Emergency in India : आणीबाणीतील नसबंदीच्या सुरस-चमत्कारिक कथा

Indira Gandhi Emergency : प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी शिक्षण खात्याने एक परिपत्रक काढले. प्रत्येक शिक्षकाने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी गावातील दोन माणसे तयार करायची.
Indira Gandhi Emergency
Indira Gandhi EmergencySarkarnama
Published on
Updated on

कुमार सप्तर्षी

Mumbai News : आणीबाणीमध्ये आम्ही येरवडा तुरूंगात होतो. बाहेर खूप गंमतीजमती घडत होत्या. काही गोष्टी कानावर येत होत्या. प्राथमिक शाळेच्या शिक्षकांसाठी शिक्षण खात्याने एक परिपत्रक काढले. प्रत्येक शिक्षकाने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी गावातील दोन माणसे तयार करायची. हे काम त्यांना जमले नाही तर त्यांची पगारवाढ रोखली जाणार होती.

व्यक्तीच्या मनात भय निर्माण करणे हा आणीबाणीतला मुख्य कार्यक्रम होता. शिक्षकवर्ग एवढा घाबरला होता की त्यांना समोर बसलेले विद्यार्थी दिसायचेच नाहीत. इतिहास, भूगोल, गणित असे विषय शिकवणे सुचायचेच नाहीत. ते फक्त मुलांच्या डोळ्यांत रोखून पाहत अन् मनात विचार करत, की या मुलाच्या वडिलांची नसबंदी शस्त्रक्रिया झाली असेल का? नसेल तर तो माझ्या सांगण्यावरून शस्त्रक्रिया करण्यास तयार होईल का? ‘काहीही करून या महिन्यात दोन पुरुष नसबंदीसाठी गाठलेच पाहिजे. नाही तर माझ्या नोकरीचं काही खरं नाही,’ या विचारातून या काळात शिक्षक विद्यार्थ्याशी एकदम गोडीने वागू लागले. ते मुलांना गोंजारत, त्यांच्या केसातून हात फिरवत हळू नि गोड आवाजात विचारत, ‘‘तुला भाऊ किती? वडील काय करतात? तुझ्या घरी मला चहाला बोलावशील का?’’

Indira Gandhi Emergency
BJP New National President : भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? पीएम मोदी, शहांसोबतच 'या' तिसऱ्या बड्या नेत्याची भूमिका असणार महत्त्वाची

त्या काळात पंतप्रधान कार्यालयाशिवाय आणखी एक सत्ता केंद्र उगम पावले होते. इंदिरा गांधीचे पुत्र संजय गांधी समांतर पंतप्रधान कार्यालय चालवायचे. ते घटनाबाह्य सत्ताकेंद्र होते. त्यांना भारताची लोकसंख्या रोखण्यासाठी नसबंदीचे वेड लागले होते. ते मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना दमदाटी करीत. नसबंदीचा ‘कोटा’ ठरवून घेत. पोलिसांनाही तसा ‘कोटा’ दिला होता.

आमचा एक मित्र दिल्लीहून रेल्वेतून पुण्याला येत होता. अचानक एका स्थानकावर पोलिसांचा (Police) छापा पडला. त्यात बऱ्याच तरुणांना पकडले. त्यामध्ये आमचा तो मित्र असलेला कार्यकर्ताही होता. तो आक्रोश करून सांगत होता, की माझे लग्न झाले नाही. तुम्ही माझी नसबंदी केल्यास माझे लग्न कसे होईल?’ पण पोलिस काही ऐकत नव्हते. त्यांचा कोटा पुरा न झाल्याने ते वैतागलेले होते. त्यांनी त्याला जबरदस्तीने अटक करून पोलिस ठाण्यात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याची नसबंदी शस्त्रक्रिया केली. नंतर त्याला पुन्हा रेल्वेस्थानकावर सोडून दिले. तो पुण्यात आला. त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत. आम्ही तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याची नस पुन्हा जोडण्याची शस्रक्रिया करून घेतली. त्याचे लग्न झाले. दोन मुलं झाली. पण हा प्रसंग अजून आम्ही गुप्तच ठेवला आहे.

Indira Gandhi Emergency
BJP Government Favoritism: बागल, विखे पाटलांवर फडणवीस सरकारची मेहेरबानी; अशोक पवार, थोपटेंना पुन्हा डावलले

नगरला जिल्हा सरकारी रुग्णालयात पोलिसांचा छापा पडला. 75 वर्षाचा एक रूग्ण कुठल्या तरी आजारामुळे तिथे दाखल होता. पोलिसांनी आकडा पूर्ण करण्यासाठी त्यालाही ताब्यात घेतले. तो म्हातारा गमत्या होता. तो म्हणाला, की मी उखाणा घेतो, ‘देवळातल्या दत्तापुढे जळते उदबत्ती ती (बायको) गेली वरती अन मी राहिलो खालती॥’ माझी शस्त्रक्रिया करून काय उपयोग? मुल बाळ होण्याचं माझं वय संपलं.’ यावर पोलिस त्याला म्हणाले, ‘‘असू देत. आमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तू निदान एक आकडा तरी वाढवू शकतोस. त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.

