Solapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (ता. 19 जानेवारी) सोलापूरमधील कुंभारीच्या रे-नगर येथे असंघटित कामगारांना १५ हजार घरांचे वाटप होणार आहे. या प्रकल्पातील पायाभूत सुविधांसाठी निधी मिळण्यात आलेल्या अडचणींचा किस्सा माजी आमदार आणि या प्रकल्पाचे संकल्पक नरसय्या आडम यांनी सांगितला. मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे या प्रकल्पाबाबत विचारणा केली अन् अजितदादांनी तातडीने सूत्रे हलवत कामाला गती दिली. ('Modi asked Ajit Pawar and the work in Ray Nagar got speeded up')
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पाच कामगारांना चाव्या देऊन उद्या रे-नगरमधील गृहप्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे समाधान आडममास्तर यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. मात्र, बोलताना त्यामध्ये आलेल्या अडचणी वारंवार पुढे येत होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रे-नगर येथील गृहप्रकल्पातील ड्रेनेज, पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधांसाठी निधी मिळत नव्हता. आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री होते. अनेकदा प्रयत्न करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मिळत नव्हती. तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातूनही अनेकदा प्रयत्न केले. मात्र, शेवटपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट झालीच नाही. त्यांच्याकडून केवळ आश्वासने मिळत गेली, असेही आडम यांनी सांगितले.
आडम म्हणाले की, निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधानांपर्यंत हे प्रश्न आम्ही पोहोचवत होतो. त्याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संत तुकाराममहाराजांच्या देहू येथील मंदिराच्या उद्घाटनासाठी पुण्यात आले होते. पुणे येथील लोहगाव विमानतळावर पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापुरातील रे-नगरमधील गृहप्रकल्पातील पायाभूत सुविधांचे काय झाले? अशी विचारणा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने सूत्रे हलवून त्याच रात्री विभागीय आयुक्त, गृहनिर्माण सचिव मिलिंद म्हैसकर यांची बैठक बोलावली. रे-नगरमधील पायाभूत सुविधांसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी तातडीने दिले, त्यामुळे काम सुरू होण्यास मदत झाली.
तेव्हाचे गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी तातडीने दखल घेत हे काम सुरू केले. मिलिंद म्हैसकर यांच्या पत्नी मनीषा म्हैसकर यांचे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधातून या पायाभूत सुविधांचे काम सुरू होण्यास फायदा झाला. पण, तो कोरोनाचा काळ असल्यामुळे काम संथगतीने सुरू होते, त्यामुळे काही कामेही गतीने पुढे सरकत नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीसांनी दुसऱ्याच दिवशी 234 कोटी मंजूर केले
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार सत्तेवर आले. त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दाखवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यावेळी गृहनिर्माण विभाग होता. फडणवीस यांच्याकडे रे-नगरमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न मांडताच त्यांनी दुसऱ्याच दिवशी 234 कोटी रुपये मंजूर केले. तसेच, विजेसाठी 55 कोटी रुपये मंजूर करण्याचा आदेश दिला, असे आडममास्तर यांनी सांगितले.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.