Gokul Milk : गोकुळमध्ये 'महाडिकांना' नडले तिथंच 'मुश्रीफांचा' डाव गंडला; आबिटकरांनी टायमिंग साधून काढले उट्टे!

Gokul Milk : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्यात आले आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातो. भाजप आणि शिवसेनेच्या एकत्र येण्यामुळे प्रशासक आल्याचे दिसून येते.
Gokul Controversy; Hasan Mushrif
Gokul Controversy; Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on

Gokul Milk : अखेर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे. प्रशासक येऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिले. पण महाडिक गट, भाजप आणि शिवसेनेने एकत्र येत मुश्रीफ यांना हा धक्का दिल्याची चर्चा आहे. मात्र मागील वर्षभरातील मुश्रीफ यांच्या भूमिकांमुळेच प्रशासक लागू झाल्याची चर्चा आहे.

हसन मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघाची आगामी निवडणूक महायुतीत लढणार हे यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले. पण निवडणुकीच्या तोंडावरच भाजप आणि महाडिक गटाशी दुरावा ठेवला. तर लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला अंगावर घेतले. आता याच गोष्टी त्यांना भोवल्याची चर्चा आहे.

हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी महाडिक विरोधकांना एकत्र करून 'गोकुळ'मध्ये सत्तांतर घडवले. महाडिक गट आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील गट वगळता सर्वच नेते मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासोबत राहिले. मात्र 5 वर्षात राज्यातील राजकारण बदलले, तशीच गोकुळमधील समीकरणेही बदलली.

गतवर्षी गोकुळच्या अध्यक्ष निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हस्तक्षेप केला. त्यानंतर अध्यक्षपदावर महायुतीचा अध्यक्ष म्हणून हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ विराजमान झाले. पण त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ यांनी शाहू आघाडीचा अध्यक्ष झाला, असे स्पष्ट केले.

Gokul Controversy; Hasan Mushrif
Gokul Politics : अखेर 'गोकुळ'वर प्रशासक! CM फडणवीसांनी 5 जणांच्या टीमवर सोपवला कारभार : मुश्रीफ अन् संचालक मंडळाला धक्का

कालांतराने मुश्रीफ हे गोकुळ दूध संघावर महायुतीचाच अध्यक्ष आहे, असे स्पष्ट करत राहिले. पण मुश्रीफ यांना भाषा का बदलावी लागली हा संशोधनाचा विषय आहे. गोकुळच्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली त्यावेळीही मंत्री मुश्रीफ हे महायुती म्हणूनच 'गोकुळ' लढणार असे वारंवार सांगत होते. मात्र महायुतीतील अन्य नेत्यांनी यावर थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

दुसरीकडे महायुतीत भाजपचे आणि 'गोकुळ'च्या राजकारणात महाडिक यांचे वर्चस्व असूनही त्यांना चर्चेत डावलण्यात आले. संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून मुश्रीफ यांच्यासह महायुतीच्या अन्य नेत्यांनी भाजप आणि पर्यायाने महाडिक गटासोबत दुरावा ठेवल्याचे दिसून आले.

मुश्रीफ यांच्या संचालकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, विनय कोरे यांची भेट घेतली. सतेज पाटील यांची भेट घेण्याचेही जाहीर केले. पण या सर्व घडामोडीत महाडिक गटाशी कोणतीच चर्चा संचालकांनी केली नाही. पहिल्यापासूनच मंत्री मुश्रीफ यांनी भाजपसह महाडिक यांच्याशी चर्चा केली असती, तर कदाचित आजची वेळ संघावर आली नसती.

कोणत्याही परिस्थितीत संघावर प्रशासक येऊ नये, यासाठी मंत्री मुश्रीफ हे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील होते. अगदी कालपर्यंत त्यांनी कोरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हे टाळण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. पण गेले महिनाभर जी शिष्टमंडळे फडणवीस-शिंदे यांना भेटली त्यांचा नुसताच हेलपाटा झाल्याचे दिसून येते.

Gokul Controversy; Hasan Mushrif
Gokul Politics : 'गोकुळ'मधील अदृश्य शक्तीचे पुढचे टार्गेट ठरले! विश्वास पाटील, अरुण डोंगळेची कसोटी

एवढंच काय तर महायुतीचे नेते म्हणून पालकमंत्री आबिटकर, आमदार कोरे किंवा संजय मंडलिक हे मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत होते ते प्रत्यक्षात त्यांच्यासोबत नव्हतेच, असेही या कारवाईवरून दिसते. प्रत्यक्षात पालकमंत्री आबिटकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मुश्रीफ आणि राष्ट्रवादीच्या विरोधातच तक्रारी केल्याचे समजते.

करवीर, राधानगरी व कागलमध्ये राष्ट्रवादीच आपल्या विरोधात असल्याची तक्रार आबिटकर यांनी शिंदे यांच्याकडे केली. एवढेच नव्हे तर लोकसभा, विधानसभेत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शिवसेना पक्षाला मदत केल्याचा दावाही आबिटकर यांनी केल्याची चर्चा आहे.

शिवाय मागील निवडणुकीत आमदार चंद्रदिप नरके यांनी महाडिक गटाच्या विरोधात त्वेषाने दंड थोपटले होते. पण 6 महिन्यापूर्वीच माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या जाहीर कार्यक्रमात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशिवाय गोकुळ अपूर्ण आहे, असे गौरवोद्गार नरके यांनीच काढले. त्यामुळे महाडिकांना वगळून 'गोकुळ'ची निवडणूक लढू नये, असा सूर महायुतीतील अन्य नेत्यांचा होता.

एकंदरीत गोकुळ दूध संघाच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ गटाने घेतलेली भूमिका हीच त्यांनाच नडली असल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com