
Manikrao Kokate News : जागतिक महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विजेती ठरलेल्या दिव्या देशमुख हिचा आज (2 ऑगस्ट) राज्य शासनाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. 3 कोटी रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवीन क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी फडणवीस यांनी राजकारण हा देखील बुद्धीबळाचाच खेळ आहे, आम्हीही तो खळतो, एकमेकांना चेकमेट देतो, नॉक आऊट करतो असे भाषणाच्या ओघात सांगितले. त्यांनी आपल्या भाषणात कोणावरही टोलेबाजी केली नाही, पण योगायोगाने त्यांच्या शेजारी माणिकराव कोकाटे बसले होते. त्यामुळे संपूर्ण सभागृहाच्या नजरा कोकाटे यांच्याकडे वळल्या होत्या.
विधान परिषदेत रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे अडचणीत आले होते. विरोधकांनी त्यांच्या विरोधात रान उठवले होते. त्यापूर्वीही कोकाटे यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली होती. चोहोबाजूंनी बाजुंनी होणारी टीका आणि आरोप यामुळे सरकारला गंभीर दखल घ्यावी लागली. कोकाटे यांना समज देण्यात आली. सोबतच त्यांचे कृषी खाते बदलण्यात आले. त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. क्रीडा खाते स्वीकारल्यानंतर कोकाटे यांचा दिव्या देशमुख हिच्या सत्काराचा पहिलाच शासकीय कार्यक्रम होता. यावेळी त्यांनीसुद्धा भाषण केले.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले, दिव्याने जागतिक स्पर्धा पटकावून देशाची आणि महाराष्ट्राचीही मान उंचावली आहे. ती महाराष्ट्राची कन्या असल्याने मुख्यमंत्री म्हणून मलाही तिचा सार्थ अभिमान आहे. दिव्यामुळे माझाच नव्हे तर समस्त नागपूरकरांचाही मान वाढला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही दिव्याच्या अभिनंदनाचा ठराव पारीत केला. त्यावेळी ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या टिपणीने समस्त नागपूरकरांची मान अभिमानाने उंच झाली. दिव्या आणि मी दोघेही नागपूरचे आहोत. भुजबळांनी हाच योगायोग साधून बुद्धीबळात नागपूरकर जराच जास्तच बुद्धीमान दिसतात अशी टिपणी केल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
क्रिकेट आपल्या देशात सर्वाधिक लोकप्रिय आहे. मीसुद्धा क्रिकेटचा फॅन आहे. मात्र क्रिकेट जगातील फक्त सात देशच खेळतात. बुद्धिबळात शंभर पेक्षा जास्त देश खेळतात. या खेळात कालपर्यंत चीन या देशाचे प्राबल्य होते. मात्र दोन भारती मुलींनी चीनचे प्राबल्य मोडून काढले. त्यामुळे दिव्याची कामगिरी जास्त महत्त्वाची आहे. क्रीडा क्षेत्रात देशात महाराष्ट्र सर्वाधिक आघाडीवर आहे. त्यामुळे आम्ही अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. रोख रकमेचे पुरस्कार देण्यावर आम्ही भर देत आहोत. यातून खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांची खर्चाची चिंता मिटणार आहे.
दिव्याला 3 कोटींच्या धनादेशाची प्रतिकृती दिली. मात्र खरंच इतकी मोठी रक्कम दिव्याला दिली जाईल का याची शंका कोणाच्याही मनात येऊ शकते. असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिव्याच्या खात्यात कालच आरटीजीएसने पैसे ट्रान्सफर झाले असल्याचे सांगितले. हे मुद्दाम प्रेसवाल्यांसाठी सांगत असल्याचा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.