
Rekha Gupta Delhi CM : दिल्लीत अडीच दशकाहून अधिक काळानंतर सत्तेत आलेल्या भाजपने अखेर दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री जाहीर केला आहे. विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला गेला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम होता. तर काही जणांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होती. त्यापैकी रेखा गुप्ता यांचेही नाव आघाडीवर असायचे. अखेर भाजपने दिल्लीत कोणतेही धक्कातंत्र न वापरता, संघटनेतील नेत्याचीच निवड केली आहे. आता 20 फेब्रुवारी रोजी रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
मात्र अनेक दिग्गजांच्या नावांना मागे टाकत, मुख्यमंत्रिपद पटकावणाऱ्या रेखा गुप्ता(Rekha Gupta) आहेत तरी कोण? त्या मूळच्या कुठल्या आहेत? , त्यांची राजकीय वाटचाल, वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, संघटनात्मक कार्य आदी सर्व काही जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.
रेखा गुप्ता दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. तसेच त्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत. 50 वर्षीय रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणामधील जींद जिल्ह्यातील नंदगढ गावात 1974मध्ये झाला होता. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर होते. 1976 मध्ये त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थलांतरित झाले. तेव्हा त्यांचे वय अवघे दोन वर्ष होते. त्यानंतर त्यांनी प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत संपूर्ण शिक्षण हे दिल्लीतच घेतले.
रेखा गुप्ता शालेय जीवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी(RSS) निगडीत असणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदशी जुडल्या गेल्या होत्या. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्या दौलत राम महाविद्यालयातील सचिव पदाची निवडणूक जिकंल्या. 1995-96मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाची निवडणूक लढली आणि अध्यक्षा झाल्या. त्यांनी पुढे एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेखा गुप्ता 2003-04मध्ये भाजप(BJP) युवा मोर्चाच्या दिल्लीतील संघटनेशी जुडल्या आणि सचिव देखील झाल्या. त्यानंतर पुढे 2004 ते 2006 पर्यंत त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली.
2007 - उत्तर पीतमपुरामधून नगरसेविका
2007-09 - एमसीडीमध्ये महिला कल्याण व बाल विकास समितीच्या दोन वर्षे अध्यक्षा
2009 - दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस
2010 - भाजपने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य बनवलं.
2015 आणि 2020 च्या निवडणुकीत नव्हते मिळाले यश
रेखा गुप्ता यांना 2015 आणि 2020 मधील विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग मतदारसंघातून तिकीट दिलं गेलं होतं. जिथे त्यांना 2015 मध्ये आम आदमी पार्टीच्या वंदना कुमारी यांनी जवळपास 11 हजार मतांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर 2020 मध्ये त्यांचे पराभवाचे अंतर हे 3400 मतांच्या जवळपास होते. मात्र 2025 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.