Gopichand Padalkar : बाहेर आव्हाडांना भिडलेले पडळकर सभागृहात दादा भुसे अन्‌ तालिका अध्यक्षांना भिडले; ‘माझी लक्षवेधी रद्द करा’

Assembly Monsoon Session 2025 : शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले, पडळकरसाहेब, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन....वास्तविक तुम्ही वेळेवर उपस्थित नव्हते. त्यावर पडळकरांनी मी काल सकाळी उपस्थित होतो, असे ठणकावले. भुसे त्यांना ऐकून घ्या, असे सांगत असताना पडळकरांनी तुम्ही मला ऐकू नका, असे सांगितले. त्यामुळे भुसेही चिडले.
Dada Bhuse-Gopichand Padalkar
Dada Bhuse-Gopichand Padalkar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 18 July : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आज नोकर भरतीतील बिंदूनामावलीच्या मुद्यावरून तालिका अध्यक्ष आणि त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांना भिडले. मी थोडक्यात बोलणारच नाही, मला या विषयावर बोलायचं नाही. माझी लक्षवेधी रद्द करून टाका, अशी आक्रमक भूमिका पडळकरांनी घेतली. त्यावेळी शिक्षण मंत्री तालिका अध्यक्षांच्या मदतीला धावून आले. मात्र, पडळकर आणि भुसे यांच्यातही तू तू मै मै झाली. विधानभवनाच्या आवारात परवा जितेंद्र आव्हाडांना भिडलेले पडळकर आज सभागृहात तालिका अध्यक्ष आणि शिक्षण मंत्र्यांनाही तेवढ्याच ताकदीने भिडले.

राज्यातील सरळसेवा शिक्षक भरतीच्या संवर्गातील बिंदूनामवलीच्या तपासणीत मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आलेला आहे. सुमारे दोन ते तीन लाख हा फक्त शिक्षण विभागाचा आकडा आहे, मग आरक्षण देऊन काय उपयोग? सन १९७० पासून आलेल्या बिंदूनामावलीत अनेकदा बदल झाले आहेत. बिंदू निश्चित करण्याची एक प्रक्रिया आहे, असा विषय गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) मांडत होते. मात्र, तालिका अध्यक्षांनी पॉईंटेट प्रश्न विचारावा, अशी सूचना केली. त्यावर पडळकरांनी पॉईंटेट काही कळणार नाही, हा काय किरकोळ विषय नाही. जमत नसेल तर मी बोलत नाही. मला काय नुसतं बातमी देण्यासाठी बोलायचं नाही, अशी भूमिका घेतली.

त्यावर तालिका अध्यक्ष ‘आज सतरा लक्षवेधी आहेत, आपल्याला त्या वेळेवर घ्याव्या लागतील. आपण पाईंटेट प्रश्न विचारा,’ असे सांगत होते. मात्र, पडळकारांनी ‘मी तीन वेळा हा विषय सभागृहात काढला आहे. तुम्हाला वेळ नसेल तर मी या विषयावर बोलत नाही. पॉईंटर विषय कळाला पाहिजे ना, विषय गंभीर आहे, पाईंटेट मी बोलूच शकत नाही. मला या विषयावर बोलण्यासाठी वेळ द्यावा, असे तालिका अध्यक्षांना ते सांगत होते.

ते म्हणाले, हा मागासवर्गीयांचा विषय आहे. बिंदूमध्ये बदल झालेला आहे. याबाबत सरकारने निर्णय दिले आहेत. मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्तेत आला आणि तो खुल्या प्रवर्गात बसत असेल त्याला खुल्या प्रवर्गात घ्यावे, असे शासकीय निर्णय सांगतो. पण सध्या मागासवर्गीय विद्यार्थी गुणवत्तेत आला तर त्याला खुल्या प्रवर्गात घेतले जात नाही, त्याला त्याच्या जातीच्या बिंदूवर दाखवले जाते. त्यामुळे त्याला जागाच मिळू शकत नाही, त्याबाबत मी पुरावे घेऊन आलो आहे. मी काय फेक बोलत नाही.

सविस्तर मांडल्याशिवाय हा विषय कळणारच नाही. मी तीनवेळा मांडला आहे, नुसत्या बैठकाच झाल्या आहेत. पुणे महापालिकेत २००९ पासून झालेल्या नोकर भरतीत मिलन निगडे ह्या खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला ६६. ६७ टक्के गुण मिळाले होते. पण ओबीसीची १६, एससीचे तीन, एनटीचे तीन या विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. त्यांना खुल्या प्रवर्गात दाखविण्याची आवश्यकता होती. पण, त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही. गोपीचंद पडळकर बोलत असतानाच तालिका अध्यक्षांनी मंत्र्यांना उत्तर देण्याची सूचना केली. पण पडळकर काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नाही नाही, अजून पुढं विषय आहे, असे पडळकरांनी स्पष्ट केले. मात्र, तालिका अध्यक्ष हे वेळेकडे बोट दाखवत होते.

Dada Bhuse-Gopichand Padalkar
Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे शेजारी बसलेले असतानाच फडणवीस आदित्य ठाकरेंना म्हणाले, ‘आपल्याला पुढची भेट घ्यावीच लागेल....’

तालिका अध्यक्षांच्या निर्णयामुळे चिडलेल्या गोपीचंद पडळकारांनी मला या विषयावर बोलायचं नाही. माझी लक्षवेधी रद्द करून टाका, अशी आक्रमक भूमिका घेतली. अध्यक्ष हे प्रश्न विचारा, असे सांगत होते. मात्र, पडळकर हे प्रश्न नाही, मला उत्तर नकोय. तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल... दोन ते तीन लाख लोकांवर अन्याय केला आहे. ही सरकारची भूमिका असेल तर ती चुकीची भूमिका आहे, असेही त्यांनी सुनावले.

तालिका अध्यक्ष हे पडळकरांना प्रश्न विचारा, असे सांगत होते. मात्र, प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर या विषयावर काय बोलणार? या विषयांसदर्भात तुम्हाला काय कळालं, असा सवाल पडळकरांनी तालिका अध्यक्षांनाच विचारला.

तेवढ्यात शिक्षणमंत्री दादा भुसे बोलायला उठले. ते म्हणाले, पडळकरसाहेब, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन....वास्तविक तुम्ही वेळेवर उपस्थित नव्हते. त्यावर पडळकरांनी मी काल सकाळी उपस्थित होतो, असे ठणकावून सांगितले. दादा भुसे त्यांना ऐकून घ्या, असे सांगत असताना पडळकरांनी तुम्ही मला ऐकू नका, असे सांगितले. त्यामुळे भुसेही चिडले. तुम्ही मला ऐकू नका म्हणजे? असा सवाल त्यांनी केला. पडळकरही त्यावर म्हणजे ? असा सवाल करत होते. त्यामुळे वाद वाढत गेला.

Dada Bhuse-Gopichand Padalkar
Fadnavis on Jan Surakasha : जनसुरक्षा कायद्यावरून फडणवीसांनी घेतली आव्हाडांची शिकवणी; कोणावर कारवाई होऊ शकते, कोणावर नाही, हेही सांगितले

आपण नव्हता, तरी मी थांबून राहिलो आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘चौथी लक्षवेधी परत घ्या’ अशी मी तुम्हाला विनंती केली. त्यामुळे पडळकर, तुम्ही वस्तुस्थिती समजून घ्या. सध्या जी कार्यपद्धती आहे, ती तुम्ही ऐकून घ्यावी, असे आवाहन भुसे यांनी पडळकरांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com