Mahayuti News : भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या इनकमिंगचा मंगळवारी अक्षरशः स्फोट झाला. कल्याण-डोंबिवलीमधील पक्षप्रवेशानंतर शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. या बैठकीनंतर शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी भेटीला आलेल्या सगळ्या मंत्र्यांना झापले. तसेच उल्हासनगरच्या पक्षप्रवेशाची आठवण करून देत, तुम्ही सुरुवात केली, मग आम्ही प्रत्युत्तर दिलं, असे म्हणत फटकारले.
नेमके हे दोन पक्षप्रवेश सोहळे कोणते? कोणाचा पक्षप्रवेश झाला होता? यामुळे दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते दुखावले गेले?
पहिला पक्षप्रवेश झाला उल्हासनगरमध्ये. भाजपच्या 'ऑपरेशन लोटस' ला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांनी संयुक्तपणे 'ऑपरेशन टायगर' राबवले. शहरातील सहा माजी नगरसेवकांनी अचानक भाजपचा निरोप घेऊन शिवसेना टीम ओमी कलानीच्या 'दोस्ती का गठबंधन'चा हात धरला. या मोठ्या गळतीमुळे भाजपला केवळ संघटनात्मक धक्काच नाही, तर महापालिका निवडणुकीच्या संपूर्ण रणनीतीला मोठा हादरा बसला.
या घडामोडींचा उल्हासनगर पालिका निवडणुकीवर परिणाम होणार आहे. भाजपच्या शक्तीस्थानावर मोठा घाव बसल्यामुळे शहरातील राजकीय लढतीचे स्वरूप एकदम बदलले आहे. संघटनातील जुन्या नेत्यांचा मोठा गट बाहेर पडल्याने केवळ पक्षाची ताकदच कमी झाली नाही, तर उरलेले कार्यकर्तेही पुढील नेतृत्वाबाबत संभ्रमात असल्याची स्थिती राजकीय वर्तुळात आहे. पूर्वी त्रिकोणी असलेली लढत आता थेट 'भाजप विरुद्ध टीओके-शिवसेना' अशी रंगणार आहे.
अनुभवी राजकीय निरीक्षकांच्या मते, या सहा नेत्यांचा प्रभाव विविध प्रभागांमध्ये इतका खोलवर आहे की त्यांच्या या एका निर्णयामुळे किमान १२ ते १५ प्रभागांतील समीकरणे थेट बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. शिंदे आणि टीओके प्रमुख कलानी यांच्या देखरेखीखाली नियोजनबद्ध पद्धतीने रणनीती यशस्वी केली. याच पक्षप्रवेशामुळे भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दुखावले गेले.
मग दुसऱ्याच दिवशी भाजपने सूत्र फिरवली. मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेला खिंडार पाडले. 25 वर्ष नगरसेवक राहिलेले दिवंगत वामन म्हत्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काही तासांतच माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांनी पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेनेचे जवळपास 17 माजी नगरसेवक भाजपने आपल्या गोटात घेतले आहेत. तर शिवसेनेने भाजपचे 9 माजी नगरसेवक गळाला लावले आहेत. ठाण्यासह पाटण, संभाजीनगर, नाशिक, रायगड, जळगाव इथेही शिवसेनेच्या हक्काच्या गडाला भाजपने सुरुंग लावला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेते दुखावले गेले आहेत, आणि त्याचा परिणाम राज्यात पाहायला मिळत आहे हे नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.