जळगाव (जामोद): जळगाव जिल्ह्यामध्ये अब्दुल खालिक देशमुख हे एक जुने जाणते नाव आहे. अगदी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. भारतरत्न इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा कार्यकाळ हा त्यांचा उमेदीचा काळ होता.
खासदार बाळकृष्ण वासनीक, खा. मुकुल वासनिक यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काँग्रेसचे काम केले आहे. लोकसभा असो, विधानसभा ते सातत्याने सक्रिय असतात. जळगाव (जामोद), जलंब मतदार संघाचे काँग्रेस आमदार विठ्ठल सदाशिव उमरकर, शेठ तुळशीरामजी ढोकणे, श्रद्धा टापरे, कृष्णराव इंगळे यांच्या प्रत्येक निवडणुकीतील विजयासाठी अब्दुल खालिक देशमुख यांनी रक्ताचे पाणी केले असून खालीक बाप्पू या नावाने ते सर्व परिचित आहेत. (Abdul Khaliq Deshmukh, Bharat Jodo Yatra Latest News)
राहुल गांधी (Congress) यांच्या भारत जोडो यात्रेने ते फारच भारावून गेले असून राहुल यांना भेटण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. सध्या ते वयोवृद्ध असून नुकतीच त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. तरी देखील ते २० नोव्हेंबर रोजी ते राहुल गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.
सन १९८५ मध्ये मुंबई येथे काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अधिवेशन भरले होते. त्यावेळेस मुकुल वासनिक हे खासदार होते. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ह्या अधिवेशनासाठी खालीक देशमुख हे प्रत्यक्ष उपस्थित राहिले. पंतप्रधान राजीव गांधी या अधिवेशनाला उपस्थित होते. खालीक बापूंना राजीव गांधी यांची भेट घेण्याची तीव्र इच्छा होती. मात्र पंतप्रधानांना असलेल्या झेड प्लस सुरक्षामुळे ही भेट होणे अशक्य कोटीतील गोष्ट होती. खालीक बापूंनी त्यावेळी त्या अधिवेशनात राजीव गांधींना भेटण्याचे फार प्रयत्न केले. त्यावेळेला मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खासदार मुरली देवरा हे होते आणि अधिवेशनाची सर्व जबाबदारी सुद्धा मुरली देवरा यांच्यावरच होती.
बापूंनी राजीवजींना भेटण्याची इच्छा मुरली देवरांकडे व्यक्त केली. परंतु सुरक्षेच्या कारणामुळे देवरा यांनी असमर्थता दर्शविली. एवढेच नव्हे तर "तुम्ही राजीव गांधींना भेटण्याचा उगीच आग्रह धरू नका, अन्यथा तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करावे लागेल" असे देवरा खालीक बापूंना म्हणाले. मुरली देवरा यांचे हे शब्द ऐकून ह्या सच्चा काँग्रेसशी कार्यकर्त्याचा राग अनावर झाला. त्यावेळेस उच्च स्वरात खालीक देशमुखांनी मुरली देवरा यांना सुनावले. "पोलिसांच्या हवाले काय करता मला, गोळी मारा, तरीपण मी राजीव गांधी यांना भेटल्याशिवाय इथून हलणार नाही. काँग्रेस जिंदाबाद! काँग्रेस जिंदाबाद!", अशी नारे दिले.
त्यावेळेला थोड्याच अंतरावर राजीव गांधी उभे होते. त्यांचे लक्ष खालीक देशमुख यांच्या आवाजाकडे गेले, ते तात्काळ तिथे धावून आले आणि घडलेल्या प्रकाराची चौकशी केली. खालीक बापूंना हस्तांदोलन करत त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली आणि एवढेच नव्हे तर उपस्थित असलेल्या त्या वेळेच्या तिथल्या छायाचित्रकारांना आदेश देऊन खालीक बापू सोबत छायाचित्र काढून घेतले, एवढ्यावरच राजीव गांधी न थांबता संबंधित छायाचित्रकारांना खालीक बापूंचा पत्ता लिहून घ्यायला सांगितला व हे छायाचित्र बापूंना पाठवायच्या सूचना दिल्या.
ते छायाचित्र आज सुद्धा अनमोल ठेवा म्हणून फार जपून ठेवले. तोच अनमोल ठेवा राहुल गांधी यांना भेट करण्याची त्यांची इच्छा आहे. इंदिरा गांधी, राजी गांधी, राहुल गांधी,असा बापूंचा काँग्रेसमधील प्रवास असून शतप्रतिशत काँग्रेस हेच बापूचे धोरण आहे. आपला काँग्रेस प्रवास कथन करताना बाप्पू गहिवरून आले होते.
देशाचे पंतप्रधान हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि जळगाव जामोद मतदारसंघाचा आमदार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा बघायची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.