Buldhana Politics: 2029 चा गेम आतापासूनच सुरू? ‘बाप तो बाप रहेगा’ ते ‘बाप कोण ते दाखवू’चा इशारा;'कुणालच्या' लॉन्चिंगने महाले-गायकवाड संघर्ष पेटला

Chikhli Politics 2029 : चिखलीत २०२९ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष चर्चेत आहे. कुणाल गायकवाडांच्या सक्रियतेमुळे महायुतीतील जागावाटपावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
sanjay Gaikawad
Shweta Mahale and Sanjay Gaikwad exchange political signalsSarkarnama
Published on
Updated on

Chikhli Politics : 2029 ची विधानसभा निवडणूक अजून दूर आहे. पण बुलढाण्यात राजकीय हालचालींना आतापासूनच वेग आला आहे. एकीकडे आहेत चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले. दुसरीकडे आहेत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड. या दोन्ही नावांमध्ये आता तिसरं नाव चर्चेत आलंय... कुणाल गायकवाड! याच कुणाल गायकवाड यांच्यामुळे सध्या बुलढाण्यात 'महाले विरुद्ध गायकवाड' हा टोकाचा वाद सुरु आहे. एकमेकांच्या मतदारसंघात राजकीय शक्ती प्रदर्शन, इशारे, प्रतिइशारे, टीका, त्या टीकांवर पलटवार असं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून संजय गायकवाड यांच्याकडून पुत्र कुणाल गायकवाड यांना चिखलीच्या राजकारणात सक्रियपणे पुढे आणलं जात असल्याचं चित्र आहे. 2029 ची निवडणूक अजून दूर आहे. पण राजकारणात उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय जमीन तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. हीच प्रक्रिया चिखलीत सुरु झाल्याची चर्चा आहे आणि याचमुळे भाजपच्या महाले आणि शिवसेनेचे गायकवाड यांच्यामध्ये ठिणगी पडली आहे.

संजय गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विविध राजकीय कार्यक्रम, पक्षाचे मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांनी चिखलीत उपस्थिती वाढवली आहे. संधी मिळेल तेव्हा त्यांनी श्वेता महाले कशा अकार्यक्षम आमदार आहेत हे दाखवून दिले आहे. पण गायकवाड यांची चिखलीतील सक्रियता महालेंच्या पहिल्यांदा डोक्यात गेली ती कुणाल यांच्या वाढदिवसावेळी.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कुणाल गायकवाड यांचा वाढदिवस झाला. यानिमित्ताने आमदार गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिखलीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. कुणाल यांची खुल्या जीपमधून मिरवणूक काढली. जेसीबीतून फुलांची उधळण झाली. याचमुळे कुणाल गायकवाड हे फक्त संजय गायकवाडांचे पुत्र म्हणून नव्हे, तर भविष्यातील राजकीय चेहरा म्हणून तयार केले जात आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला.

गायकवाड यांच्या या शक्ती प्रदर्शनाला महाले यांनीही त्याच स्टाईलने प्रत्युत्तर दिले. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुलढाण्यात महाले यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. शक्ती प्रदर्शनाचे निमित्त होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आणि आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस. रॅलीदरम्यान महाले दांपत्याने ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला. श्वेता महाले यांनी हातात धनुष्यबाणाचं चिन्ह दाखवलं. त्यानंतर एका क्षणाने संपूर्ण राजकीय चर्चेचा सूर बदलला.

sanjay Gaikawad
Buldhana Politics: भाजप आमदार अन् मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांना उघड चॅलेंज : शिवसेना आमदाराने ‘पॉवर शो’ करत स्कोअर सेटल केला

महाले यांनी धनुष्यबाणाचं चिन्ह का दाखवलं? हा फक्त उत्स्फूर्त क्षण होता? की संजय गायकवाड यांच्यासाठी काही राजकीय संदेश होता? या प्रश्नांमुळे बुलढाण्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. शिवाय बुलढाण्याचा कचरा चिखलीपर्यंत आला असल्याची टीका केली.

त्यानंतर संजय गायकवाड शांत बसले नाहीत. श्वेता महाले यांच्या ‘बाप तो बाप रहेगा’ या इशाऱ्यावर गायकवाडांनी थेट पलटवार केला. “राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी दाखवून देऊ.” असा इशारा त्यांनी दिला. त्यांची ही भाषा राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची होती. पण त्याचवेळी गायकवाडांनी एक वेगळा सूरही लावला. श्वेता महाले या आपली बहीण असल्याचं त्यांनी म्हटलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण दोघे सोबत होतो. एका ताटात जेवलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

वैयक्तिक संबंध एकीकडे पण राजकीय मैदानात संघर्ष दुसरीकडे!

गायकवाडांनी स्पष्टपणे सांगितलं, “त्यांनी बुलढाण्यात भाजप वाढवावी, आम्ही चिखलीत शिवसेना वाढवू.” आणि इथूनच चिखलीच्या राजकारणातला पुढचा गेम स्पष्ट दिसायला लागला. गायकवाडांनी केवळ धनुष्यबाणाच्या मुद्द्यावरच उत्तर दिलं नाही. महाले यांच्या वाढदिवस कार्यक्रमातील खर्चावरही टीका केली. “माझ्याकडे हरामाचे पैसे नाहीत,” असं म्हणत त्यांनी पैशांची उधळपट्टी करण्यावर सवाल उपस्थित केला.

