
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचे नाक-तोंड दाबण्यास सुरूवात केली आहे. प्रत्यक्ष सीमेवरही हालचाली वाढल्या असून लष्कराने जोरदार युध्द सराव सुरू केला आहे. त्यामुळे पाकिस्तान चांगलेच हादरले आहे. पण असे असले तरी अजूनही पाकिस्तानातील नेत्यांची खुमखुमी संपलेली नाही. पलीकडून सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. अशाच धमक्या 1986 मध्येही दिल्या जात होत्या. सध्याच्या स्थितीने त्यावेळच्या भारताच्या Operation Brasstacks ची चर्चा तर होणारच.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 26 पर्यटकांची हत्या केली आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव टोकाचा वाढला आहे. भारताने सिंधू जलकरार स्थगित केला असून पाकिस्ताननेही सिमला करार रद्द करत प्रत्युत्तर देण्याचा प्रय़त्न केला आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सीमेवर लष्कराने आक्रमकपणे युध्दाभ्यास सुरू केला आहे. हवाई दल आणि नौदलाकडूनही युध्दसामुग्रीची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये तीन युध्द झाली आहेत. तर काहीवेळा युध्दाची शक्यता निर्माण झाली होती. त्यापैकी एक म्हणजे ऑपरेशन ब्रास्टॅक्स हे होते. 1986 च्या शेवटास आणि 1987 चा सुरूवातीला भारताने हे ऑपरेशन राबवले होते. प्रत्यक्षा युध्द झाले नसले तरी भारताच्या केवळ युध्दाभ्यासाने पाकिस्तानसह संपूर्ण जगाला घाम फोडला होता.
1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्या काळात पंजाबसह जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून तणावाची स्थिती निर्माण केली जात होती. एकप्रकारे भारताच्या स्थिरतेला आव्हान देण्यात आले होते. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कृष्णस्वामी सुंदरजी यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर 1986 मध्ये ऑपरेशन ब्रास्टॅक्स प्लॅन केले.
राजस्थानमधील बिकानेर आणि जैसलमेर वाळवंटात तब्बल पाच लाख भारतीय सैन्य उतरविण्यात आले होते. हा युध्दाभ्यास होता. त्यामध्ये रणगाड्यांसह इतर युध्दसामुग्रीचाही समावेश होता. दुसऱ्या महायुध्दानंतर आशिया खंडात पहिल्यांदाच एवढा मोठा युध्दाभ्यास सुरू झाला होता. त्यामुळे पाकिस्तानसह जगाचे लक्ष याकडे लागले होते. भारताने आपली लष्करी ताकद दाखवून देत पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याबाबत सूचक इशाराच दिला होता.
जवळपास 400 किलोमीटरच्या सीमाभागात भारताचे सैन्य पसरले होते. भारताने एकप्रकारे युध्दाचीच तयारी केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याची दखल घेण्यात आली होती. भारताच्या तत्कालीन लष्करप्रमुखांनी हा भारताच्या नवीन तांत्रिक युध्द रणनीतीची चाचपणी असल्याचे स्पष्ट केले होते. पण ही बाब पाकिस्तानला खटकली होती. पाकिस्तानेही सीमेवर सैन्याची जुळवाजुळव सुरू केली होती. अखेर मार्च 1987 मध्ये दोन्ही देशांमध्ये एक करार झाला आणि सीमेवरील सैन्याची संख्या कमी करण्यात आली. या ऑपरेशनवरून नंतर वादही रंगले. नेमका हा युध्दसराव होता की युध्दाची तयारी, याबाबत चर्चांना उधाण आले होते. पण काहीही असले तरी भारतीय लष्कराच्या या कृतीमुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय सामर्थ्याची प्रचिती आली होती.
सद्यस्थितीतही भारत पाकिस्तानपेक्षा कित्येक पटींनी बलाढ्य आहे. भारताकडे 14 लाखांहून अधिक तर पाकिस्तानकडे जेमतेम सहा लाख सैन्य आहे. इतर बाबतीतही पाकिस्तानी लष्कराची क्षमता भारतापेक्षा खूप कमी आहे. जगात भारत लष्करी सामर्थ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान पहिल्या दहातही नाही. पाकिस्तानचा क्रमांक 12 वा लागतो. त्यामुळे युध्द झालं तर भारत वरचढ ठरणार हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.