Sawantwadi Royal Family : सावंतवाडीच्या राजघराण्याची 35 वर्षांनंतर राजकारणात एन्ट्री : पडद्यामागील 'किंगमेकरने' जोडली भाजपच्या विजयाची 'रॉयल' कडी

Savantwadi royal family : सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयामागे राजघराण्याची राजकारणात पुन्हा झालेली एन्ट्री निर्णायक ठरली आहे. युवराज लखमराजे हे पडद्यामागचे खरे किंगमेकर ठरले आहेत.
Yuvraj Lakhmaraje emerges as behind-the-scenes kingmaker reshaping local political equations.
Yuvraj Lakhmaraje emerges as behind the scenes kingmaker reshaping local political equations in SawantwadiSarkarnama
Published on
Updated on

- शिवप्रसाद देसाई

Sawantwadi Royal Family : सावंतवाडी शहरावर नगरपालिकेच्या माध्यमातून भाजपने सत्ता मिळवल्यानंतर शिवसेनेच्या पराभवाच्या कारणांबरोबरच भाजपच्या विजयाच्या श्रेयाची गणितेही मांडली जावू लागली आहेत; मात्र याही पलिकडे जावून सावंतवाडीच्या राजकारणात तब्बल 35 वर्षांनी राजघराण्याची पुन्हा एन्ट्री झाली आहे. राजघराणे आणि सावंतवाडीकर यांच्यात राजकीय दृष्ट्या असलेला दीर्घ दुरावा एका अर्थाने दूर झाला आहे.

अर्थात हा प्रवास केवळ एक नगरपालिका जिंकण्यापुरता मर्यादित नाही. कारण या आधीच्या इतिहासात या भागाच्या एकूण जडणघडणीत सावंतवाडीकर आणि राजघराणे यांचे असलेले ऋणानुबंध पुन्हा जोडले जातील का? ही शंका घेण्यासारखी स्थिती होती. या सगळ्या किमयेचे शिल्पकार आणि या निवडणुकीचे खरे किंगमेकर ठरले ते राजघराण्यातील युवराज लखमराजे. पालिकेच्या निवडणूक निकालानंतर झालेल्या जय पराजयाच्या विश्‍लेषणात हा मुद्दा नाकारून चालणारच नाही.

सावंतवाडी हा कधीकाळी संस्थानच्या राजघराण्याचा बालेकिल्ला होता. शिवरामराजे भोसले यांच्यानंतर स्थानिक राजकारणापासून राजघराणे दूर दूर होत गेले. राजकीय समिकरणे बदलत गेली. नवनवी नेतृत्व सक्रिय झाली. शहरापुरता विचार करता येथे दिर्घकाळ विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आपला करिष्मा कायम ठेवला. सावंतवाडीत केलेल्या कामाच्या प्रभावावर ते या मतदारसंघातून आमदार होऊन विधानसभेत गेले. मंत्री होत आपला ठसा राज्याच्या राजकारणात निर्माण केला.

असे असले तरी केसरकर यांनी शहराच्या राजकारणावर असलेली पकड कायम ठेवली. या पालिकेच्या निवडणुकीत त्यांनी विजयासाठी पूर्ण ताकद लावली; मात्र भाजपने श्रध्दाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर सत्ता मिळवली. हा निवडणूक निकाल केवळ भाजपचा विजय या पुरता मर्यादित म्हणता येणार नाही. राजघराण्याला या निवडणुकीत आणण्याचा या पक्षाचा निर्णय ’गेमचेंजर’ ठरला. या सगळ्यात पडद्यामागून भूमिका बजावणारे युवराज लखमराजे अनेक अर्थानी किंगमेकर ठरले.

