
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकतर्फी विजय मिळाला. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला. महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. त्यामुळे एकीकडे आता मुख्यमंत्री, मंत्रिपदासाठी स्पर्धा वाढू लागली आहे. त्यातच राज्यातील राजकारणात 'या' वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पती-पत्नी सक्रिय झाले असल्याचे पाहवयास मिळते. त्यामध्ये चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पती किंवा पत्नी आमदार झाले आहेत.
महाराष्ट्राला सेवाभावी आणि सेवानिवृत्तांचा मोठा इतिहास लाभला आहे. त्यातूनच आता राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पती किंवा पत्नी राजकारणात सक्रिय झाल्याचे पहावयास मिळते. तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नी तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे पती विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत.
राज्याच्या एमपीएससीच्या सचिव सुवर्णा खरात यांचे पती सिद्धार्थ खरात हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या राखीव मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांना शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली असून पहिल्यांदा ते विधानसभेत पोहचले आहेत. त्यांनी या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांचा सुमारे चार हजार मताच्या फरकाने पराभव केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव व वर्ग एकचे अधिकारी विद्याधर महाले यांच्या पत्नी श्वेता महाले या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्या चिखली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून (Bjp) दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्यांनी या मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसच्या राहुल बोन्द्रे यांचा सुमारे तीन हजार 202 मताने पराभव केला.
आयपीएस अधिकारी दीपक साकोरे यांच्या पत्नी मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. जिंतूर मतदारसंघातून त्या भाजपकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत होत्या. त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांनी यापूर्वी जिंतूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून राष्टवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार विजय भांबळे यांचा 4 हजार 500 मताने पराभव केला.
पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या संभाजीनगर जिल्ह्यातून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. त्या फुलंब्री मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. या पूर्वी फुलंब्री मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी मंत्री हरिभाऊ बागडे हे करीत होते.
सहा महिन्यापूर्वी त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागली होती. त्यामुळे या निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून भाजपकडून अनुराधा चव्हाण या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा सुमारे 32 हजार मताने पराभव केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.