
Malegaon Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची यंदाची निवडणूक नेहमीप्रमाणेच चुरशीची झाली. मात्र, यावेळी ही निवडणूक मागील सर्व निवडणुकांपेक्षा वेगळी आणि प्रतिष्ठेची ठरली. यावेळी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरले होते. त्यात त्यांनी अपेक्षेप्रमाणे मोठा विजयही मिळवला. त्यांचे पॅनेलही बहुमत मिळवेल, असे चित्र आहे. पण आता प्रचारादरम्यान ‘मीच अध्यक्षपदाचा चेहरा’ असे म्हटल्याप्रमाणे ते खरंच हे पद स्वीकारणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. असे असले तरी पुन्हा एका हा कारखाना ताब्यात आल्याने अजितदादांनी आपले टार्गेट निश्चित केले आहे.
अजित पवारांनीच यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यावेळी निवडणुकीच्या मैदानात चार पॅनेल होते. अजित पवारांविरोधात पारंपरिक प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे यांचा पॅनेल प्रत्येकवेळी कडवी लढत देत आला आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही पॅनेल देत रंगत आणली होती. त्यामुळे अजित पवारांनाही कारखान्याचे कार्यक्षेत्र पिंजून काढत जोरदार प्रचार केला.
प्रचारादरम्यान त्यांनी कारखान्याचा अध्यक्षपदाचा चेहरा मीच आहे, त्यामुळे माझ्याकडे बघून मतदान करा, असे आवाहन मतदारांना केले होते. तसेच विरोधकांनी तुमचा चेहरा कोण हे सांगावे, असे आव्हान दिले होते. दादांच्या अपेक्षेप्रमाणे मतदारांनीही त्यांना भरभरून मतं दिली. त्यांचा पॅनेल सत्तेत येणार, हे जवळपास निश्चित आहे. पण सत्ता मिळाल्यानंतर अध्यक्षपदी कुणीही असले तर कारखान्याचा चेहरा मोहरा बदलणार असे पक्कं आहे. तसे संकेत अजितदादांनीच दिलेत.
कारखान्याच्या निकालावर मंगळवारी रात्री मीडियाशी बोलताना एका पत्रकाराला उद्देशून अजित पवार म्हणाले की, ‘आता सगळे फोटो, परिसर बघून घे, आणि एक वर्षाने पुन्हा माझ्याकडे ये कारखाना बघायला. मी भावपण चांगला देतो. मला स्वच्छतेची नीटनेटकेपणाची, बारीकसारीक गोष्टी पाहायची आवड आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी असू शकतात.’ अजितदादा बोलले म्हणजे ते काम होणारच, अशी त्यांची ओळख आहेत. त्यांचे कारखान्यातील विजयानंतर हे पहिलेच वक्तव्य लक्ष वेधून घेणारे आहे.
आता ऊसाला चांगला भाव आणि कारखान्याचा कायापालट करायचा, हे दादांनी जणू पक्कं केलं आहे. त्यांनी पुढेही सांगितले की, ‘कारखाना नीट चालला पाहिजे. आर्थिक शिस्त असली पाहिजे. तिथे कुठलीही वेडेवाकडे प्रकार अजिबात होता कामा नयेत. प्रत्येकावर जी जबाबदारी आहे, त्याचे भान ठेऊन प्रत्येकाने वागले पाहिजे.’ कारखान्यात आर्थिक शिस्त आणण्यासाठी चुकीचे वागणाऱ्यांना एकप्रकारे त्यांनी इशाराच दिला आहे. पहिल्या वर्षातच ते कारखान्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महत्वाची पावले टाकू शकतात.
प्रचारादरम्यान सांगितल्याप्रमाणे अजित पवार कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. पण कार्यकर्ते आणि निवडून आलेल्या संचालकांच्या मनात तर दादांचे नाव असणार आहे. विजयाचा गुलाल उधळताना अजितदादाच चेअरमन होणार, असे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. पण दादांच्या मनात नेमकं काय आहे, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.