

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सत्तेशी दोन हात करणारे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू अखेर शिवसेनेत गेले. आमदार-खासदार पळविणे किंवा पक्ष फोडणे याला ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणण्याच्या काळात त्यांच्या पक्षप्रवेशाचे विशेष नवल राहिलेले नाही. त्यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठली असली तरी ही केवळ क्षणिक प्रतिक्रिया आहे; कारण लोकांनाही आता अशा गोष्टींचा लवकरच विसर पडतो. मात्र, या काळोखात पक्षनिष्ठेचा आणि वैचारिक बांधिलकीचा दीप तेवत ठेवणारी बोटावर मोजण्याइतकीच नावे राजकारणात उरली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप हे त्यांपैकी एक नाव. सत्तेचे मोहपाश त्यांच्या वैचारिक निष्ठेला कधीच शिवू शकले नाहीत. म्हणूनच हा लेखप्रपंच.
सन २०२४ च्या निवडणुकीत राजुरा मतदारसंघात तिरंगी लढतीत त्यांचा पराभव झाला. यावेळी ‘चौथा’ उमेदवार आमच्यासमोर होता, तो म्हणजे 'पैसा’, या शब्दांत त्यांनी पराभवाची कारणमीमांसा केली. कोणताही उमेदवार निवडून आला तरी जीवनात फरक पडणार नाही, असा समज असणारे मतदार प्रत्येक मतदारसंघात असतात. मजुरीवर काम करणाऱ्या या माणसांसाठी मतदानाच्या आदल्या रात्री मिळणारे हजार-दोन हजार रुपये मोठी रक्कम असते. त्यात मतदारांचा दोष नाही, पण एक दिवस ही परिस्थिती बदलेल; आपला संघर्ष सुरूच ठेवायचा, हा अॅड. चटप यांचा आशावाद आजही कायम आहे. पण ही त्यांची शेवटची निवडणूक होती.
सन १९९०-९५, १९९५-१९९९ आणि २००४ ते २००९ या काळात चटप यांनी राजुरा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तत्पूर्वी १९९९ मध्ये त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. या चारही निवडणुका त्यांनी शेतकरी संघटनेकडूनच लढल्या. त्यानंतर २००९ ते २०२४ या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी २ निवडणुकांत त्यांना पराभव पत्करावा लागला. मागील २५ वर्षांपासून ॲड. चटप यांच्याकडे कोणतेही घटनात्मक पद नाही, तरीही ते मिळवण्यासाठी त्यांनी कधी कोणाचे उंबरठे झिजवले नाहीत. उलट, सत्तेचे मोठे प्रस्ताव वैचारिक बांधिलकीमुळे फेटाळून लावले.
२००४ मध्ये शरद पवार यांनी त्यांना सरकारमध्ये कृषिमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र, शेतकरी संघटनेची वैचारिक बैठक वेगळी असल्याने त्यांनी सत्तेत जाण्यास नकार दिला. दुसरी मोठी संधी २००९ च्या लोकसभेत चालून आली. भाजपने त्यांना स्वतःच्या चिन्हावर लढवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. खुद्द शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनीही त्यांना समजावले. परंतु, भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, त्यांनी संघटनेला पाठिंबा द्यावा, या आग्रहामुळे ही संधी हुकली. चटप अपक्ष लढले आणि पराभूत झाले.
२०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका ज्येष्ठ संपादकांमार्फत त्यांना काँग्रेसकडून लढण्याची विनंती केली. निवडणूक खर्चाची मोठी रसद देण्याचेही सुचवले गेले. परंतु, आयुष्यभर ज्यांच्या धोरणांविरुद्ध आंदोलने केली, त्या काँग्रेससोबत जाण्यास त्यांनी ठाम नकार दिला. याच निवडणुकीत बाळू धानोरकर चंद्रपूरचे एकमेव काँग्रेस खासदार म्हणून निवडून आले. चटप यांनी केवळ निष्ठेसाठी ती संधीही नाकारली.
२०२४ मध्ये तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना 'बीआरएस'ची धुरा सांभाळण्याची आणि राज्यातील विधानसभेच्या २४८ जागा लढवण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची ऑफर दिली. दोन दिवसांसाठी त्यांना तेलंगणात बोलावून घेतले. परंतु, चटप यांचे शेतकरी संघटनेवरील प्रेम पुन्हा एकदा आडवे आले. युती करा, पण बीआरएसचा झेंडा हाती घेणार नाही, असे त्यांनी केसीआर यांना बजावले आणि बोलणी फिसकटली.
प्रत्येक निवडणुकीत स्वतःच्या शेतजमिनीचा एक तुकडा डोळ्यासमोर कमी होत असताना त्यांचे कुटुंबिय बघत होते. राजकारण बदलत आहे, तुम्हीही बदला, हा घरचा सल्ला त्यांनी कधीच मानला नाही. त्यांच्या अट्टाहासामुळे किंवा बदलत्या राजकारणाशी जुळवून न घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांना निवडणुकीत यश मिळाले नाही, हे खरे असले तरी कोणतेही आमिष त्यांच्या निष्ठेला तडा देऊ शकले नाही. त्यांच्या छातीवरचा शेतकरी संघटनेचा 'बिल्ला' कधीच उतरला नाही.
त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असणारे बच्चू कडू आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर अॅड. चटप यांच्यासारखी माणसं अद्याप राजकीय जीवनात सक्रिय आहेत, याची आठवण होते. चटप यांच्या राजकीय भूमिका आणि वैचारिक बांधिलकीशी अनेकांचे मतभेद आहेत. परंतु त्यांच्या निष्ठेवर शंका घ्यावी इतपत उंचीचा माणूस सध्याच्या राजकारणात अपवादानेच दिसतो.
वयाच्या ७५ व्या वर्षीही ॲड. चटप रोज २०० किलोमीटरचा प्रवास करतात. निवृत्ती वेतन आणि लोकवर्गणीतून ते आजही जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. विदर्भावर झालेला अन्याय आणि शेतकरी आत्महत्यांवर ते आजही तितक्याच पोटतिडकीने बोलतात. नामांकित इंग्रजी वृत्तपत्रे वाचणारा हा जिल्ह्यातील बहुधा एकमेव नेता असावा. म्हणूनच, सकाळी माध्यमांसमोर तोंडाची वाफ सोडून रात्री सत्ताधाऱ्यांच्या पायाशी लोळण घेणाऱ्या नेत्यांपेक्षा चटप यांचे व्यक्तिमत्व उजवे ठरते. त्यांच्या सोबतच्या अनेक मोठ्या माणसांनी आपली निष्ठा बदलून सत्तेच्या दरबारात मनसबदारी स्वीकारली, पण ॲड. चटप यांनी निष्ठेची व्याख्या बदलली नाही. म्हणूनच ते आजही सार्वजनिक जीवनात ताठ मानेने उभे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.