Indira Gandhi Emergency
Devendra Fadnavis to Uddhav Thackeray : 'वक्फ' सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले...

पाथर्डी येथे पोलिस उपनिरीक्षकाने सगळ्या पोलिस शिपायांना नसबंदीची सक्ती केली. त्यापैकी एक जण म्हणाला, ‘साहेब मला एकच मुलगा आहे. अजून एक पाहिजे असा आमचा विचार आहे. मला माफ करा.’ पण अधिकाऱ्यांनी त्याचे ऐकले नाही. शेवटी त्याचे नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आलीच. दोन महिन्यांनी त्याच्या मुलाचा कोणत्या तरी आजारात मृत्यू झाला. तो पोलिस शिपाई आपल्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन त्याच्या साहेबाला जाब विचारायला गेला. आणीबाणीत सर्व नोकरशाहीने प्रारंभीच्या काळात धसका घेतला होता. काही काळ भ्रष्टाचार बंद होता. पण नोकरशाही बारा गावचे पाणी प्यायलेली. त्यांनी सहा महिन्याचा उपवास भरून काढण्यासाठी दुप्पट वेगाने भ्रष्टाचार सुरू केला. त्यावेळी एक वाक्य लोकांमध्ये फार प्रसिद्ध झाले होते, ‘भर दो मेरा खिसा, नही तो है तुमको ‘मिसा.’

Indira Gandhi Emergency
NCP News : नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घराणेशाही ; राहुल हंबर्डे युवकच्या प्रदेश सरचिटणीस पदी!

आमच्या तालुक्यात डुंबळाची वाडी नावाचे एक गाव आहे. साधी माणसं. त्यांनी गावात रामायण कथन सोहळा आयोजित करण्याचे ठरवले. इथपर्यंत बरं चाललं होतं. बरीच वर्गणी जमली होती. म्हणून खास पुण्यातून रामकथाकार आणायचे ठरले. रामायणाची पोथी चालू झाली. लोक रोज अंघोळ करून दारापुढे रांगोळ्या काढत. पुण्याचे रामकथाकार महाराज रामायण रंगून सांगायचे. त्यांनी रावणाच्या वधाचा मुहूर्त काढला. आठ दिवस आधी तो लोकांना सांगितला. लोकांनी आपल्या नातलगांना बोलावले. जणू खरोखर त्या दिवशी रावण मारला जाणार होता. सर्व मंडळी महाराजांची दक्षिणा व नारळ हातात घेऊन जय्यत तयारीत कथा ऐकत होते. रावण मेला म्हटले की धडाधड नारळ फोडले जाणार होते. ‘क्लायमॅक्स’ होणार होता.

Indira Gandhi Emergency
Ajit Pawar : बीडमध्ये पाऊल ठेवताच अजित पवार संतापले; म्हणाले, 'चार तास देतो...'

महाराज चतूर होते. सायंकाळी त्यांनी कथा अशीच चालू केली, की रावण खूपच सामर्थ्यवान आहे. रामाचं काही खरं नाही. नाट्यमयरीत्या कथा रंगवत ते बरोबर सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी रावण मारणार होते. लोक आतूर झाले होते. केवळ दहा मिनिटे उरली होती. तेवढ्यात तिथे सरकारी जीप आली. पोरं ओरडून सांगायला लागली, सरकारी जीप आली आहे. नसबंदी शस्त्रक्रियेसाठी लोकांना पकडून घेऊन जाणार आहे. लोक पळाले. झाडांवर चढले. या गोंधळात काहीजणांची हाडे मोडली.

Indira Gandhi Emergency
Ekanath Shinde : शिंदे सत्तेत आले खरे, पण पक्षाबाबत गाफील राहीले तर....?

पुण्याच्या महाराजांना असं का घडतंय हेच कळेना. ते म्हणाले, ‘लोकहो पळू नका. रावण मारायला वेळ लागतोय. म्हणून तुम्ही पळताय का? मी पुण्याचा आहे. मी मुहूर्त अलीकडे आणतो. आणि आधीच रावणाला मारतो. पण लोकांमध्ये इतके भय निर्माण झाले होते की ते पाठमोरे म्हणाले, ‘बुवा, आता रावण मरू दे नाही तर राम मरू दे. आम्हाला काहीही चालेल. पण आम्हाला नसबंदी नको. आम्हाला पळून जाऊ दे.’ हुकूमशहांमध्ये पोथी रामाची असली तरी रावण मरणार हे पूर्वनिश्‍चित असते. पण वेळ अशी आली की लोकांना काही देणे-घेणे नसते. हे या कथेचे सार.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Indira Gandhi Emergency
Dhananjay Munde : अजित पवार बीडमध्ये पण धनंजय मुंडे कुठे? बैठकीला राहणार अनुपस्थित

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com