Shiv Sena News : शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीचेही शेतीप्रश्नाकडे लक्ष!

Shiv Sena third generation addressing farming issues: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले नसतील तितक्यावेळा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. शेतीचे प्रश्‍न समजावून घेतले. त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी असे त्यांना वाटत होते.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शेतकरी देशोधडीला लागला आहे. या चक्रव्यहातून त्याला पुन्हा बाहेर काढायचं असेल तर पुन्हा एकदा संपूर्ण कर्जमाफी आणि हमीभावाची गॅरंटी मिळाली, तर त्याला सुगीचे दिवस येतील; अन्यथा त्याच्या जीवनात कधीच प्रकाश येणार नाही. शिवसेनेची तिसरी पिढी शेतकऱ्यांचा विचार करीत आहे, हे स्वागतार्ह आहे.

भाजप अर्थात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, असे आश्‍वासन भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, असे म्हटले आहे.

या दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांच्याप्रती ज्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचे स्वागतच केले पाहिजे. एक काळ असा होता की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा क्रम लागायचा. आता कृषि क्षेत्र मागे पडत चाललंय. शेतीचं अर्थशास्त्र बिघडलंय. अस्मानी-सुलतानीच्या संकटात शेतकरी सापडलाय. गेल्या दहाबारा वर्षांत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही हे सत्र थांबलेलं नाही.

Aditya Thackeray
BJP On Hindutva: 'हिंदुत्वाचे कार्ड' कुणाचे पत्ते ओपन करणार; 'व्होट जिद्दाद' भाजपला तारणार का?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली होती. त्यावेळी केंद्रात कृषीमंत्री शरद पवार होते. पवार यांच्यासारख्या नेत्याला शेतकऱ्यांचे दु:ख आणि परिस्थितीची जाणीव होती. शेतकऱ्यांना चांगले दिवस त्यांनी आणले होते. पुढे केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाले. महायुती सरकारने आणि केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांसाठी काही योजना आणल्या. निर्णय घेतले पण, संकटाची मालिका काही केल्या सुटत नाही, असे चित्र आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारने त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफीबाबत निर्णय घेतले. पण, अटीशर्ती इतक्या टाकल्या गेल्या की त्यापेक्षा कर्जमाफी नको अशी म्हणण्याची वेळ या घटकावर आली. आता निवडणूक काळात फडणवीस पुन्हा संपूर्ण कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखवित आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हमी भावाचा आग्रह धरत आहे. हे झाले सध्याचं वास्तव.

Aditya Thackeray
Hadapsar Assembly Election 2024: मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय; हडपसरच्या राजकारणात मोठी घडामोड

मुद्दा येतो तो शिवसेना आणि शेतकऱ्यांचा, त्यांच्या प्रश्‍नांचा. या पक्षाचा तोंडवळा शहरी होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबई ठाण्याच्या राजकारणातच प्रथम पासून रस होता. पुढे या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनला. पुढे मनोहर जोशी, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊन गेले. राज्याचे नेतृत्व करावे लागत असल्याने शेतकरी हा घटक त्यांच्यासमोर असायचा. शेतकरी प्रश्‍नांवर विरोधकांची धार अधिक असायची. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना काही करून शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागले.

शेतीप्रश्‍नावरून ठाकरे लक्ष्य

एककाळ असा होता की खुद्द शरद पवार हे ठाकरे यांच्या राजकारणाचा समाचार घेताना म्हणायचे की यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की वेलाला लागतात हे माहित नाही. हे सांगण्यामागे कारण हेच होते की शिवसेनेला सहकार, शेतीचे प्रश्‍न नीट कळत नाही किंवा ते शेतकऱ्यांचे दु:ख जाणत नाहीत. शिवसेनेच्या सभा मुंबई, ठाणे, पुणे आणि संभाजीनगर किंवा शहरीभागातच व्हायच्या.

हिंदुत्वाच्या मुद्यावरच त्यांचा जोर असायचा. पण, जगाचा जो पोशिंदा आहे त्यांचं जगणं किती कठीण आहे असले प्रश्‍न त्यांच्या गावातही नसायचे. हळूहळू या पक्षाचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतसे शिवसेनेचे नेते शेतकऱ्याच्या बांधावर जावू लागले. ग्रामीण भागातील कार्यकर्ते जोडले गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गेले नसतील तितक्यावेळा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले.

शेतीचे प्रश्‍न समजावून घेतले. त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला हवी असे त्यांना वाटत होते. ते त्यांनी पुढे करूनही दाखविले. त्यांच्या प्रचारातील आजचे मुद्दे जरी लक्षात घेतले तर असे दिसून येते की ते मोदी-शहाविरोधात कडाडून हल्ला चढवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना आधारही देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदित्य ठाकरे शेतीमालाला हमी भाव देण्याची भाषा करीत आहेत.

खरंच हमीभाव मिळेल ?

आज अनेक सरकारे केंद्रात येऊन गेली पण, कोणीही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ शकले नाही. शिवसेनेचे सरकारही भाजपबरोबर केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर होते. मात्र, शिवसेनेनेही कधीच आग्रह धरला नाही.

ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ स्वामिनाथ यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी खर्च केले. प्रत्येक सरकारला ते विनंती करीत होते की हमीभाव द्या पण, तसं झालं नाही. आताही हमी भाव मिळेल का याबाबत साशंकता आहे. ठाकरेंची तिसरी पिढी आता शेतकऱ्याच्या प्रश्‍नावर बोलत आहे याचे समाधान आहे.

राज्यातील शेतकऱ्याची वाट बिकट बनली आहे. तरुणपिढी शेतात घाम गाळते आहे. प्रयोग करीत आहे.यशही मिळते आहे. मात्र त्याच्यावरील कर्जाचा डोंगर काही कमी होत नाही. त्याला अनेक कारणेही आहेत. मायबाप सरकारची जर त्याला खंबीर साथ मिळाली तर तो ताठ मानेने उभा राहू शकतो.

बदलत्या जागतिक हवामानाचे फटकेही त्याला सोसावे लागत आहे. पाऊस लहरी बनला. कधी पेरलं तर उगवत नाही, उगवलं तर खपत नाही. दूध, कांदा प्रश्‍नाच्या दराचा प्रश्‍न कायम पेटत असतो. निश्‍चित असा मार्ग निघत नाही. त्यामुळे शेतकरी देशधडीला लागला आहे. या चक्रव्यहातून त्याला पुन्हा बाहेर काढायचं असेल तर पुन्हा एकदा संपूर्ण कर्जमाफी आणि हमी भावाची गॅरंटी मिळाली तर त्याला सुगीचे दिवस येतील अन्यथा त्याच्या जीवनात कधीच प्रकाश येणार नाही. शिवसेनेची तिसरी पिढी शेतकऱ्यांप्रती विचार करीत आहे हे स्वागतार्ह आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com