Solapur Politics : विजयदादांच्या विनंतीवरून इंदिरा गांधींनी बदलला निर्णय...

Indira Gandhi Jayanti Special : कोल्हापूरमधून इंदिरा गांधी यांना आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील गेले होते.
Vijaysinh Mohite Patil-Indira Gandhi
Vijaysinh Mohite Patil-Indira GandhiSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी सोलापुरात आल्या होत्या. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील हे गांधी यांना आणण्यासाठी कोल्हापूरला गेले होते. दुष्काळी पाहणीनंतर दक्षिण सोलापूरमधील आचेगाव येथे इंदिरा गांधी यांची जाहीर सभा झाली. सभेतील भाषण संपल्यानंतर सोलापूर लोकसभेसाठी विजयदादांचे नाव जाहीर करण्यासाठी त्या पुन्हा व्यासपीठाकडे निघाल्या होत्या. मात्र, ‘आपण विधानसभेला इच्छूक असून त्यानंतर लोकसभेवर येईन’ असे विजयदादांनी सांगितल्याने गांधींनी आपला निर्णय बदलला. (Request of Vijaysinh Mohite Patil, Indira Gandhi changed decision on Solapur Lok Sabha candidature)

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज (ता. १९ नोव्हेंबर) जयंती. त्यानिमित्ताने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यात १९७२ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. अन्नधान्याची प्रचंड टंचाई होती. लोकांच्या हाताला काम नव्हते. पण, सरकारकडून उपाय योजना करण्यात येत होत्या. स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधी या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी देशभर फिरत होत्या. सोलापुरात दुष्काळी पाहणीसाठी आलेल्या गांधींची ही आठवण खुद्द विजयदादांनी सांगितली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijaysinh Mohite Patil-Indira Gandhi
Sugarcane Price Issue : ऊसदरासाठी राजू शेट्टींचा मोठा निर्णय; २६ नोव्हेंबरला सर्व महामार्ग रोखून धरणार

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी विमानाने रत्नागिरीला आल्या होत्या. तेथून त्या कोल्हापूरमध्ये आल्या. कोल्हापूरमधून इंदिरा गांधी यांना आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील गेले होते. दुष्काळी पाहणीनंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. दक्षिण सोलापूरचे तत्कालीन आमदार वि. गु. शिवदारे यांनी या सभेचे आयोजन केले होते.

आचेगावमधील सभेला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, महसूल मंत्री भाऊसाहेब वर्तक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी. के. सावंत, संपर्कमंत्री शरद पवार हे सभेला उपस्थित होते. इंदिरा गांधी यांचे सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी आगमन झाले होते. पहाटेपासूनच नागरिकांची सभास्थानी गर्दी झाली होती. सभेला तब्बल ५० हजारहून अधिक नागरिक उपस्थित होते. सभेसाठी अक्कलकोट आणि सोलापूर येथून ७५ एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. बैलगाड्यांमधून महिला आणि मुली, तर उपलब्ध दुचाकीवरून पुरुष मंडळी सभेला आले होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन श्रीमती गांधी यांना या वेळी दिले.

Vijaysinh Mohite Patil-Indira Gandhi
World Cup Final : वर्ल्ड कप फायनलला राजकीय फिव्हर; शिर्डीत साईबाबांना प्रार्थना, नगरमध्ये गणेशाची महाआरती....

इंदिरा गांंधी यांचे पंढरपूर आणि सोलापुरात जोरदार स्वागत झाले होते. त्या स्वागतावेळीच सोलापुरातील कार्यकर्त्यांनी लोकसभेसाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयदादांचे नाव गांधी यांना सुचविले होते. त्यावर गांधींनी आपण हे नाव सभेतच जाहीर करूयात, म्हणून त्या भाषण संपल्यानंतर पुन्हा व्यासपीठाकडे निघाल्या होत्या. मात्र, आपल्याला एकदा विधानसभा लढविण्याची इच्छा आहे. त्यानंतर लोकसभेवर येईन, अशी इच्छा विजयदादांनी व्यक्त केली. त्यामुळे गांधी यांनी आपला निर्णय बदलला.

Vijaysinh Mohite Patil-Indira Gandhi
Abhijit Patil Announced FRP : अभिजित पाटलांनी शरद पवारांसमोर दिलेला शब्द खरा केला; पण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com