Manohar Joshi Death : 'या सभेला प्रमोद महाजन उपस्थित राहायला हवे होते....'

Manohar Joshi Passed Away Shiv Sena News : उमरग्यातील ऐतिहासिक सभेत मनोहर जोशींनी केली होती आठवण; आक्रमक नव्हे, शांत, संयमी भाषेत त्यांनी सभा गाजवल्या...
Manohar Joshi, Pramod Mahajan
Manohar Joshi, Pramod MahajanSarkarnama

Manohar Joshi Shiv Sena News :

वर्ष 1995, स्थळ उमरगा (जि. धाराशिव)... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहसिक सभा होती ती. ही सभा आणि त्यासाठी जमलेली गर्दी पाहायला प्रमोद महाजन साहेब आज उपस्थित राहायला हवे होते... मनोहर जोशी बोलत होते. त्याला कारणही तसेच होते. उमरगा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला होता. तो Shiv sena साठी सोडवून घ्यावा, असा आग्रह स्थानिक कार्यकर्त्यांचा होता. त्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. ती गर्दी पाहून मनोहर जोशी यांनी प्रमोद महाजन यांची आठवण काढली होती.

सर या नावाने सर्वपरिचित असलेल्या मनोहर जोशींनी मराठवाड्यासह राज्यभर सभा गाजवल्या. त्या आक्रमक वक्तृत्वाने नव्हे तर सभ्य, शांत, संयमी भाषाशैलीने. उमरगा येथील त्या सभेत अशोक सांगवे नावाचा निष्ठावंत शिवसैनिक समोर प्रेक्षकांमध्ये बसलेला होता. मनोहर जोशी बोलायला उठले. त्यांनी अशोक सांगवे यांना व्यासपीठावर बोलावून घेऊन त्यांचा सत्कार केला. भाजपच्या वाट्याला असलेला उमरगा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा, अशी मागणी रेटून धरणाऱ्यांमध्ये सांगवे अग्रस्थानी होते. ती मागणी आणि त्या अनुषंगाने त्या सभेला झालेली गर्दी पाहून Manohar Joshi भारावून गेले होते. त्यामुळे त्यांनी सांगवे यांचा सत्कार केला होता आणि म्हणाले होते, प्रमोद महाजन या सभेला उपस्थित राहायला हवे होते, म्हणजे त्यांनी लगेच हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला असता...!

Manohar Joshi, Pramod Mahajan
Manohar Joshi : पंतांनी लग्नात स्वतःलाच दिला हुंडा !

पाच वर्षांपूर्वी मुंबईतील गोरेगाव येथे शिवसेनेचे शिबिर झाले होते. त्यावेळी जोशी सरांनी आवर्जून उपस्थिती लावत मार्गदर्शनही केले होते. त्यावेळी ते थकल्यासारखे वाटत होते, पण त्यांच्या आवाजातील भारदस्तपणा कायम होता. कुठे, काय आणि किती बोलायचे, याची चांगली समज जोशी सरांना होती. आजकाल माइक हातात आला की काहीही बरळणाऱ्या राजकीय नेत्यांनी जोशी सरांची भाषणे नक्कीच ऐकायला हवीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जेथे जेथे सभा झाल्या, तेथे मनोहर जोशी त्यांच्यासोबत उपस्थित राहत असत. मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोशी सरांच्या सभा झाल्या. सर्व सभांमध्ये ते मुद्द्याला धरून बोलायचे. समोर प्रचंड गर्दी दिसली की काही नेत्यांचा तोल सुटतो. मात्र, जोशी सरांच्या बाबतीत, असे कधीच झाले नाही. कितीही गर्दी असली तरी ते शांतपणे, मुद्द्याला धरून बोलत असत, अशी आठवण उमरगा येथील शिवसेनेचे नेते जितेंद्र शिंदे सांगतात.

2009 च्या निवडणुकीदरम्यान बार्शी येथे जोशी सरांची सभा झाली होती. बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर असले की ते कमी, पण मुद्देसूद बोलायचे. त्यांच्या हाताशी नेहमी अचूक आकडेवारी असायची. त्याचा ते भाषणात वापर करायचे. विरोधकांवर टीका करताना त्यांनी कधीही पातळी सोडली नाही आणि कधी आक्रस्ताळेपणाही केला नाही. विरोधकांवर तोंडसुख घेणे हा प्रकार तर त्यांनी माहीतच नव्हता. त्यांनी लोकप्रिय विधानेही कधी केली नाहीत. शांत, संयमाने बोलूनही विरोधकांना उघडे पाडता येते, हे जोशी सरांनी अनेक वेळा दाखवून दिले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोहर जोशी यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला होता. त्यामुळेच त्यांच्या बोलण्यात, वागण्यात शालीनता, संयम होता. त्यांच्या वडिलांना व्यवसायात अपयश आले. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी परिसरातील 80 गावांत भिक्षुकी केली. मनोहर जोशी यांनीही काही काळ भिक्षुकी केली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते शिक्षक बनले होते.

रायगडजळील नांदवी हे त्यांचे मूळ गाव. रायगड जिल्ह्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईत आपल्या बहिणीकडे आले. त्यावेळी एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून त्यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला होता. अशा विपरित परिस्थितीत जोशी सरांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली होती. शिक्षक असल्यामुळे त्यांच्या भाषणात मुद्देसूदपणा असायचा, भाषा सभ्य असायची. सध्याच्या राजकीय नेत्यांची वक्तव्ये, आरोप-प्रत्यारोपांची पातळी पाहता राजकारणात मनोहर जोशी सरांसारखे नेते असणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव होते. त्यांच्या जाण्यामुळे न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे.

एकच पक्ष, एकच निष्ठा आणि लाखो शिवसैनिक...

वयाची 85 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका वृत्तवाहिनीने मनोहर जोशी यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना मनोहर जोशी यांनी, माझा पक्ष एकच, तो म्हणजे शिवसेना, असे सांगितले होते. बाळासाहेबांनी माझ्यावर खूप प्रेम केले, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हेही माझ्यावर खूप प्रेम करतात. एकच पक्ष, एकच निष्ठा आणि लाखो शिवसैनिक....असे स्पष्ट करत बाळासाहेब ठाकरे यांनी मला घडवले, सर्व पदे दिली, असे ते म्हणाले होते. शिवसेनेत फूट पडली त्यानंतर जोशी सर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले.

R

Manohar Joshi, Pramod Mahajan
Manohar Joshi : व्हीआयपींचे नाही, तर शिवसैनिकांचे, कार्यकर्त्यांचे 'मुख्यमंत्री'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com