाधिक सभासद आहेत. याच सभासदांचा बबिता पवार यांच्या नावाला विरोध आहे. या कामगारांनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली होती. पण आदित्य ठाकरे यांना अंधारात ठेवून बबिता पवार यांना उमेदवारी दिल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे.
भाजप, शिवसेना एकत्र :
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्स व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिवसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. सहकार समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून या तिन्ही संघटना एकत्र मैदानात उतरल्या आहेत.
ठाकरे बंधूंचा गेम बिघडणार?
एका बाजूला बबिता पवार यांच्या उमेदवारीमुळे ठाकरे बंधूंच्या पॅनेलबद्दल असलेली नाराजी आहे. निवडणुकीच्या प्रचारापासून शिवसैनिक लांब राहात आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भाजप, शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पॅनेलमुळे ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी आव्हानात्मक ठरण्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.