राजेश टोपे, दत्तात्रेय भरणे, रावल, चौधरी अन्‌ बारामती हॉस्टेलचे नाते!

महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आज ‘बारामती हॉस्टेल’ चा ब्रॅण्ड तयार झाला आहे.
Baramati Hostel
Baramati HostelSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेल्या बारामती हॉस्टेलची उभारणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांनी 1977 मध्ये केली. या ठिकाणी होणाऱ्या राजकीय बैठका आणि या बैठकांमधील निर्णयाचे राज्याच्या व देशाच्या राजकारणावर उमटणारे पडसाद यामुळे पुण्यातील ‘बारामती हॉस्टेल’ नेहमीच कुतुहलाचा, चर्चेचा विषय राहिला आहे. देशाच्या राजकारणात, प्रशासनात, समाजकारणात, शेतीत व उद्योगक्षेत्रात असलेले अनेक दिग्गज विद्यार्थी दशेत ‘बारामती हॉस्टेल’मध्ये राहिले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आज ‘बारामती हॉस्टेल’ चा ब्रॅण्ड तयार झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘बारामती हॉस्टेल’वर टाकलेला हा प्रकाशझोत... (Relationships between Rajesh Tope, Bharne, Rawal, Chaudhary and Baramati Hostel!)

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार राहुल कुल, माजी आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी युवकचे नेते विजय कदम राजकारणातील या दिग्गज नेत्यांसह महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रशासनात सध्या कार्यरत असलेल्या व्यक्तींचे वास्तव्य बारामती हॉस्टेलमध्ये होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव, आयएएस प्रवीण दराडे, हैदराबादमधील पोलिस महानिरीक्षक महेश भागवत, ओडिसामधील आयएएस अधिकारी दत्ता शिंदे, दिग्दर्शक परेश मोकाशी, पुणे जिल्ह्यातील बल्लारपूर इंडस्ट्रीचे सीईओ रोहित रैना प्रशासनातील या दिग्गज व्यक्ती विद्यार्थी दशेत ‘बारामती हॉस्टेल’मध्ये राहिल्या आहेत.

Baramati Hostel
राष्ट्रवादीने विद्यमान उपाध्यक्षांसह नऊ संचालकांना दिला डच्चू!

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे बंधूही बारामती हॉस्टेलमध्ये राहायला होते. बारामती हॉस्टेलमध्ये चांगल्या पद्धतीचे जेवण मिळत असल्याने मंत्री धनंजय मुंडे विद्यार्थीदशेत या ठिकाणी जेवायला येत होते, अशी आठवण हॉस्टेलचे व्यवस्थापक शिवाजी काळे यांनी सांगितली. आयुष्यात यशाच्या शिखरावर असताना आजही अनेकांच्या मनात आणि ह्‌दयात बारामती हॉस्टेलच्या आठवणी कायम आहेत.

Baramati Hostel
शरद पवारांना खुर्ची का दिली? : संजय राऊतांनी सांगितले कारण...

शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारामती हॉस्टेलची निवड करतात. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक स्थितीचा अडथळा येऊ नये म्हणून बारामती हॉस्टेलमध्ये गेल्या 44 वर्षांपासून विद्यार्थ्यांची अल्पदरात/मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली जाते. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यात येणारे विद्यार्थी आजही बारामती हॉस्टेलला प्राधान्य देतात. महाराष्ट्राच्या राजकारणात विविध पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांनी त्यांच्या नातेवाईकांसाठी मुला/मुलींसाठी ‘बारामती हॉस्टेल'ला पसंती दिली जाते. ‘बारामती हॉस्टेल’ने जपलेली विश्‍वासार्हता, सुविधा, नीटनीटकेपणा यामुळेच 44 वर्षांनंतरही पुण्यात राहायचे म्हटले की पहिले नाव ‘बारामती हॉस्टेल’चे येते. देशाच्या राजकारणात खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे कोणत्याही पदावर असोत किंवा राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्याही पदावर असोत ते नेहमी ‘बारामती हॉस्टेल’ला येतात. महाराष्ट्रातील पवारप्रेमींना पवारांच्या सहवासाची संधी बारामती हॉस्टेलच्या माध्यमातून मिळते.

