
ब्रिजमोहन पाटील
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली आहे. भाजपने शहरातील मंडल अध्यक्षांची निवड केल्यानंतर शहराध्यक्ष बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले, त्यात संघटनेची भूमिका महत्त्वाची राहिली. सामाजिक समतोल राखत भाजपने धीरज घाटेंची सलग दुसऱ्यांदा शहराध्यक्षपदी निवड केली. भविष्यातील पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी पक्षाने घाटेंना संधी देत या एकाच निर्णयातून अनेक हेतू साध्य केले आहेत.
पुणे शहरात भाजपने शहराध्यक्ष निवड करण्याची प्रक्रिया काही दिवसापूर्वी सुरु केली होती. शहरातून घाटे यांच्यासह माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांच्या नावांची चर्चा होती. या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना भेटून शहराध्यक्ष पदासाठी काम करण्याची इच्छा बोलावून दाखविली होती. तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या बाजूने पर्यवेक्षक व निरीक्षकांपुढे कौल द्यावा, यासाठीही संपर्क साधला होता.
आगामी महापालिका निवडणूक टार्गेट
शहराध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर घाटे यांनी पुन्हा एकदा पक्षाकडे संधी मागितली असल्याचे समोर आले. जुलै 2023 मध्ये घाटे यांची निवड झाली होती, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षांपेक्षा कमी होता. तसेच या कालावधीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले आहे, यात संघटनेची महत्त्वाची भूमिका आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह शहरातील अन्य आमदारांनी घाटे यांना पुन्हा एकदा संधी द्यावी, अशी भूमिका पक्षाकडे मांडली होती. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात संघटनेची पुनर्बांधणी करून निवडणुकीसाठी सज्ज होणे आवश्यक आहे. त्यासाठी जुन्या शहराध्यक्षांना संधी देणे पक्षाने पसंत केले.
सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीत भाजपने ब्राह्मण समाजाला संधी द्यावी, अशी मागणी होत होती. यात कोथरूड, कसबा या दोन मतदारसंघांत यापूर्वी ब्राह्मण समाजाने प्रतिनिधित्व केले आहे. महायुतीमध्ये शहरातील आठपैकी सहा मतदारसंघ हे भाजपच्या वाट्याला आले होते. पण त्यात एकाही ठिकाणी ब्राह्मण उमेदवार दिला नव्हता. तसेच नुकतीच २६ मंडल अध्यक्षांची निवड झाली, त्यात कोथरूडमधील एका मंडलाचा अध्यक्ष हा ब्राह्मण समाजाचा आहे. पक्ष संघटनेत सामाजिक समतोल राखत शहराध्यक्षपद ब्राह्मण समाजाकडे देण्यात आले आहे.
घाटे यांच्या नावाबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते बऱ्यापैकी एकमत होते. अन्य इच्छुकांचे शहरातील आमदार, मंत्र्यांसोबत वैयक्तिक मतभेद आहेत. त्याचा परिणाम पक्ष संघटनेवर झाला असता. तसेच महापालिकेसाठीच्या तिकीट वाटपातही हा संघर्ष उफाळला असता.
गेल्या दोन वर्षांत शहराध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीने काम केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश मिळाले, त्यात संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे. मला शहराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय कारकीर्द
■ लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक
■ काही वर्षे प्रचारक म्हणून काम पाहिले
■ भाजपचे शहर सरचिटणीस म्हणून काम पाहिले
■ 2017 ते 2022 या कालावधीत नगरसेवक
■ एक वर्ष महापालिकेत सभागृह नेते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.