
Sanjay Gaikwad News : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. या मारहाणीनंतर विरोधी पक्षातील नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आक्रमक मागणी केली. प्रसार माध्यमांनाही यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. पण विधिमंडळाने अद्यापही गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. कारण यासाठी कोणती यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे पुढे आले आहे.
मंगळवार, 8 जुलै रात्री खराब आणि नासलेले अन्न दिल्याचा आरोप करत संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टिन कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीनंतर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तीन दिवस लागले. सुरुवातीला शिवसेनेसह गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गायकवाड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तक्रारच आली नाही, मग कारवाई कशी करणार? असा सवाल कदम यांनी केला. तर आहार व्यवस्थापन समितीचे प्रमुख आणि शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांनीही गायकवाड यांच्याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही.
एकनाथ शिंदे यांनीही केवळ गायकवाड यांना समज देण्यात येईल एवढेच सांगितले. कारवाईबद्दल कोणी चकार शब्दही काढला नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. अपमानित करणे आणि मारहाण करणे, अशा किरकोळ स्वरुपाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले. यात गायकवाड यांना तात्काळ जामीन घेता येऊ शकतो. यात ना अटक करता येते, ना ताब्यात घेता येते. केवळ जुजबी चौकशी करून सोडून दिले जाते.
यामुळे विधानसभेनेही गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. निदान काही तासांसाठी तरी निलंबन करायला हवे, असे आग्रही मत आहे. गायकवाड यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, असेही शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सहकर्यांनी एकनाथ शिंदे यांनी सुचवले असल्याची माहिती आहे. मात्र गायकवाडांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पण ही कारवाई करण्यासाठी सध्या सभागृहाची यंत्रणाच अस्तित्वात नाही.
आंबलेले अन्न खायला देणे आणि त्यावर मारहाण करणे ही घटना सभागृहाबाहेरची आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या कोणत्या नियमानुसार कारवाई करता येईल हे स्पष्ट नाही. सध्या नैतिक आचरण समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे कारवाई कशी सुरू करायची? असा प्रश्न विधिमंडळासमोर आहे. हा हक्कभंगाचाही विषय नाही. त्यामुळे काय पावले उचलता येतील याबद्दल सध्या विचार सुरू आहे. पण मारहाणीची दृश्ये लोकप्रतिनिधींबद्दल जनतेत कमालीची अनास्था निर्माण करीत आहेत. त्यामुळे काही तरी कारवाई करा, असे भाजपने एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे विश्वसनीयरित्या समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.