Baramati Hostel
पवारांनी भाजपबाबत ३० वर्षांपूर्वी मांडलेला विचार आमच्या लक्षात दोन वर्षांपूर्वी आला!

मोरारजी देसाईंच्या हस्ते भूमिपूजन

पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्यातील गोखलेनगर भागात 1977 मध्ये ‘बारामती हॉस्टेल’ची स्थापना केली. पाच खोल्यांपासून या हॉस्टेलची सुरुवात झाली होती. आता या ठिकाणी 70 खोल्या आहेत. 30 गुंठे जागेवर ‘बारामती हॉस्टेल’साकारले आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते ‘बारामती हॉस्टेल’चे भूमिपूजन झाले. शरद पवारांचे जिवलग मित्र विठ्ठलशेठ मणियार, पुण्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी तथा साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे मोलाचे योगदान बारामती हॉस्टेलच्या जडणघडणीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1991 पासून बारामती हॉस्टेलमध्ये व्यक्तीशः लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील नीटनीटकेपणा, व्यवस्थापन दर्जेदार राहिले आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील शिवाजी काळे हे गेल्या 33 वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.

Baramati Hostel
जयंत पाटील मागच्या रांगेत, तर सुप्रिया सुळे शेवटच्या!

राष्ट्रवादीच्या स्थापनेची घोषणा

शरद पवार यांनी 1999 मध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेस नावाने नवीन पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा शरद पवार यांनी याच ‘बारामती हॉस्टेल’मधून केली होती. देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही पवार बारामती हॉस्टेलला न चुकता भेट देत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आयुष्यात, महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात घडलेल्या अनेक घटना व घडामोडींचे ‘बारामती हॉस्टेल’ साक्षीदार आहे.

Baramati Hostel
जिल्हा बॅंकेला डावलल्यानंतर वैशाली नागवडे म्हणाल्या, ‘मी कुठे कमी पडले’!

पवारांनी शिर्केंचा प्रश्‍न चुटकीसरशी सोडविला

शरद पवार मुख्यमंत्री असताना महाबळेश्‍वर भागातील संतोष शिर्के मुख्यमंत्री कार्यालयात शिपाई म्हणून कामाला होते. या घटनेला अनेक वर्षे झाली. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या मेळाव्यानिमित्त पवार यांनी नुकताच महाबळेश्‍वरचा दौरा केला. या दौऱ्यात शिर्के पवार यांना भेटण्यासाठी आले होते. पवारांनी क्षणातच शिर्के यांना नावासह हाक मारत का आलात? असा प्रश्‍न केला. माझा मुलगा (तेजस शिर्के) शिक्षणासाठी पुण्यात आहे. राहण्याची अडचण आहे. बारामती हॉस्टेलला व्यवस्था झाली तर बरे होईल, अशी विनंती शिर्के यांनी केली पवारांनी तत्काळ शिर्के यांचा प्रश्‍न सोडविला, अशी आठवण साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितली.

Baramati Hostel
‘बबड्या’ जेरबंद असल्याने यंदा ‘डॅडी’चं काय होणार!

लॉकडाऊनमध्ये 700 विद्यार्थ्यांना रोज मोफत जेवण

कोरोनाच्या पहिल्या लाटेला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. शिक्षणानिमित्त पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची मोठी तारांबळ उडाली. बारामती हॉस्टेलच्या माध्यमातून पुण्याच्या विविध भागातील तब्बल 700 विद्यार्थ्यांना 58 दिवस मोफत जेवण देण्याची व्यवस्था बारामती हॉस्टेलच्या माध्यमातून करण्यात आली होती. देशावर किंवा महाराष्ट्रावर आलेल्या संकटात मदतीचा हात देण्याकरिता धावून जाण्यासाठी आजही बारामती हॉस्टेल सज्ज आहे. विद्यार्थी दशेतच सामाजिक बांधिलकीची शिकवण देण्यात या हॉस्टेलचा मोठा वाटा राहिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com