Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : 'जय गुजरात'चा नारा : एकनाथ शिंदेंनी 'बोलता बोलता' विकेट फेकली; आता बॅट ठाकरेंच्या हातात!

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर जय गुजरात असा नारा दिल्याने वादात सापडले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांच्यावर जोरदार टीका करत आहे.
Maharashtra DCM Eknath Shinde faces protests after raising “Jai Gujarat” slogan during Amit Shah’s visit to Pune.
Maharashtra DCM Eknath Shinde faces protests after raising “Jai Gujarat” slogan during Amit Shah’s visit to Pune.Sarkarnama
Published on
Updated on

बातमीमध्ये थोडक्यात काय आहे?

  1. हिंदी सक्तीप्रकरणी माघार घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

  2. महाराष्ट्रात अनेक प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे आधीच जनतेमध्ये आकस आहे, अशात शिंदे यांचे हे विधान त्या भावना पुन्हा चिघळवणारे ठरले.

  3. सत्ताधारी महायुती असूनही 'जय गुजरात'च्या वादामुळे शिंदे-फडणवीस जोडी बॅकफुटवर गेली आहे.

Eknath Shinde : हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून माघार घेतल्याने सत्ताधारी महायुती दणदणीत बहुमत असूनही बॅकफुटवर गेल्याचा संदेश राज्यात गेला. माघार घेतल्याने ठाकरे बंधूंचा संभाव्य एकत्रित मोर्चा टाळता येईल असा होरा शिंदे-फडणवीस जोडीचा होता. ऐन अधिवेशन काळात निघणारा हा मोर्चा त्रासदायक ठरू शकतो, अशी शक्यता वाटल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्याची तत्परता दाखवली असे बोलले जाते.

पण शिंदे-फडणवीस जोडगोळीचा अंदाज चुकवत ठाकरे बंधूंनी थेट 'विजयी' मेळाव्याची घोषणा केली. हाच विजयी मेळावा अवघा 24 तास उरला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या हातात आयते कोलित दिले आहे. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण संपल्यावर "जय हिंद, जय महाराष्ट्र" म्हंटले, काही क्षण थांबले आणि पुन्हा 'जय गुजरात'चा नारा दिला.

या नाऱ्यावरून शिंदे अवघ्या तासाभरात विरोधकांच्या खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या टीकेचे धनी झाले आहेत. जे की सहाजिक होते. खरंतर गुजरात हे भारतातीलच एक राज्य. पण गुजरातबद्दल महाराष्ट्राच्या मनात अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासूनच एक वेगळी भावना आहे. संयुक्त महाराष्ट्रासोबतच महागुजरात ही चळवळ सुरु झाली होती. या चळवळीने त्यावेळी मुंबईसह गुजरातची मागणी केली होती.

काँग्रेसचे तेव्हाचे दिग्गज गुजराती नेते आणि तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी तर मुंबईला एकतर गुजरातसोबत जोडावे किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून ठेवावे, अशी मागणी केली होती. म्हणजे मुंबई महाराष्ट्राला देऊच नये अशी आक्रमक भूमिका देसाई यांनी घेतली होती. त्यानंतर जवळपास 106 जणांनी बलिदान दिले आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही गुजराती जोडगोळी सत्तास्थानी बसल्यानंतर महाराष्ट्राच्या मनात गुजरातबद्दल पुन्हा आकस निर्माण झाला. दोघेही मुळचे गुजराती असल्याने त्यांचे गुजरातवर प्रेम असणे सहाजिक आहे. त्यामुळे मागच्या 10 वर्षांमध्ये सरकारने गुजरातला झुकतं माप दिलं असं म्हटलं जाऊ लागलं. गुजरात विविध प्रकल्प दिले गेले अशी टीका होत राहिली.

भाजपसोबत काडीमोड झाल्यानंतर तर शिवसेनेने त्यांच्या प्रचारामध्ये, टीकांमध्ये सतत गुजरात आणि मोदी-शाह यांना ठेवले. त्यामुळे हा आकस आणखी वाढत गेला. मुंबई आणि महाराष्ट्रातील काही प्रकल्प, महत्त्वाची कार्यलये गुजरातला नेण्यात आली. मुंबईचे महत्व कमी करण्याचा डाव सुरु आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, हे शिवसेनेचे कॅम्पेनिंगच बनले.

