
.Maharashtra Political News : अखेर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सलग दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्राकडे राहणार आहे. शिवाय पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्षपद सातारा जिल्ह्याकडे देण्यात आले आहे.
खरंतर पक्षफुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी अनेक नेते खंबीरपणे उभे राहिले होते. नागपूरचे अनिल देशमुख, मराठवाड्यातील जालन्याचे राजेश टोपे, ठाण्यातील जितेंद्र आव्हाड या निष्ठावंतांनी अनेक त्रासानंतरही पवारांची साथ सोडली नाही. पण, पवारांनी पक्षाची धुरा पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राकडे विशेषतः एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे यांच्याकडेच सोपवली आहे. साताऱ्याकडेच प्रदेशाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेऊन पवारांनी पुन्हा एकदा मोठी राजकीय खेळल्याची चर्चा रंगली आहे.
नवी मुंबई (वाशी मार्केट) बाजार समितीत सचिव म्हणून काम करणारे शशिकांत शिंदे यांना छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले. माथाडी कामगारांमध्ये शिंदे यांची आजही मोठी क्रेझ आहे. पवारांनी त्यांच्यातील स्पार्क ओळखून त्यांना साताऱ्यात आणले. त्यांना 1999 मध्ये जावळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिट देण्यात आले होते. पहिल्याच फटक्यात शिंदे तब्बल 12 हजार मतांनी विजयी झाले. 2004 मध्येही त्यांनी बाजी मारली.
2009 मध्ये जावळी तालुका सातारा विधानसभा मतदारसंघाला जोडला. तिथे शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यामुळे शरद पवारांनी शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी कोरेगावमधून राष्ट्रवादीच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि त्यावेळच्या महसूल मंत्री शालिनीताई पाटील आमदार होत्या. पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा त्यांना फटका बसला.
तिथून शिंदे यांनी मागे वळून पाहिले नाही. दोनवेळा निवडून आलेल्या शालिनीताईंचा शिंदेंनी तब्बल 31 हजार मतांनी पराभव केला. पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले. 2014 मध्ये तर शिंदे यांचा 42 हजारांच्या मताधिक्क्याने विजय झाला. 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीतही शिंदे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याने पवारांना खंबीर साथ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून पक्षाचे दोन खासदार निवडून आले होते. श्रीनिवास पाटील आणि लक्ष्मणराव पाटील हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून श्रीनिवास पाटील हे निवडून आले होते, त्यामुळे सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.
या सातारा जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, सातारा, वाई, कराड उत्तर, पाटण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. विलासराव पाटील उंडाळकर आणि नंतरच्या काळात शंभूराज देसाई वगळता सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून यायच्या. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हाती एकही जागा लागलेली नाही, त्यामुळे पक्षाचा ढासळलेला बुरुज पुन्हा सावरण्यासाठी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यश मिळाले नसले तरी लोकसभा निवडणुकीत याच शशिकांत शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना जेरीस आणले होते. त्या निवडणुकीत तुतारी आणि ट्रम्पेट चिन्हातील साधर्म्यामुळे शिंदे यांचा पराभव झाला आहे. अन्यथा शिंदे यांनी बाजी मारलीच होती, त्यामुळे बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिंदेंच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
शशिकांत शिंदे हे कोरेगाव मतदारसंघातून शालिनीताई पाटील यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. याशिवाय माथाडी कामगारांचे नेते अशी त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील दोन्ही राजांना भिडण्याची ताकद केवळ शशिकांत शिंदे यांच्यातच असून जिल्ह्यात राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्यासारख्या लढवय्या नेत्याच्या हाती पक्षाची धुरा आली, ही एका अर्थाने योग्य निर्णय मानला जात आहे. मात्र, कसोटीला उतरण्याची जबाबदारी शिंदेंवर असणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकारणाचा गाभा मानला जातो. याच भागातून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत बळ मिळत गेले आहे. त्या दृष्टिकोनातूनच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या भागाशी कनेक्ट असणारा नेता म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.
जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद असतानाही शिंदे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा दौरा करून पक्ष संघटनेचा आढावा घेतला होता. त्यामुळे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला सिद्ध करण्याचे कडवे आव्हान शशिकांत शिंदे यांच्यापुढे असणार आहे.
विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून चार, तर सांगलीतून जयंत पाटील, पुणे शहरातील वडगाव शेरीचे बापू पठारे वगळता सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही, त्यामुळे पडझड झालेल्या पश्चिम महाराष्ट्राची डागडुजी करण्याचे मोठे चॅलेंज शिंदेपुढे असणार आहे.
ठाण्याचे जितेंद्र आव्हाड, जालन्याचे राजेश टोपे, नागपूरचे अनिल देशमुख आदी मोठे नेतेही पवारांच्या सोबत आहेत. यातील राजेश टोपे आणि अनिल देशमुख यांचा पराभव झाला असला तरी हे नेते आपल्या भागात ताकद राखून आहेत. पण, पवारांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रालाच संधी दिली आहे. आता बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्याची जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर असणार आहे.
धडाकेबाज नेतृत्वशैली, कोणालाही भिडण्याची ताकद, पवारांवरील निष्ठा, माथाडी कामगारांमधील ताकद शशिकांत शिंदे यांच्यासाठी जमेच्या ठरतात. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑफर असतानाही केवळ पवारांवरील प्रेमापोटी शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही, त्यामुळेच शिंदेंच्या खांद्यावर पवारांनी पक्षाची धुरा सोपवल्याचे मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.