Yuvraj Lakhmaraje emerges as behind-the-scenes kingmaker reshaping local political equations.
Mumbai elections: मुंबईत चार जागावरून ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच; मातोश्रीवरील युतीच्या चर्चेनंतर बाळा नांदगावकरांचे मोठे विधान

सावंतवाडीकर, राजघराणे आणि निवडणुकीचे राजकारण या तिन्ही गोष्टी समजून घेतल्या तर या निकालाचा खूप मोठा पैलू प्रकाशात येतो. सावंतवाडी संस्थानचे शेवटचे सिंहासनाधिष्ठीत राजे शिवरामराजे यांनी दिर्घकाळ निवडणुकीचे राजकारण केले. त्यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश मुळातच समाजवादी विचारसरणीच्या लोकांमुळे झाला होता. असे असले तरी त्यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा अंगीकारली. संस्थान विलीन झाल्यानंतर राजेसाहेबांना निवडणुकीच्या राजकारणात फारसा रस नव्हता. 1952 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत अखंड रत्नागिरीमध्ये 6 जागा होत्या. यात सावंतवाडीतून प्रतापराव भोसले हे काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. उर्वरित सगळ्यात उमेदवारांची अनामत जप्त झाली.

पुढच्या 1957 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ ऐन भरात होती. मुख्य लढत काँग्रेस विरूध्द संयुक्त महाराष्ट्र समिती अशी होणार होती. समितीत बहुसंख्य समाजवादी नेते होते. सावंतवाडीत काँग्रेसला शह देणे जवळपास अशक्य होते. यावेळी समाजवादी नेत्यांनी त्यांना केवळ टक्कर नाही तर सहज विजय मिळवता येईल अशा श्रीमंत शिवरामराजे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची खेळी खेळली. राजेसाहेबांना यासाठी तयार करण्याची जबाबदारी पुण्यातील समाजवादी नेते बा. न. राजहंस यांच्यासह स्थानिक पी. डी. नाईक, दत्ताराम वाडकर, अ‍ॅड. एल. व्ही. देसाई यांच्यावर होती. राजेसाहेब लढायला तयार झाले; पण संयुक्त महाराष्ट्र समितीच्या तिकीटावर न लढता ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. या लढतीत त्यांना तब्बल 92 टक्के मते मिळाली.

यावरून राजघराण्याच्या पाठिशी किती जनमत होते याचा अंदाज येतो. या निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्याने पोटनिवडणूक झाली. यात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या तिकीटावर राजमाता पार्वतीदेवी विधानसभेत गेल्या. पुन्हा महाराष्ट्र निर्मितीनंतर 1962 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवरामराजे काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर विजयी झाले आणि कायम या पक्षात राहिले. त्यांनी विधानसभेत दिर्घकाळ सावंतवाडीचे प्रतिनिधीत्व केले. 1985 मध्ये ते शेवटचे विधानसभेवर निवडून गेले. नंतर ते सक्रिय राजकारणापासून दूर गेले. त्यांचे आरोग्यही साथ देत नव्हते. त्यांचा कार्यकाळ 1990 ला संपला.

1995 मध्ये तत्कालीन राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली; मात्र त्यांना अवघी 5 हजार 577 मते मिळाली. शिवराम राजेनंतर राजघराणे आणि सक्रिय राजकारणाच्या पातळीवर जनता यांच्यात दुरावा वाढत गेला. राजकारणाची बदललेली समिकरणे विचारात घेता जवळपास 35 वर्षांचा हा दूरावा दूर करणे सोपे नव्हते. ही किमया युवराज लखमराजे यांनी तुर्त सावंतवाडी शहरापुरती तरी करून दाखवली आहे. राजघराणे म्हणजे काँग्रेसच्या विचारांचे पाईक असे समीकरण दृढ होते. असे असूनही काही वर्षापूर्वी युवराज लखमराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शहरात त्या काळात भाजपची ताकद नव्हती. त्यामुळे हा निर्णय प्रवाहाविरूध्दचा म्हणायला वाव होता. अर्थात शिवरामराजे पहिल्यांना अपक्ष म्हणूनच सक्रिय राजकारणात आले. ते काँग्रेसमध्ये गेले तेव्हा राज्य आणि देशस्तरावर तोच पक्ष सर्वोच्च बलशाली होता. आता त्या जागी भाजप आहे. त्यामुळे युवराजांच्या भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या निर्णयालाही दुसरी बाजूही होती.