Maharashtra DCM Eknath Shinde faces protests after raising “Jai Gujarat” slogan during Amit Shah’s visit to Pune.
Eknath Shinde : शहांसमोर एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’चा नारा; 2022 मधील बंडाची आठवण अन् तोंडभरून कौतुकही...

हे आरोप-प्रत्यारोप एका बाजूला होत राहिले. दुसऱ्या बाजूला 3 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांनी शिवसेनेतून फुटून थेट गुजरातमधील सुरत गाठली. तिथून आसाममधील गुवाहाटीला गेले. हे सगळे बंड देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने आणि नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या आशीर्वादाने झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अशात आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, नॅशनल मरीन पोलिस अॅकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स अशा संस्था, फॉक्सकॉन-वेदांता सारखे प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, एअर बस टाटा असे प्रकल्प गुजरातला नेल्याची टीका आजही होते. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी, धारावीचा रिडेव्हलपमेंट प्रकल्प गुजरातच्या अदानी समुहाला देण्यात आल्यानंतरही मोदी-शाह यांच्यावर टीका झाली.

या गोष्टी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घडल्या. त्यामुळे गुजरातची भरभराट करण्यासाठी झटणारा, मोदी-शाह यांच्या प्रत्येक निर्णयापुढे मान तुकवणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उभी केली. एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने गुजरातचे, नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे लांगुलचालन करत असल्याची टीका झाली.

अलिकडेच हिंदी सक्ती झाली त्यात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे पुन्हा मराठी विरोध, महाराष्ट्र विरोध या गोष्टी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला सहन करावा लागला. आता एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असे ओघात म्हंटले ते त्यांच्या चांगलेच अंगलट येऊ शकते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पहिल्या तासाभरातच आपली प्रतिक्रिया देऊन या विषयाकडे लक्ष वेधले.

Maharashtra DCM Eknath Shinde faces protests after raising “Jai Gujarat” slogan during Amit Shah’s visit to Pune.
Eknath Shinde : शिवसेनेच्या बोलबच्चन मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं : गोगावलेंमुळे सगळेच तावडीत सापडले

सध्या महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचा एकत्रित विजयी मेळावा शनिवारी (5 जुलै) पार पडत आहे. यात दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. खरंतर टीका, आरोप या गोष्टींची राजकीय नेत्यांना सवय असते. पण सध्याच्या व्हायरल युगात गोष्टी लगेचच व्हायरल होतात.

शिंदे यांची तयार झालेली प्रतिमा आणि त्यांचे व्हायरल झालेले 'जय गुजरात' याचा ते कसा प्रतिकार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. जर ठाकरे बंधूंनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा विषय पेटता ठेवल्यास आणि त्यावर शिंदे यांनी समाधानकार पडदा न टाकल्यास त्यांच्यासाठी येत्या काळात हे प्रकरण अडचणीचे ठरणार हे नक्की.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  1. प्रश्न: 'जय गुजरात' वाद नेमका काय आहे?
    उत्तर: एकनाथ शिंदे यांनी भाषणात ‘जय गुजरात’ म्हटल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

  2. प्रश्न: महाराष्ट्रात गुजरातविषयी आकस का आहे?
    उत्तर: महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प, संस्था गुजरातला गेल्यामुळे जनतेत असंतोष आहे.

  3. प्रश्न: ठाकरे बंधूंचा मेळावा कोणत्या मुद्द्यावर होतो आहे?
    उत्तर: हिंदी सक्ती मागे घेतल्याने मेळावा होत आहे.

  4. प्रश्न: ‘जय गुजरात’ विधानामुळे कोणती राजकीय अडचण निर्माण झाली आहे?
    उत्तर: विरोधकांना शिंदे यांच्यावर 'महाराष्ट्रद्रोही' ठपका ठेवण्याची संधी मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com