Kalas (Pune) : मंत्रिमंडळातील शिंदे गटातील पाच मंत्र्यांना काढून टाकण्याचा भाजपचा सल्ला म्हणजे शिंदे सरकार किती मिंधे आहे, हे अधोरेखीत करणारा आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी दोन हजार कोटींचे ४० आमदारांना पन्नास खोके वाटप करणाऱ्या भाजपने शिंदे सरकार आपल्या दावणीला बांधले आहे. लवकरच आता गद्दार सरकारचा वर्धापनदिन आहे. मात्र, लोकांनी सांभाळून राहण्याचा व कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. (MP Supriya Sule criticizes Shinde government)
इंदापूर (Indapur) तालुक्यात गावभेट कार्यक्रमात न्हावी येथे त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, आळंदीत वारकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलिसांचे व्हिडीओ जे पुढे आले आहेत, ते भयानक आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांतील इतिहासात वारीला गालबोट लावणारी ही घटना आहे. दिल्लीतील आंदोलक खेळाडू महिलांवर हल्ला, मुंबईतील शासकीय वसतिगृतातील महिलेचा खून यांसारख्या घटनांमध्ये पोलिस यंत्रणा धावून जात नाही. यामुळे पोलिस यंत्रणा नेमकी कोणाच्या बाजूने आहे हे समजत नाही. राज्याच्या गृहखात्याच्या अपयशाबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना सांगितले आहे. राज्यात सातत्याने घडणाऱ्या काही घटना या नुकसानकारक आहेत.
राष्ट्रवादीच नाणं खणाणरं असल्याने दररोज राष्ट्रवादीवर टीका करण्याचं काम भाजप करत आहे. शेतीमालाला बाजार भाव नाही. काळी मातीशी इमानी असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचं काम सरकार करत आहे, असेही सुळे म्हणाल्या.
सरपंच आशा डोंबाळे यांनी गावात महिलांच्या माध्यमातून संपूर्ण दारुबंदी करण्यात आल्याचं सांगितलं. याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिला एकत्रित येत स्वावलंबी होत आहेत. यासाठी महिलांना अस्मिता भवन बांधून देण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने म्हणाले, तालुक्यातील विकास कामांचा अनुषेश भरुन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही आता माजी सभापती झालो आहोत. भाजपचं सरकार गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीचा कार्यक्रम राबवत नाही. यामुळे अधिकारी आता मालक झालेले आहेत. यामुळे विकासकामे राबविण्यात व लोकांचे प्रश्न सोडविण्यात अडचणी येत आहेत. भाजपला बहुतेक माहित झाले असावे की, जोपर्यंत महाविकास आघाडी आहे, तोपर्यंत आपलं काही येथे टिकणार नाही. यामुळे त्यांनी निवडणूका लांबविल्याचा आरोप त्यांनी केली.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, प्रवीण माने, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, सचिन बोगावत, विजय शिंदे, शुभम निंबाळकर, साहेबराव चोपडे, बळीभाऊ बोराटे, सरपंच आशा दिपक डोंबाळे, उपसरपंच अविनाश बोराटे यांसह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
'दादा-ताई म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही'
दादा व ताई म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही. तुम्ही आम्ही सर्वजण मिळून पक्ष आहोत. पक्ष हा कुटुंबासारखा असतो. यामुळे विरोधकांकडून केवळ दादा व ताई यांच्यावर टीका होते. पत्रकार पण दादा काय बोलले आणि ताई काय बोलल्या एवढंच दाखवतात. यामुळे विकासाचे मुद्दे बाजूला पडत आहेत, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.