Real Tiger : 'हास्य'नामा - 'वाघ' : फरक स्पष्ट करा!

Who is real Tiger : ‘मीच खरा वाघ,’ अशी डरकाळी ते फोडत असल्यानं फरकच समजेनासा झालाय.
Tigers
Tigerssarkarnama
Published on
Updated on

सध्या महाराष्ट्रात ढाण्या वाघांची संख्या वाढली आहे. चक्क मुंबईतही सुमारे तीन वर्षांपासून दोन वाघांचा वावर वाढलाय. याआधी येथे एकच वाघ होता. पहिल्या वाघाशी झुंजून वेगळं होऊन दुसऱ्या वाघानं आधीच्याची ‘टेरिटरी च्यालेंज’ केलीये. ‘मीच खरा वाघ,’ अशी डरकाळी ते फोडत असल्यानं फरकच समजेनासा झालाय. यावर फरक स्पष्ट करा, हा प्रश्नच म्हणे एका इयत्तेला परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत आला होता म्हणे... त्यासाठी आपण दोघांमधील फरक स्पष्ट करूयात...

प्रस्थापित वाघ -

*या वाघाला वारसा असल्याने एके काळी याचा दबदबा होता. त्याला शिकारीबरोबरच  तळ्यात जाऊन डुंबायला आवडत असे. तेथील ‘कमळं’ त्याला फारच आवडायची. वाघ असूनही ‘कमळां’शी त्यानं थोडी थोडकी नव्हे तर २५ वर्षे दोस्ती केली. पण नंतर त्याच्या असं लक्षात आलं की या ‘कमळा’च्या नादी लागून आपण त्या तळ्यात गुंतून पडल्याने त्याचे अंग ‘सडू’ लागले. मग त्याने ही कमळाशी दोस्ती तोडली.

*मुंबईत असल्यामुळे या वाघाला तेथील माणसांच्या सवयी लागल्या आहेत. त्याला गुहेत ‘मशाल’ लावायला आवडतं. अन् तो सदैव ‘पंजा’ला गोंजारत असतो. 

*हा वाघ आपल्या क्षेत्रात फिरणं फारसं पसंत करत नाही. आपल्या गुहेत बसून राहणं त्याला आवडतं. शिकारीसाठीच फक्त बाहेर पडतो. आता दुसरा वाघ त्याच्या क्षेत्रात आल्यामुळे या वाघाचाही बाहेर वावर दिसू लागला आहे. अधून मधून तो डरकाळ्या फोडताना दिसत आहे.

*या वाघाला ‘वाघ म्हंटलं काय किंवा वाघोबा म्हंटल’ तरी खाईलच याची ग्यारंटी नाही

*या वाघानं शिकारीसाठी बराच दीर्घ पल्ल्याचा प्रवास केला आहे. दिल्ली-बारामती अशा वेगवेगळ्या ‘टेरिटरी’त जाऊन या वाघानं आपली शिकार साध्य केली आहे.

Tigers
Top Ten News : महायुतीच्या दोन आमदारांना समन्स ; अजितदादा दांडीबहाद्दर धनुभाऊ आजारी असल्याचं सांगत होते; पण... - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

*या वाघाला आपल्या अनेक क्षेत्रांतून माघार घ्यावी लागल्याने तो धुसफूसत आहे. गुरगुरत आहे. प्रतिहल्ल्याच्या संधीची वाट पाहत आहे.

*हा वाघ फारसा कुणाला वरचढ होऊ देत नाही. आपला साथीदारही वरचढ व्हायला लागला तर त्याचीच शिकार करतो. 

*या वाघाला तुम्ही पाहण्यासाठी गेला, तर त्याचं दर्शन होईलच याची ग्यारंटी नसते. त्याच्या दर्शनासाठी कित्येक जण ताटकळतात. पण त्याचं दर्शन काही होत नाही.

*या वाघाने कधी काळी गुजरातमधील ‘गीरच्या सिंहा’शी केली होती, आता मात्र त्यांचे बिनसल्याने तो या सिंहांवरही हल्ले करून घायाळ करतो.

