Daund Firing News : सुपारीच्या खंडाचही व्यसन नाही, गळ्यात तुळशीची माळ; तरी आमदार मांडेकरांचे 'भाऊ' दौंडच्या कला केंद्रात कसे पोहचले?
Daund Firing News : मागील दोन दिवसांपासून राज्यभर गाजत असलेल्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. यात भोर-वेल्हा-मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांच्यासह गणपत जगताप, रघुनाथ आव्हाड आणि चंद्रकांत मारणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात कोणीही जखमी झालेले नाही. तर हवेत गोळीबार करण्यात आला. त्या आवाजाने तिथली एक नृत्यांगणा बेशुद्ध झाली. पण पोलिसांना या प्रकरणात कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, अशा सूचना मी स्वतः अधिक्षकांना दिल्या आहेत. तिथे बिराजदार म्हणून अतिरिक्त उपाधिक्षक आहेत त्यांच्या मी संपर्कात आहेत.
यावर बोलताना आमदार शंकर मांडेकर यांनी माझा भाऊ कला केंद्रावर गेला खूपच शॉकिंग असल्याचे म्हंटले आहे. माझ्या भावाकडे बंदूक परवाना नाही. भावासोबत गणपत जगताप होते त्यांच्याकडे बंदूक परवाना आहे. माझा भाऊ समाजकार्य करतो, शेती पाहतो, वारकरी संप्रदायाच काम करतो. पण देखील किर्तनात असतो.
मांडेकर यांच्या या प्रतिक्रियेमुळे खळबळ उडाली आहे. किर्तनात असणारा भाऊ दौंडच्या कला केंद्रात कसा पोहोचला? असा सवाल विचारला जात आहेत.
आमदार शंकर मांडेकर आणि बंधू बाळासाहेब मांडेकर हे दोघेही सख्खे भाऊ. दोघेही वारकरी संप्रदायाला मानतात. बाळासाहेब मांडेकर यांच्या गळ्यात तर तुळशीची माळ आहे. दोघांना कोणतेही व्यसन नाही. आमदार झाल्यापासून शंकर मांडेकर यांच्यावतीने सार्वजनिक कार्यात, विविध कार्यक्रमांत प्रतिनिधी म्हणून त्यांच्यावतीने 5 ते 6 जण जातात. त्यात बाळासाहेब मांडेकर यांचाही समावेश आहे.
शंकर मांडेकर यांचे राजकारणात येण्यापूर्वीच विविध व्यवसाय आहेत. यात प्रामुख्याने जमीन खरेदी-विक्री आणि वीट भट्टीचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. या व्यवसायांमुळे आणि राजकारणात आल्यानंतर सार्वजनिक कामांमुळे शंकर मांडेकर यांना आधीपासूनच घराकडे आणि शेतीकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित शेती आणि वीट भट्टी व्यवसायाची जबाबदारी भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यावर सोपविली.
थोडक्यात दोघेही भाऊ एकत्र असून दोघांचे एकमेकांसोबत चांगले संबंध आहेत. पण काही दिवसांपूर्वी बाळासाहेब मांडेकर यांनी वीट भट्टीचा व्यवसाय बंद केला. विटा आणि बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या पुरवठ्याचा व्यवसाय सुरू केला. याच व्यवसायातून परिसरातील बहुमतांशी वीट भट्टी व्यावसायिक बाळासाहेब मांडेकर यांचे मित्र आहेत.
बाळासाहेब मांडेकर चौफुल्याच्या कला केंद्रात कसे पोहोचले?
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातही बाळासाहेब मांडेकर यांचे मित्र आहे. यातीलच एका मित्राच्या एका कार्यक्रमासाठी माण व मारुंजी या परिसरातील वीट भट्टी व अन्य व्यावसायिक मित्रांसोबत बाळासाहेब मांडेकर दौंडला गेले होते. दौंडला गेल्यानंतर वेळ जाईना म्हणून अन्य मित्रांनी अंबिका कला केंद्रात जायचं ठरवलं. त्यांच्यासोबत बाळासाहेब मांडेकरही तिथे पोहचले.
केंद्रात गेल्यावर आधी सुरु असलेला कार्यक्रम संपतच नसल्याने तिथे हवेत गोळीबार झाला. हा गोळीबार बाळासाहेब मांडेकर यांनी केला की अन्य कोणी याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण ही रिव्हाल्वरची पुंगळी साफ करताना गोळीबार झाल्याचे मांडेकर यांच्या जवळच्या मित्रांकडून सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.