यावेळी गायकवाड यांनी विद्याधर महाले यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त DJ, पोस्टर आणि बॅनर टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिवच DJसह रॅली काढून वाढदिवस साजरा करत आहेत. दुष्काळाची परिस्थिती असताना अशाप्रकारे रॅली काढून वाढदिवस साजरा करण्याऐवजी गरजू आणि शेतकऱ्यांना मदत करावी, असं खोचक आवाहन गायकवाड यांनी केलं.

वाढदिवसाच्या कार्यक्रमावर खर्च करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत करण्याची स्पर्धा करा. माझ्याशी फाईट करायची असेल तर विकासाची फाईट करा, असं थेट आव्हानही त्यांनी दिलं. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर ही फक्त टीका नव्हती. गायकवाडांनी चिखलीच्या राजकारणात आपली उपस्थिती जाहीर केली होती. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, पक्षबांधणी, राजकीय कार्यक्रम, मेळावे, आणि स्थानिक पातळीवरील राजकीय संपर्क, या सगळ्यामुळे चिखलीत कुणाल गायकवाडांसाठी संघटन उभं केलं जात असल्याची चर्चा सुरू झाली.

याच काळात आणखी एक घटना घडली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि विद्याधर महाले यांची भेट झाली. या भेटीतील ‘जादू की झप्पी’ चर्चेचा विषय ठरली. या भेटीचा नेमका राजकीय अर्थ काय? त्यातून बुलढाण्यात कोणतं समीकरण तयार होतंय? याबाबत चर्चा झाली. मात्र या भेटीमागे विशिष्ट राजकीय समीकरण असल्याची अधिकृत पुष्टी नाही. पण एक गोष्ट नक्की, बुलढाणा जिल्ह्यात महायुतीच्या अंतर्गत राजकारणात प्रत्येक हालचालीकडे आता राजकीय चष्म्यातून पाहिलं जातंय.

यात सर्वात ताजी घटना घडली चिखली मतदारसंघातील दहीहंडीचा कार्यक्रम. धाड गावातील कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, पुत्र कुणाल गायकवाड, काही सेलिब्रिटी, हजारो नागरिक आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती. सर्वात लक्षवेधी म्हणजे फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीमधून फुलांची उधळण. या संपूर्ण वातावरणातून गायकवाडांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि म्हणूनच... हा फक्त दहीहंडीचा कार्यक्रम म्हणून पाहायचा? की श्वेता महाले यांच्या बुलढाणा शक्तिप्रदर्शनाला चिखलीतून दिलेला राजकीय रिप्लाय?

इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. संजय आणि कुणाल गायकवाड यांची चिखलीतील सक्रियता, श्वेता महाले यांचं बुलढाण्यात शक्तिप्रदर्शन, धनुष्यबाणाचा इशारा, ‘बाप तो बाप रहेगा’ हे गाणं आि त्यानंतर संजय गायकवाडांचा थेट पलटवार, ‘राजकारणातला बाप कोण हे दाखवून देऊ’ असा इशारा आणि आता चिखलीच्या धाडमध्ये पुन्हा हजारोंच्या उपस्थितीत पॉवर शो. हा घटनाक्रम योगायोगांची मालिका आहे? की दोन्ही बाजूंनी ताकद आजमावण्याची सुरुवात झाली आहे? हेच सध्या चिखलीच्या राजकारणातील सर्वात मोठं प्रश्नचिन्ह आहे.

विधानसभा निवडणूक 2029 मध्ये होणार आहे. म्हणजे अजून बराच वेळ आहे. पण चिखलीत राजकीय हालचाली पाहिल्या तर दोन्ही बाजूंनी तयारीला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. श्वेता महाले यांच्यासमोर आपलं राजकीय स्थान आणखी मजबूत करण्याचं आव्हान आहे.

तर संजय गायकवाडांसमोर आपल्या मुलासाठी मतदारसंघात संघटन उभं करण्याचं आव्हान आहे. कुणाल गायकवाडांची संभाव्य उमेदवारी अजून चर्चेच्या पातळीवर आहे. पक्ष कोणता? उमेदवारी कोणाची? महायुतीमध्ये जागावाटप कसं होणार? या प्रश्नांची उत्तरं आज मिळणं शक्य नाही. पण राजकीय जमीन तयार करण्याचं काम सुरू झालंय, हे नाकारता येणार नाही.

sanjay Gaikawad
Eknath Khadse: शिवसेना-भाजपच्या पहिल्या सरकारमध्ये खडसेंना मंत्रीपदं देण्यावरुन झाला होता ड्रामा; प्रमोद महाजनांनी असा फिरवला गेम

चिखलीची खरी गंमत इथेच आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महायुतीत आहेत. राज्याच्या सत्तेत दोन्ही बाजू एकत्र आहेत.

पण स्थानिक पातळीवर.भाजपचा बालेकिल्ला मजबूत करण्याचा प्रयत्न एका बाजूला आणि चिखलीत शिवसेनेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूला आता जर या समीकरणात कुणाल गायकवाडांचं नाव आणखी जोरात पुढे आलं तर 2029 मध्ये चिखलीची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाणार? हा प्रश्न आतापासूनच महत्त्वाचा ठरू शकतो. म्हणूनच चिखलीत सध्या सुरू असलेला हा सगळा राजकीय खेळ केवळ वाढदिवस, रॅली किंवा दहीहंडीपुरता मर्यादित नाही. तो दोन आमदारांच्या राजकीय वर्चस्वाचा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad held a major power show in Chikhli
Prataprao Jadhav Vidyadhar Mahale
Sanjay Gaikwad Vs Shweta Mahale .jpg
Kunal Gaikwad’s Possible Chikhli Entry | BJP Politics
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com