Yuvraj Lakhmaraje emerges as behind-the-scenes kingmaker reshaping local political equations.
BMC Nivadnuk 2026: महायुतीचा मास्टरप्लॅन! मुंबई जिंकण्यासाठी स्टार प्रचारकांची फौज

युवराज्ञी श्रध्दाराजे यांना केसरकरांचा बालेकिल्ला असलेल्या सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णयही सोपा नव्हता. भाजपने खेळलेल्या या यशस्वी खेळीतील निर्णयाचे स्थान अर्थातच युवराजांकडे होते. उमेदवारी मिळाल्यावर मराठी न येणार्‍या, परप्रांतातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवार या मुद्द्यावर त्या ट्रोल झाल्या; मात्र त्यावर मात करत त्यांनी प्रचारात घेतलेल्या मुसंडीचा विजयामध्ये मोठा वाटा आहे. यातही चेहरा युवराज्ञींचा असला तरी त्यांच्या पाठिशी असलेले युवराजांचे पाठबळ तितकेच कणखर ठरले

या विजयासाठी भाजपने लावलेली ताकद, वापरलेल्या सगळ्या निती, नियोजन याचे श्रेय आहेच. अर्थात दुसरा कोणी उमेदवार असता तरीही भाजपला ही सगळी ताकद लावावीच लागणार होती; मात्र राजघराण्याला मायनस करून या निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास विजयाचे गणित इतके सोपे नक्कीच राहिले नसते.

Yuvraj Lakhmaraje emerges as behind-the-scenes kingmaker reshaping local political equations.
Raj-Uddhav Thackeray : राज-उद्धव यांच्या युतीने मुंबईत महायुतीचे टेन्शन वाढले; 67 वॉर्डांत भाजप-शिंदेंचा खेळ बिघडणार?

उमेदवार म्हणून प्रचारात श्रध्दाराजे यांनी घेतलेली मेहनत, त्यांची मतदारांवर पडलेली छाप याचा वाटा या विजयात मोठा आहे. अर्थात ही सगळी किमया युवराज लखमराजे यांनी शांतपणे त्यांच्यासोबत राहून घडवून आणली. विद्यमान राजे खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी याही प्रचारात उतरल्या. विरोधकांची प्रत्येक चाल युवराज लखमराजे यांनी संयमाने घेत दाखवलेली परिपक्वता प्रचाराला वेगळी ओळख देवून गेली. राजघराण्यातील व्यक्ती आपल्या घरी प्रचाराच्या निमित्ताने का होईना येत असल्याचा वेगळा प्रभाव मतदारांवर पडला. या सगळ्यातून साकारलेल्या या विजयाची कडी प्रत्येक ठिकाणी जोडणारा दुवा ठरल्याने खर्‍या अर्थाने पडद्यामागचे किंगमेकर युवराज लखमराजे ठरले.

अर्थात राजघराणे आणि सावंतवाडीकर यांना पुन्हा एकदा जोडण्याची किमया त्यांनी प्रत्यक्षात आणली असली तरी पुढचा प्रवास सोपा नाही. तुर्त सावंतवाडीकरांच्या तरी अपेक्षा उंचावल्या आहेत. इतर लोकप्रतिनिधींपेक्षा याला थोडा वेगळा ‘रॉयल टच’ आहे. राजघराण्यातील व्यक्ती भ्रष्टाचाराचा चिखल अंगावर उडवू देणार नाही, दबावाला जुमानणार नाही आणि शहराचा खर्‍या अर्थाने कायापालट करतील अशा त्यातल्या काही महत्त्वाच्या अपेक्षा आहेत. नगराध्यक्ष म्हणून श्रध्दाराजे यांच्याकडे जबाबदारी असण्याबरोबरच राजघराणे म्हणून एक वेगळी नैतिक जबाबदारी त्यांच्यासह युवराजांना पार पाडावी लागणार आहे. त्यात यश मिळाले तरच 35 वर्षांपासून दुरावलेले लोकांशी असलेले राजघराण्याचे नाते खर्‍या अर्थाने पुन्हा सांधले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com