Shivsena UBT : राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना (यूबीटी) लढवण्याच्या तयारीत आहे. जागावाटपात शिवसेनेला (यूबीटी) ही जागा जाण्याची शक्यता असल्या इच्छुकांची तुडुंब गर्दी या मतदारसंघात आहे. दोन इच्छुकांनी महायुतीला रामराम ठोकत उमेदवारीसाठी महाविकास आघाडीचे उंबरे झिजवण्यास सुरुवात केली आहे.
माजी आमदारांनी महायुतीच्या नेत्यांना न दुखावता शिवसेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी कोल्हापूर-मुंबई अशा मॅरेथॉन बैठका सुरू ठेवल्या आहेत. मात्र उपऱ्याऐवजी निष्ठावंतांना बळ द्यावे, अशी मानसिकता राधानगरीतील शिवसैनिकांची आहे. शिवाय महाविकास आघाडीतील राहुल देसाई, ए.वाय पाटील आणि माजी आमदार के.पी.पाटील हे परस्पर आपल्या उमेदवारीची घोषणा करत असल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थ आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंतांना बळ न दिल्यास राधानगरीत ठाकरे गटामध्ये पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे.
राधानगरीमधून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेकडून (यूबीटी) उमेदवारी घेण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आपली उघड भूमिका घेत महायुतीचा धर्म मोडला होता. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देत महाविकास आघाडीतील जो पक्ष उमेदवारी देईल त्याच्याच पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.
माजी आमदार के. पी. पाटील यांनी महायुतीतील नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध जपत महाविकास आघाडीकडे उमेदवारीसाठी गळ घातली आहे. हा मतदारसंघ शिवसेना (यूबीटी) जाण्याची शक्यता असल्याने तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी देखील आपल्या उमेदवारीवर दावा केला आहे.
महाविकास आघाडीकडून हे चौघे इच्छुक आहेत. प्रत्येक इच्छुकांनी उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा छाती ठोकपणे दावा केला आहे. गेली दहा वर्ष शिवसेनेतून आमदार प्रकाश आबीटकर यांना संधी मिळत आहे. शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांचा सहभाग मोठा आहे. अशातच आबिटकर हे एकनाथ शिंदेंच्यासोबत गेल्यानंतर निष्ठावंतांची फळी तयार झाली आहे.
संकटाच्या काळात राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (यूबीटी) टिकवून ठेवण्याचे काम शिवसैनिकांनी केले आहे. त्यामुळे आयात केलेला उमेदवार नको, याच मानसिकतेत शिवसैनिक आहेत. शिवाय ज्यांच्या विरोधात दहा वर्षे लढलो त्यांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक नाराज असतील, असाही सूर शिवसैनिकांमध्ये आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी आमदार के. पी. पाटील हे उमेदवारीसाठी मुंबईतील मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. जागावाटप झाल्यानंतर पुन्हा भेटण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत. अशी माहिती ही सांगण्यात येत आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्याकडून वैयक्तिक गाठीभेटी आणि प्रचार दौरे सुरू आहेत. या भेटीदरम्यान खासगीमध्ये उमेदवारी आपल्यालाच मिळाली असल्याचा दावा ते करत असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत युती धर्म मोडून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना ए वाय पाटील यांनी पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर त्यांनी हा राजकीय डाव खेळला. त्यांच्यासमोर त्यांचेच पाहुणे माजी आमदार के .पी. पाटील यांचे अडचण असल्याने त्यांनी महाविकास आघाडीसोबत संधान बांधले. मात्र उमेदवारीच्या रेसमध्ये ए. वाय. पाटलांना के पी पाटील यांचा देखील अडथळा ठरत आहे. मात्र अशा स्थितीत आपली उमेदवारी निश्चित असल्याचे ए. वाय. पाटील यांच्याकडून सांगितले जात आहे.
राधानगरीची जागा ही शिवसेनेची (यूबीटी) आहे. त्यामुळे शिवसेनेतील निष्ठावंत पदाधिकारी इच्छुक आहेत. त्यांच्याही व्यक्तिगत गाठीभेटी आणि प्रचार दौरे सुरू आहेत. पक्ष अडचणीत असताना निष्ठावंतांनीच पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख आपल्यालाच उमेदवारी देण्यात असा ठाम शब्द ते मतदारांना देत आहेत.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.