
Pawar Patil or Thackeray News : महायुती सरकरमध्ये आम्ही तिघे एकत्र आहोत. तिघांनी विकासाची एक्सप्रेस सुरू केली आहे. त्यात कुणीही स्पीडब्रेकर आणू शकत नाही. कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. पण स्पीड ब्रेकरला आता इथं जागा नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाच्या सुरुवातीप्रसंगी केले. फडणवीस यांनी केलेल्या या विधानांनंतर आता त्यांच्या मनातील 'बुस्टर' कोण? हे समजण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार असली तरी त्यांचे हे सूचक विधान कोणाच्या प्रवेशाचे संकेत देणारे आहे, याची जोरात चर्चा रंगली आहे.
मुंबईतील दहिसर-काशीगाव मेट्रो मार्गिकेवर दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो-9 चाचणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सध्यपरिस्थितीवर भाष्य करताना सूचक विधान केले आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
येत्या काळात राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय घडामोकडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही दिवसापासून राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. तर दुसरीकडे ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कोण एकत्र येणार याची चर्चा शिगेला पोहचली असतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक विधान करीत उत्सुकता ताणून धरली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यातील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे. सर्वांचा ओढा महायुतीमधील घटक पक्षात सहभागी होण्याकडे दिसत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक माजी आमदारांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीकडील इनकमिंग जोरात वाढले आहे.
येत्या काळात पवार कुटुंब देखील एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य करताना, त्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असे सांगितल्याने राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आले आहे. हे विधान केवळ कौटुंबिक नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जात आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांमध्ये विभागल्यानंतर पवार कुटुंबात राजकीय दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे भविष्यात जर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांच्या पक्षाशी जुळवून घेतले तर सत्तेबाहेर असलेला हा शरद पवार यांचा गट भविष्यात महायुतीसोबत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे विधान शरद पवार यांच्या पक्षाशी संबधित होते का ? अशी चर्चा रंगली आहे.
सध्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. काही राजकीय निरीक्षक आणि विरोधी पक्षांचे नेते असा दावा करत आहेत की पाटील महायुतीकडे वळण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुका झाल्यापासून पाटील हे महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांच्या या प्रवेशाच्या बातम्या केवळ आतापर्यंत तरी अफवाच ठरल्या आहेत. त्यामुळेच जयंत पाटील हे भविष्यात महायुतीसोबत येऊ शकतात का ? या चर्चेला पुन्हा एकदा फडणवीसांच्या विधानाने तोंड फुटले आहे.
त्यातच महिनाभरापासून राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीप्रसंगी राज ठाकरे यांनी ठाकरे बंधू भविष्यात एकत्र येऊ शकतात, असे संकेत देत टाळी दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील या दिलेल्या टाळीला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
त्यातच गेल्या दोन दिवसापासून या चर्चा बंद होऊन अचानक राज ठाकरे हे महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चा ऐकवयास मिळत आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता राज ठाकरे महायुतीसोबत जाऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे हे विधान राज ठाकरे यांच्या महायुतीसोबत येण्याच्या दृष्टीने सूचक मानले जात आहे.
त्यातच शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी अचानक राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ठाकरे बंधुंची युतीची चर्चा सुरू असताना सामंत यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. राज यांनी उद्धव यांच्यासोबत जाऊ नये यासाठी केलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.