
- हृषिकेश नळगुणे
Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डावलेल्या माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा संधी दिली आहे. शिंदे यांनी नुकतीच शिवसेनेच्या 7 महत्वाच्या नेत्यांची मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. यात सावंत यांच्याकडे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डॉ. दीपक सावंत यांना शिवसेनेचे बडे नेते म्हणून ओळखले जाते. 2000 ते 2018 असे तब्बल 18 वर्षे ते विधान परिषदेचे आमदार होते. 2000 ते 2006 या दरम्यान ते विधानसभा सदस्यांचे आमदार आमदार होते. तर 2006 आणि 2012 असे दोन टर्म ते मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. शिवाय डिसेंबर 2014 ते जानेवारी 2019 असे 4 वर्षे ते राज्याचे आरोग्य मंत्रीही होते. सोबतच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीही होते.
2018 मध्ये सावंत यांच्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा उमेदवारी दिले नाही. त्यांच्या जागी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. मंत्री असूनही विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने सावंत कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला.
तेव्हापासून दीपक सावंत अज्ञातवासातच होते. या दरम्यान, त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठमध्ये पीएचडीसाठी प्रवेश मिळविला. मार्च 2025 मध्ये त्यांची पीएचडी पूर्ण झाली. 'Social - Political Impact of Pandemic Covid-19' या विषयावर त्यांनी दुसऱ्यांदा डॉक्टरेट मिळविली. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
पीएचडी सुरु असताना सावंत यांच्या काही राजकीय हालचालीही सुरु होत्या. 2023 मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांची कुपोषण कमी करण्यासाठीच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. या काळात सावंत यांनी मोखाडा, पालघर, मेळघाट, नंदूरबार अशा कुपोषणग्रस्त भागात काम केले.
त्यानंतर आता दीपक सावंत पुन्हा सक्रिय राजकारणात अॅक्टिव्ह झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात सध्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचा वांद्रेमधील मातोश्री बंगलाही याच मतदारसंघात येतो. या भागात शिवसेनेची ताकद वाढविण्याची जबाबदारी सावंत यांच्याकडे असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.