
अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगलीत जयंत पाटलांचा दबदबा कमी करण्याची रणनीती आखली.
निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक यांना ताकद देऊन पक्षप्रवेशांना गती मिळाली.
भाजप आणि अजित पवार यांनी सांगलीत थोरल्या साहेबांचा पक्ष रिकामा केला असून अनेकांचा ओढा या युतीकडे वळला आहे.
Sangli News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांचा सर्वात मोठा हिरमोड कुठे झाला असेल तर तो सांगली जिल्ह्यात. स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच या जिल्ह्यातील असल्याने अजित पवार यांच्यासोबत जाणे म्हणजे थेट जयंत पाटील यांच्याशी पंगा घेण्यासारखे होईल. दोघांच्या वादात आपण पडायलाच नको असे म्हणत त्यावेळी फारसे कोणी धाडस दाखवले नाही. तत्कालिन आमदार मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील यांनीही जयंत पाटील यांच्याच पाठीशी उभे राहणे पसंत केले.
पण अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत बावनकुळे या नेत्यांनी मागील अडीच वर्षांच्या काळात ठरवून जयंत पाटील यांचा दरारा कमी करण्याचा, बळ कमी करण्याचा प्रयत्न केला. निशिकांत पाटील, सम्राट महाडिक यांना ताकद दिली. हे दोघेही जयंत पाटील यांच्या हात धुवूनच मागे लागले. विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या थेट आमदारकीवरच घाव घालण्याचे नियोजन केले. अगदी थोडक्यात हे नियोजन हुकले. पाटील 13 हजाराने निवडून आले.
पण यामुळे जयंत पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसलाय हा मेसेज जिल्ह्यात गेला. त्यातच पुन्हा पूर्ण बहुमतात युतीची सत्ता आली. त्यामुळे नाराज नेत्यांनाही कॉन्फिडन्स आला. महाडिक आणि पाटील यांनी या कॉन्फिडन्सला आणखी हवा दिली आणि पक्षप्रवेशांसाठी पायघड्या घातल्या. याच जोरावर भाजप अन् अजितदादांनी जयंत पाटलांच्या नाकाखालून थोरल्या साहेबांचा पक्ष रिकामा करत आणला आहे. सत्तेत असणाऱ्या अजित पवार आणि भाजप यांच्या सध्या अनेकांचा ओढा दिसत आहे.
पक्ष फुटीच्या वेळी शरद पवार यांच्या पक्षात असलेल्या, महापौर राहिलेल्या इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादीत आणले. दिलेला शब्द पाळत त्यांना आमदार केले. एकत्रित राष्ट्रवादी असताना त्यांचे वडील इलियास नायकवडी प्रदेश उपाध्यक्ष होते. विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत भाजपबरोबर जाणे पसंत केले होते. त्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह राजेंद्र देशमुख यांनीही अजितदादांची साथ दिली. दिग्विजय सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे विष्णू माने, मैनू बागवान, अशा दिग्गजांचे ‘आऊटगोईंग’ मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र आहे.
नुकताच मोठा पक्षप्रवेश झाला तो माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश केला. वयाच्या नव्वदीमधील नेत्याच्या पक्ष प्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. डांगे यांच्या रुपाने जिल्ह्यातील एक मोठा धनगर समाजाचा चेहरा राष्ट्रवादीसोबत होता. पण डांगे पुन्हा भाजपसोबत आले आहेत. शैक्षणिक संस्था, सूतगिरणी या सर्व गोष्टींचे पाठबळ त्यांच्यामागे आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा भाजपची वाट धरली असावी असे बोलले जाते.
याच सगळ्या पक्ष सोडून जाणाऱ्यांना वैतागून जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर "ज्यांना जायचं त्यांनी आताच जावा, ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणी कोंडी करायचा प्रयत्न करायचा नाही", असे म्हणत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकाच भाषेत तंबी दिली होती. पण नुकतंच सांगलीच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करा असा आदेश स्थानिक नेत्यांना दिले आहेत. अजितदादांच्या या आदेशात आणखी काही पक्ष प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पिक्चर अभी बाकी है...
प्र.१: अजित पवार आणि भाजप यांची सांगलीतील रणनीती काय होती?
उ.१: जयंत पाटलांचा प्रभाव कमी करून स्थानिक नेत्यांना पुढे आणण्याची.
प्र.२: भाजपने कोणाला ताकद दिली?
उ.२: निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक यांना.
प्र.३: सांगलीतील जयंत पाटलांचा प्रभाव कमी झाला का?
उ.३: अजूनही जयंत पाटील यांचा सांगलीत दबदबा कायम आहे, मात्र भाजप-एनसीपीच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.