Mahadevi Elephant : एका हत्तीणीसाठी एक अखंड जिल्हा हळहळतोय, रडतोय असं कधी चित्र पाहिलं आहे का? मागच्या महिन्यभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात हे चित्र बघायला मिळत आहे. एका टोकाला असलेल्या शिरोळ तालुक्याच्या छोट्याश्या गावातील महादेवी ही हत्तीण गावकऱ्यांना सोडून दुसरीकडे गेली आहे. यासाठी दुसऱ्या टोकावर असलेल्या गडहिंग्जल तालुक्यातील नागरिकही भावुक झाले आहेत.
या हत्तीणीला आपल्याजवळ ठेवण्यासाठी कोल्हापूरकरांनी सरकारला विनंती केली, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण न्यायालयानेही म्हणणं न ऐकल्यावर मात्र संताप अनावर झाला अन् त्यातूनच दगडफेक झाली. आता तर थेट 'जियो' सीम कार्डलाच टार्गेट करायचे सुरु आहे. बायकॉट जियो हा ट्रेंडच कोल्हापूरमध्ये सुरु झाला आहे.
पण कोण आहे ही हत्तीण? ती या गावात आली कुठून? गावकऱ्यांचे तिच्याशी काय नाते आहे? गावकरी एवढे का भावनिक झाले? संतप्त झाले? काय आहे हा इतिहास? काय आहे तिची कहाणी?
तब्बल 1300 वर्षांचा धार्मिक इतिहास असणाऱ्या नांदणी या छोट्याशा गावात जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या 748 गावांचा हा मठ केंद्रबिंदू आहे. राजा अकबराने या संस्थानाला हत्ती भेट दिल्याचे सांगण्यात येते. तेव्हापासून या मठात हत्ती पाळण्याची प्रथा, परंपरा आहे. महादेवी ही हत्तीण या परंपरेचं प्रतिनिधित्व करत होती.
सुमारे 35 वर्षांपूर्वी अवघ्या 6 वर्षांची असताना महादेवी हत्तीणीला कर्नाटकातील जंगलातून या मठात आणण्यात आले. मागच्या साडे तीन दशकांत तिने पंचक्रोशीत आपुलकीची भावना निर्माण केली. आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावाने तिने आबालवृद्धांना आपलेसे करून घेतले. नांदणी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरढोण याबरोबरच परिसरातील गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस तरी तिचे हमखास दर्शन व्हायचे.
रोज 10 किलोमीटरचा प्रवास, गावच्या बाजारातून मुक्त फेरफटका असल्याने महादेवीचा ग्रामस्थांसोबत एक प्रकारचा लळाच लागला होता. जणू ती या तालुक्याच्या घरातील एक लेकच बनली होती. तिला माधुरी असेही नाव मिळाले. तिच्या मार्गावर अनेकजण आवडीचा खाऊ द्यायचे, ‘महादेवी’ कडूनही कृतज्ञतापूर्वक डोक्यावर सोंड ठेवून आशीर्वाद दिला जायचा. नांदणीच्या निषेदिकेवर 24 तीर्थंकरांच्या दर्शनानंतर श्रावक आणि भाविक हमखास ‘महादेवी’चे दर्शन घ्यायचे.
पण 2018 मध्ये महादेवीची देखभाल करणारा नागाप्पा हा माहूत हदयविकाराच्या तीव्र झटक्याने आजारी पडला. डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. इथूनच महादेवी पेटा या प्राणी संस्थेच्या नजरेत आली. या संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात महादेवी हत्तीणीचे संगोपन होत नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली. काही वर्षांपूर्वी 'वनतारा' या गुजरातमधील अंबानी कुटुंबियांच्या खाजगी प्राणी संग्रहालयानेही पेटाची साथ दिली.
मठात महादेवी हत्तीणीचे संगोपन होत नाही, आजारी काळात तिच्याकडे लक्ष दिले जात नाही, मठातील भट्टारक स्वामींना आपटून मारल्याचे तक्रार देखील या याचिकेत देण्यात आली होती. याशिवाय मठावर वनविभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला. याच याचिकेवर उच्च न्यायालयाने महिनाभरापूर्वी महादेवीला गुजरात मधील वनतारा संग्रहालयात पाठवण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाच्या या निर्देशाला ग्रामस्थांसह मठाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. महादेवीला वाचवण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला. पण 4 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुजरातच्या वनतारा या प्राणी देखभाल केंद्रात तिची रवानगी केली. लोकांनीही आपल्या कुटुंबातीलच एक मानलेल्या ‘महादेवी’ला नेताना भावना दाटून आल्या.
‘महादेवी’ नांदणीच्या मठातच रहावी, यासाठी गेल्या 5 वर्षांपासून न्यायालयीन मार्गांचा अवलंब करण्यात आला. तरीही यात अपयश आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मान राखत आम्ही तिला 'वनतारा'ला सुपूर्द करण्याची भूमिका स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केली. ‘महादेवी' हत्तीणीच्या विरहाने नांदणीबरोबरच संस्थानच्या 743 गावांमध्ये कमालीची व्याकुळता निर्माण झाली आहे.
महादेवी महाराष्ट्र, कर्नाटकातील पंचकल्याण पूजा महोत्सवांबरोबरच सर्वधर्मियांच्या उत्सवांमध्ये आवर्जून उपस्थिती लावायची. आता सर्वधर्मियांना तिची प्रकर्षाने उणीव भासणार आहे. तिचा डामडौल, राजेशाही थाट, मिळणारा आशीर्वाद, मुलांमधील विशेष आकर्षण या साऱ्या बाबी आता केवळ आठवणीच राहणार आहेत.
सोमवारी महादेवीला घेऊन जाण्यासाठी अॅनिमल अॅम्बुलन्स दाखल झाली. गावातून तिच्या निरोपाची रॅली निघाली. संपूर्ण गाव शोक सागरात बुडाले. 35 वर्षांपासून सोबत असलेली महादेवी आपल्यातून जाणार या भावनेने ग्रामस्थ व्याकुळ झाले. अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी केली. महादेवी जात असताना संताप अनावर झाल्याने अनेकांनी थेट पोलिसांच्या गाडींना लक्ष केले. जवळपास 12 पोलीस जखमी झाले. तरी देखील महादेवीला गुजरात कडे रवाना केले.
या संपूर्ण प्रकरणानंतर ग्रामस्थांचा अंबानी समूहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्या हत्तीणीला घेऊन गेला तर तुमचे जिओ देखील आम्हाला नको. हीच भूमिका घेऊन रिलायन्स समूहाचे जिओ सीमकार्डवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु झाली आहे. दोन दिवसांपासून अनेकांनी जिओ सीम पोर्टिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जिओ कडून अशा ग्रामस्थांना संपर्क करण्यात येत आहे. त्यांची समजूत काढण्यास कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.