Pune News : पोर्शे कार अपघात, ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट,ललित पाटील प्रकरण, पुण्यातील गुन्हेगारी अशा विविध विषयांवर आक्रमकपणे भूमिका मांडणं, ही सध्या काँग्रेसमध्ये असताना माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची ओळख बनली होती. मात्र, काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले रवींद्र धंगेकर सध्या 'सायलेंट मोड'वर का गेलेत ? अशी चर्चा पुणे शहराच्या राजकारणात सुरू झाली आहे.
काँग्रेसमध्ये असताना रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या वर्किंग स्टाइलपासून पोलिस, एक्साइज, महापालिका आणि अधिकाऱ्यांविरोधातील आंदोलनंही चांगलाच चर्चेचा विषय ठरत होती. त्यातूनच आक्रमकतेचा नवा धंगेकर पॅटर्न पुढे आला. पण लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पराभवाचा धक्का खाल्ल्यानंतर धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत. त्यांच्यावर शिंदेनी महानगरप्रमुखपदही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पुणे शहर गेल्या काही दिवसांत आंदेकर-कोमकर टोळीयुध्द,निलेश घायवळ यांसारख्या अनेक गुन्हेगारी घटनांनी हादरलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया होत असतानाही धंगेकर याबाबत आक्रमकपणे समोर का येत नाहीत, सत्ताधारी पक्षामध्ये गेल्यानंतर धंगेकरांचा पॅटर्न बदलला आहे का? असे देखील प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
पोर्शे कार अपघात प्रकरण आणि ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी संबंध आक्रमकपणे भूमिका मांडून सरकारला चांगलाच धारेवर धरलं होतं. तत्कालीन महायुतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांवर त्यांनी सडकून टीका केली होती. कुठेही गुन्हेगारी कारवाया झाल्यानंतर सर्वप्रथम रवींद्र धंगेकर हे त्यावर भूमिका मांडत असत. त्यावेळी ते आपण काँग्रेसचा हिरो असल्याचं सांगत पुण्यातील गुन्हेगारी विरोधात आक्रमकपणे लढणार असल्याचं सांगत होते.
मात्र सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. निलेश घायवळ टोळी, आंदेकर टोळी शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी केंद्रापासून राज्यातील वरिष्ठांना पुण्याच्या गुन्हेगारीबाबत प्रश्न रवींद्र धंगेकर करत, मात्र या सर्व प्रकरणावर सध्या ते कोणालाही प्रश्न विचारताना अथवा धारेवर धरताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये आल्यानंतर धंगेकरांचा पॅटर्न बदललाय का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला. पुण्यामध्ये एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांना पक्षांमध्ये प्रवेश देण्यात आल्या असल्याचं सांगितलं जातं. पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद मर्यादित आहे. त्यामुळे ही ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून धंगेकरांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली असल्याचे देखील सांगितलं जात होतं.
माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या माध्यमातून तब्बल 100 प्रवेश होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, अद्याप पाहिल्यास त्यांच्या माध्यमातून कोणताही पक्षप्रवेश झालेला नाही. तसेच महायुतीमध्ये येऊन देखील धंगेकर अद्यापपर्यंत मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत कुठेही पाहायला मिळाले नाहीत.
कोणत्याही राजकीय व्यासपीठावर राष्ट्रवादी अथवा भाजपाच्या नेत्यांसोबत त्यांनी व्यासपीठ शेअर केलेला नाही. तसंच कोणत्याही मित्रपक्षाच्या नेत्याची भेट घेतल्याचे देखील अद्यापपर्यंत पाहायला मिळालं नाही. त्यामुळे महायुती देखील धंगेकर हे अलिप्तच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या सायलेंट धंगेकर पॅटर्नची चर्चा राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.