

- कोमल जाधव
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. नुकताच मातोश्री बंगल्यावर ठाकरे यांच्या उपस्थितीत खांडे यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. विशेष म्हणजे याच खांडेंची 4 वर्षांपूर्वी ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तिथे असताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा प्रचार केला नव्हता. याबाबत त्यांचे एक कथित कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाले होते. आता पुन्हा खांडे यांनी ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला आहे.
कुंडलिक खांडे यांनी शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पण 2021 ला पहिल्यांदा शिवसेना एक होती तेव्हा ठाकरेंनी अन् २०२४ ला शिंदेंनी त्यांना पक्षातून हाकलून लावलं होतं. पण आता आगामी नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच माजी शिवसैनिकाला, बीड जिल्हाप्रमुखाला म्हणजेच कुंडलिक खांडेंना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत पक्षप्रवेश दिला. त्यासाठी ते स्वत: उपस्थित होते. त्यासाठी खांडेंनीही मातोश्री गाठली आणि पुन्हा एकदा घरवापसी केली.
खांडे यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरे म्हणाले, चूक झाली तर एक वेळ समजू शकतो पण अपराध होता कामा नये. एखाद्या वेळेला रागाच्या भरात, अनवधानाने चुकीचं पाऊल उचललं जाऊ शकतं. पण लक्षात आल्यानंतर चूक ही सुधारली गेली पाहिजे. आणि ती सुधारण्याची संधीही दिली गेली पाहिजे. कुंडलिक तुम्ही म्हणालात, एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत. आता एक तलवार तुम्ही काय आहात हे मला बघाय़चंय. त्याची ताकद किती, तिला किती धार लागली आहे, हे मला बघायचंय.
मध्ये 2-3 वर्ष तुम्ही नव्हतात ती तलवार धारदार आहे की गंजली आहे हे मला दाखवून द्या. शिवसेना पूर्वीपेक्षा वैभवशाली पाहिजे याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे. शेतकऱ्याला जवळ करा आणि पक्षाजवळ आणा, असं म्हणत ठाकरेंनी कुंडलिक खांडेंना एकप्रकारे चॅलेंज दिले. आता कुंडलिक खांडे हे आगामी बीड जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. बहिरवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील आहेत.
कुंडलिक खांडे कोण आहेत?
कुंडलिक खांडे हे बीड तालुक्यातील म्हाळसा जवळा गावातून येतात. त्यांनी राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु केला. त्यांची पत्नी बीड पंचायत समिती सदस्या होती. 2021 ला त्यांची बीड जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना पक्षफुटीनंतर खांडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. पण जून 2024 मध्ये पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिंदेंनीही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. दोन्ही पक्षात त्यांच्याकडे बीड जिल्हाप्रमुख राहिलेत
मधल्या काळात कोणत्याही पक्षासोबत नसताना त्यांनी सरपंच, उपसरपंच संघटना स्थापन करून काम केले. त्यानंतर त्यांनी संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज्य पक्षाकडून बीड विधानसभेत उमेदवारी मिळवली आणि निवडणूक लढली पण पराभूत झाले. आता कुंडलिक खांडे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले असून बहिरवाडी जिल्हा परिषद उमेदवारीसाठी प्रयत्न आहेत.
कुंडलिक खांडेंची वादग्रस्त प्रकरणं कोणती?
बीड येथे गुटखा तस्करी आणि छुपी विक्री प्रकरणामुळे वादात अडकले होते. 2021 मध्ये राज्यात गुटखाबंदी असतानाही बीड-इमामपूर रोडवर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा सापडला होता. याठिकाणी पोलिसांना विविध नाव असलेला गुटखा, टेम्पो, एक मोबाईल असा एकूण 32 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कुंडलिक खांडेंविरुद्धही आयपीसीच्या कलम 328, 272, 273 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, गुटखा प्रकरणात आरोपी असलेले कुंडलिक खांडे यांनी त्यावेळी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. शिवाय, एका कार्यकर्त्याचा फोन आल्याने आपण घटनास्थळी गेलो होतो. आपला गुटख्याशी काहीही संबंध नाही. पण विनाकारण पोलिसांनी आपल्याला गोवल्याचं म्हटलं होतं. तरी, या प्रकरणात नाव येताच शिवसेनेनं कारवाई करत कुंडलिक खांडेंना पहिल्यांदा बीड जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केलं.
पंकजा मुंडेंना धोका दिला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख असताना कुंडलिक खांडे यांची शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले होते. आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडेंना धोका दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये कुंडलिक खांडेंनी म्हटले होते. त्यामुळे महायुतीत मोठं वादळ निर्माण झालं.
बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे निवडून आले आहेत. पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. मराठा आंदोलनाचा फटका या ठिकाणी बसल्याचे बोलले गेले. धनंजय मुंडेंनीही कुंडलिक खांडेंवर टीका केली होती. ही ऑडियो क्लिप व्हायरल होताच कुंडलिक खांडे यांची पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत जून महिन्यात शिंदेंनी हकालपट्टी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.