Revanth Reddy : काँग्रेसला महाराष्ट्रातही हवाय ‘रेवंत रेड्डी’

Maharashtra Congress : काँग्रेस जोपर्यंत महाराष्ट्रात रेवंत रेड्डी घडवत नाही, तोपर्यंत सत्ता लांबच राहील. महाराष्ट्राचा रेवंत रेड्डी कोण?
Revanth Reddy
Revanth ReddySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: तेलंगणात काँग्रेसने २०१४, २०१९ चा पराभव पचवून २०२३ मध्ये जोरदार ‘कमबॅक’ केले आहे. या ‘कमबॅक’मध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसने २०१४ मध्ये सत्ता गमावली.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी नव्हतीच. २०२४ मध्येही जनतेतून सत्ता मिळवता आली नाही. काँग्रेस जोपर्यंत महाराष्ट्रात रेवंत रेड्डी घडवत नाही, तोपर्यंत सत्ता लांबच राहील. महाराष्ट्राचा रेवंत रेड्डी कोण? बंटी पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम, वर्षा गायकवाड की अन्य कोण?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम (टीडीपी) पक्षात प्रवेश केला. या पक्षाने २००६ मध्ये त्यांना जिल्हा परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर ते अपक्ष जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर ते २००८ मध्ये अपक्ष म्हणूनच विधान परिषद सदस्य झाले.

२००९ मध्ये टीडीपीकडून विधानसभा सदस्य झाले, २०१४ मध्ये टीडीपीचे सभागृह नेते झाले. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगण राष्ट्र समितीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले.

काँग्रेसने (Congress) त्यांना २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी दिली, त्यात ते विजयी झाले, २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या जबाबदारीचे सोनं करत त्यांनी २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून दिले. एकहाती वर्चस्व असलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसचा दारुण पराभव केला. केंद्रात सत्ता असूनही तेलंगणात भाजपला जे शक्य झाले नाही ते रेवंत रेड्डी यांनी काँग्रेससाठी शक्य करून दाखविले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची नोंद २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत झाल्याने संघटनात्मक बदलाची गरज आता पदोपदी जाणवू लागली आहे. जनतेत असलेला नेता आणि दिल्ली काँग्रेसचा आशीर्वाद असलेला तरुण नेता मिळेपर्यंत काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता कमीच आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षाची असलेली जबाबदारीही आता काँग्रेसच्या हातून गेली आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळालेच तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे (Shivsena) ठाकरे ब्रॅण्ड आहे, राष्ट्रवादीकडे शरद पवार नावाचा ब्रॅण्ड आहे. काँग्रेसकडे काय आहे? याचे आत्मचिंतन केल्यास महाराष्ट्रातील काँग्रेसला येथील ‘रेवंत रेड्डी’ची नक्कीच उणीव भासेल.

Revanth Reddy
CM Pramod Sawant : ''..तर गोवा मुक्ती लढ्यातील ते 74 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा नसते झाले''

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रात बंटी पाटील आणि विश्‍वजित कदम यांचे जाळे भक्कम आहे. त्यांनी पुणे पदवीधर व शिक्षकच्या विधान परिषद निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिलेली आहे. मुंबई पट्ट्यात वर्षा गायकवाड यांच्या नावाचे वलय आहे. अभ्यासू, आक्रमक व जनमानसात भक्कम स्थान असलेल्या नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे अमित देशमुख यांना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मानणारा कमी-अधिक प्रमाणात वर्ग आहे. पक्षसंघटनेतील नेतृत्वाची जबाबदारी यापैकी कोणाला मिळते? की अन्य नवीन चेहऱ्यावर जबाबदारी येते? या बद्दल उत्सुकता आहे.

Revanth Reddy
Gunaratna Sadavarte : सदावर्तेंचा काँग्रेसवर हल्लाबोल; राहुल गांधीं अन् मल्लिकार्जुन खर्गेंना दिला इशारा, म्हणाले...

म्हणून हवाय तरुण चेहरा -

महाविकास आघाडीत (MVA) काँग्रेस ज्यांच्यासोबत काम करते त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आदित्य ठाकरे व वरुण देसाई यांच्या सारखे युवा नेते आमदार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे रोहित पवार व रोहित पाटील यांच्या सारखे युवा आमदार आहेत. काँग्रेसकडे या तुलनेत युवा नेता कोण? याचा विचार केल्यास फारसे समाधानकारक उत्तर मिळणार नाही. नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या रूपाने काँग्रेसकडे युवा, आक्रमक व अभ्यासू चेहरा होता. आमदार तांबे अपक्ष असल्याने ते जेवढे काँग्रेसच्या जवळ आहेत, त्यापेक्षा अधिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आहेत. जिल्ह्याजिल्ह्यातील युवकांशी चांगला संपर्क असलेल्या व जनतेत सहज मिसळणाऱ्या युवा नेतृत्वाची मोठी उणीव काँग्रेसमध्ये दिसत आहे.

विलासराव, अशोकरावांनी साधला समतोल -

पश्‍चिम महाराष्ट्रातील नेतृत्व विदर्भात मान्य होत नाही आणि विदर्भाचे नेतृत्व पश्‍चिम महाराष्ट्रात मान्य होत नाही, हा सर्वच पक्षांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येवर मोठ्या कष्टाने यश मिळविले आहे. काँग्रेसने हा प्रश्‍न सोडविण्यासाठी मध्यम मार्ग म्हणून मराठवाड्यातील नेते विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांचा पर्याय स्वीकारला होता. या दोन्ही नेत्यांनी काँग्रेसचे काम करताना विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्र समान अंतरावर ठेवला होता. काँग्रेसमध्ये आता हा समतोल साधणारे नेतृत्व आवश्‍यक आहे. तरच काँग्रेसचे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पुनरागमन होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com