Solapur, 31 March : माजी आमदार दिलीप माने यांनी आज (ता. ३१ मार्च) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माने यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी निश्चितपणे फायदा होईल. मात्र, मानेंचे लक्ष्य विधानसभा आहे. त्यामुळे पक्षनेतृत्वाने विशेषतः सुशीलकुमार शिंदे यांनी माने यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघाचा शब्द दिला आहे, याची उत्सुकता सोलापूरमध्ये आहे.
दिलीप माने (Dilip Mane) यांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यानंतरच्या 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत माने यांचा भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला. भाजप आणि शिवसेनेची हवा लक्षात घेऊन माने यांनी 2019 मध्ये शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. ती निवडणूक त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर प्रणिती शिंदे यांच्या विरोधात लढवली. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभेतील पराभवानंतर दिलीप माने हे पक्षीय राजकारणापासून लांब होते. मध्यंतरी महाविकास आघाडीच्या काळात ते पवारांच्या जवळ गेले होते. मात्र, कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. वर्षभरापूर्वी त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून आपण विधानसभेची निवडणूक लढवणार, अशी घोषणा केली होती. मात्र, पक्ष कोणता हे त्यांनी त्यावेळी सांगितले नव्हते. महाविकास आघाडीच्या लोकसभेसंदर्भात बैठका सुरू झाल्यानंतर त्यांनी त्या बैठकांना हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी ते काँग्रेसमध्ये जाणार, हे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, दक्षिण सोलापूरमधून त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनीही माने यांच्याप्रमाणे पूर्वीपासूनच शड्डू ठोकला आहे. तसेच, मागील निवडणुकीत शहरातून जाऊन दक्षिणमध्ये लढलेले बाबा मिस्त्री हेही पुन्हा लढण्यासाठी इच्छूक आहेत. तसेच हसापुरे यांचे बंधू रमेश हसापुरे यांनी तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे शिंदे यातून कसा तोडगा काढणार आणि कोणत्या विधानसभेची उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
‘सोलापूर शहर मध्य’चा पर्याय
प्रणिती शिंदे ह्या सध्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे लोकसभेला विजयी झाल्या तर सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघही रिकामा होऊ शकतो. त्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा पर्याय ही शिंदे यांच्याकडे माने यांच्यासाठी असू शकतो. त्याच मतदारसंघातून माने यांनी मागील निवडणूक लढवली होती. मात्र, त्यासाठी प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवावे लागेल, त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांनी माने यांना कोणत्या मतदारसंघाचा शब्द दिला हे जाणून घेण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकाल अथवा विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.