
Friendship Day Special : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या मैत्रीचे अनेक किस्से शहरात सांगितले जातात. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्याच एका आमदाराने मित्रासाठी फडणवीस यांनी आपला घात केल्याचा आरोप केला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करून दोघांनही आपली मैत्री जपली आणि कायम ठेवली आहे. मते यांनीही मित्राने चौकटीच्या बाहेर जाऊन दिलेल्या संधीचे सोने केले.
देवेंद्र फडणवीस पक्षाच्या शिस्तीत वाढलेले आहेत. कोणाबाबतही मत व्यक्त करताना जपून शब्दाचा वापर कतात. त्यांचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे कोणालाही कळत नाही.आपल्या मैत्रीचा कोणी गैरफायदा घेऊ नये हेसुद्धा कटाक्षाने पाळतात. पक्षाच्या चौकटीत राहून निर्णय घेतानाही ते दूरचा विचार करतात. पक्ष आणि मैत्री याची सरमिसळ ते सहसा करीत नाही. तशी वेळ आलीच तर पक्षाला प्राधान्य देतात.
मात्र मैत्रीखातर याच फडणवीस यांनी मोहन मते यांच्याबाबत एक धाडसी निर्णय घेतला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण नागपूरचे तत्कालिन आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापले. त्यांच्याऐवजी मते यांना दिले होते. त्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. कोहळे आमदारच नव्हे तर भाजपचे शहराध्यक्ष होते. 2017 ची महापालिकेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात भाजपचे लढली होती. या निवडणुकीत भाजपचे विक्रमी 108 नगरसेवक निवडून आले होते.
त्यामुळे विधानसभेला कोहळे यांच्या विजयाची 100 टक्के खात्री होती. त्यांच्याच कार्यकाळात दक्षिण नागपूरमध्ये सर्वाधिक विकासकामे झाली होती. याशिवाय ते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे समर्थकही होते. दुसरीकडे मोहन मते हे गडकरी विरोधक होते. असे असताना विधानसभेच्या निवडणुकीच त्यांचे तिकीट कापल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मैत्रीखातर मुख्यमंत्र्यांनी आपला गेम केल्याचे मत कोहळे यांनी खासगीत व्यक्त केले होते.
भाजप-सेना युतीच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. केंद्रातही त्यांचे वजन होते. त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्यांनी आपला वजन त्यावेळी मैत्रीखातर मते यांच्या पारड्यात टाकले होते. खरंतर फडणवीस आणि मते यांची मैत्री युवामोर्चापासून सुरू झाली. तेव्हा भाजपचे नागपूरच नव्हे तर नागपूर शहरातही फारकही दखल घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. भाजपने पुकारलेल्या देशव्यापी बंदला साधा पानटपरीवाला जुमानत नव्हता. त्यावेळी मते बाहेर पडले की दुकाने पटापट बंद होत असत.
फडणवीसांचे प्लॅनिंग आणि मते यांची अंमलबजावणी अशी जोडी होती. दोघेही महापालिकेच्या राजकारणात उतरले. फडणवीस महापौर झाले तर मोहन मते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्यासोबत दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मतेही निवडूण आले. 2004 मध्ये मात्र मते यांना विधानसभेत निवडूण येता आले नाही. 2009 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. हेसुद्धा एक राजकारणच असल्याने मते यांनी बंडखोरी केली होती. ते पराभूत झाले आणि भाजपच्या बाहेर फेकले गेले.
सुमारे 10 वर्षे ते पक्षाच्या बाहेर होते. मते पक्षात परत घ्यायला कोणी तयार नव्हते. 2014 नंतर फडणवीसांचे राज्यात वजन वाढताच मते यांच्यासाठी पक्षाची दारे खुले करून देण्यात आली. 2019 मध्ये कोणाच्याही ध्यानीमनी नसताना, कोणतीही चर्चा नसताना विधानसभा निवडणुकीत मते यांना उमेदवारी जाहीर झाली. मते यांनी सुद्धा फडणवीस यांचा विश्वास आणि मैत्री सार्थ ठरवली. ते सलग दोनदा निवडून आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.