*याच्या प्रतिस्पर्धी वाघाला घायाळ करण्याची संधी तो कधीच सोडत नाही. कधी नखे दाखवतो. कधी नखे दाखवायचा आव आणतो. कधी कधी डरकाळ्या मात्र फार फोडतो. करत काहीच नाही...

बंडखोर वाघ -

*हा वाघ पहिल्या वाघापासून फुटून बंडखोरी करून बाहेर पडला. पहिल्या वाघाप्रमाणेच याला ‘कमळं’ आवडत होती. कमळाचा नाद पहिल्या वाघानं सोडल्यानं हा वाघ नाराज झाला. त्यानं एके दिवशी पहिल्या वाघाचा नाद सोडून तो ‘कमळा’च्या सहवासात त्यांच्याशी दोस्ती करून राहू लागला. 

*या वाघानं बंडखोरी करताना पहिल्या वाघाच्या गुहेत सापडलेलं ‘धनुष्य-बाण’ पळवून आणलंय. यालाही मुंबईत राहून माणसांच्या सवयी लागल्यात. ‘टायमिंग’ साधण्यासाठी ‘घड्याळ’ फार आवडू लागलं आहे. कमळाच्या सहवासातून हा पहिल्या वाघावर शरसंधान करत असतो.

*हा वाघ सतत फिरत असतो. त्याला गुहेत बसून राहणं फारसं आवडत नाही. ठाण्यापासून सुरुवात करून त्याचा अवघ्या महाराष्ट्रात संचार असतो. आता तो पहिल्या वाघाच्या क्षेत्रात म्हणजे मुंबईत आपला दबदबा वाढवत आहे. पहिल्या वाघाच्या शिकारीच्या सर्व ठिकाणांवर त्याला कब्जा करायचा आहे. 

*या वाघाला ‘वाघ म्हणा किंवा वाघोबा म्हणा’ हा खाणारच. पहिल्या वाघाच्या शिकारी हिसकावूनही तो खातो.

*या वाघाचा पहिल्या वाघाच्या गुहेसह मुंबईच्या ‘टेरिटरी’वर डोळा आहे.  त्यानं पहिल्या वाघाला मागच्या झुंजीत लोळवलं होतं. पण पहिल्या वाघानं हार मानलेली नाही. आता पुन्हा दोघांत मोठी निर्णायक झुंज होण्याची चिन्हे आहेत. 

*या वाघाने पहिल्या वाघाच्या अनेक क्षेत्रांत वावर सुरू केला आहे. आता तो पहिल्या वाघाच्या गुहेत घुसून त्याला जायबंदी करण्याच्या तयारीत आहे.

Tigers
Vande Bharat Express : 'आयफेल टॉवर'पेक्षाही अधिक उंच पूलावरून धावणार 'वंदे भारत एक्स्प्रेस'

*हा वाघ वरचढ होऊ लागताच पहिल्या वाघाने त्याच्यावर कुरघोडी करून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मग या वाघाने पहिल्या वाघावर प्रतिहल्ला करून त्याला लोळवले.

*या वाघाला तुम्हा पाहण्यासाठी गेलात तर त्याच हमखास दर्शन होण्याची ग्यारंटी असते. हा वाघ अधूनमधून साताऱ्यातील आपल्या मूळ जंगलात गेलाच तर त्याचं दर्शन होण्याची शक्यता नसते.

*या वाघाची सध्या गुजरातमधील ‘गीरच्या सिंहा’शी गट्टी आहे. गुजरातचे सिंह आणि हा वाघ एकत्र मिळून पहिल्या वाघावर हल्ले करत असून त्याला घायाळ करत असतात.

*पहिल्या वाघाला घायाळ करण्याची संधी हाही वाघ कधीच सोडत नाही. मात्र, सध्या त्याला कमळाच्या गंधाने एवढी भूल घातली आहे, की त्याच्या कमळाच्या मुळांच्या गड्ड्यात त्याचे पाय अडकल्याने तो हतबल झाल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com