Mumbai News : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी काळात होत असलेली विधानसभा निवडणूक चुरशीची ठरणार आहे. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यात या दोन्ही गटात पहिल्यांदाच सामना रंगणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सत्तेच्या समीप जाणारा महामार्ग ठरविण्यासाठी या 49 जागेवरील लढतीचा निकाल निर्णायक ठरणार आहे. ज्या गटाच्या पदरात जास्त जागा पडतील त्यांना सत्तेची जुळवाजुळव करणे सहज शक्य होणार आहे. या सर्व जागेवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे. त्यामुळे या चुरशीच्या लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष असणार आहे. (Shivsena News)
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतच सामना होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची एकही संधी सोडली जात नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना जवळपास 49 जागांवर एकमेकासमोर येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत हे दोन्ही गट त्यांची ताकद दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे कोणती सेना वरचढ ठरणार या कडे लक्ष असणार आहे.
या 49 जागांवर असणार दोन्ही गटात रस्सीखेच
शिवसेनेच्या (Shivsena) दोन्ही गटात 49 जागांवर चुरस दिसत आहे. यामधील 19 जागा या मुंबई आणि परिसरातील आहेत. तर मुंबई शहरातील 12 जागांवर हे दोन्ही गट आमने-सामने येणार आहेत. त्याशिवाय मराठवाड्यातील 8 जागा तर कोकणातील 8 जागांवर हे दोन्ही गट एकमेकांसमोर येणार आहेत. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील चार जागांवर चुरस असणार आहे. त्याशिवाय उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील दहा अशा एकूण 49 जागांवर दोन्ही सेना समोरा समोर येणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. महायुतीचे सरकार आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यासोबतच आपल्या पक्षाचा जनाधार वाढवणे हे पण मोठे चॅलेंज त्यांच्यासमोर आहे. त्यांना 40 हून अधिक जागा जिंकून त्यांचे स्थान टिकवून ठेवायचे आहे. एनडीएमध्ये सहभागी होताना त्यांच्याकडे इतकेच आमदार होते.
लोकसभा निवडणुकीत दोन्ही सेना 13 जागांवर एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाने 6 जागांवर तर शिंदे सेनेने 7 जागांवर विजय मिळवला होता. ठाकरे सेना राज्यात लोकसभेच्या 9 जागा जिंकत दुसऱ्या स्थनावर आहे. त्यामुळे त्यांनी काहीअंशी वर्चस्व सिद्ध केले आहे. शिंदे सेनेनी मुंबईतील एक जागा केवळ 48 मताने जिंकली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील मताचे अंतर खूप कमी आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यभरात सहानभूतीचे वातावरण आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत महाविकास आघाडीला झाला होता. त्यामुळेच राज्यात 48 पैकी 30 जागा आघाडीला जिंकता आल्या होत्या. ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले होते. त्यामुळे येत्या निवडणुकीत याच सहानभुतीचा फायदा कोणाला होणार ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षातील अनेक जण महायुतीसोबत सत्तेत गेली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. गेल्या दोन वर्षांपासून शिंदे भाजपच्या पाठींब्यावर सत्तेत आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी की महायुती सत्तेत येणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.