

Akola Shiv Sena News : अकोला जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे.
विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अलीकडच्या काळात सुरू केलेली संघटनात्मक पुनर्बांधणी आणि आक्रमक राजकीय हालचाल यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने बदल होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
काही वर्षांपूर्वीपर्यंत अकोला (Akola) जिल्हा हा शिवसेनेचा प्रभावी बालेकिल्ला मानला जात होता. मात्र अंतर्गत मतभेद, गटबाजी, नेतृत्वातील विसंवाद आणि संघटनात्मक कमकुवतपणामुळे पक्षाची ताकद कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. ग्रामीण भागातील शाखा निष्क्रिय होणे, स्थानिक नेतृत्वातील संघर्ष आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम याचा थेट परिणाम पक्षाच्या जनाधारावर झाल्याचे मानले जात होते.
मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेनेने (Shiv Sena) पुन्हा संघटना मजबूत करण्यासाठी आक्रमक रणनीती अवलंबल्याचे दिसत आहे. यावेळी पक्षाने केवळ पारंपरिक राजकीय समीकरणांवर भर न देता भावनिक निष्ठा, आक्रमक संघटन आणि बूथस्तरावरील मजबूत नेटवर्क या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विशेष म्हणजे पक्षाशी दीर्घकाळ निष्ठावान राहिलेल्या जुन्या नेतृत्वाला पुन्हा सक्रिय करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रभावी नेते चंद्रशेखर पांडे गुरुजी, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, गजानन पुंडकर आणि संतोषभाऊ अनासाने यांच्यासारख्या अनुभवी चेहऱ्यांनी पुन्हा संघटनात्मक कामात सक्रिय सहभाग घेतल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
या नेत्यांचा ग्रामीण भागातील मजबूत जनसंपर्क, सामाजिक प्रभाव आणि स्थानिक राजकीय समीकरणांवरील पकड आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये गावपातळीवरील संपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव हा विजयाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा ग्रामीण भागावर फोकस वाढवल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, अकोल्याच्या ग्रामीण राजकारणात आजही वैयक्तिक संपर्क, सामाजिक नातेसंबंध आणि स्थानिक नेतृत्वाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच अनुभवी नेतृत्वाला पुन्हा मैदानात उतरवण्याचा निर्णय हा शिवसेनेचा ‘ग्राउंड कनेक्ट’ मजबूत करण्याचा प्रयत्न मानला जात आहे. चंद्रशेखर पांडे गुरुजी यांची सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील ओळख, नारायणराव गव्हाणकर यांचा राजकीय अनुभव, गजानन पुंडकर यांचा स्थानिक प्रभाव आणि संतोष अनासाने यांची संघटनात्मक पकड याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, शिवसेनेने केवळ जुन्या नेतृत्वावर विसंबून न राहता नव्या पिढीला संधी देण्याची रणनीतीही स्वीकारली आहे. युवा कार्यकर्त्यांना पुढे आणत संघटनेत नव्या आक्रमकतेची भर घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. गावागावांत सुरू असलेल्या बैठका, मेळावे, शक्तिप्रदर्शन, कार्यकर्ता संवाद आणि जनसंपर्क मोहिमा यामुळे पक्ष पुन्हा सक्रिय झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
विशेषतः बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी स्वतंत्र नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुकांमध्ये बूथ मॅनेजमेंट आणि कार्यकर्त्यांची सक्रियता हा विजयाचा कळीचा मुद्दा ठरणार असल्याने शिवसेना सध्या त्या दिशेने अधिक लक्ष केंद्रीत करत असल्याचे दिसते.
यासोबतच इतर पक्षांतील नाराज कार्यकर्ते आणि स्थानिक प्रभाव असलेल्या व्यक्तींना पक्षात सामावून घेण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांत विविध भागांत झालेले पक्षप्रवेश आणि वाढलेल्या राजकीय हालचाली यामुळे शिवसेनेने दीर्घकालीन संघटनात्मक रणनीती आखल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील सामाजिक आणि जातीय समीकरणांचा बारकाईने अभ्यास करून प्रभावी स्थानिक चेहऱ्यांना पक्षात स्थान दिले जात असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या या वाढत्या हालचालींमुळे विरोधी पक्षांमध्येही अस्वस्थता वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेतील अंतर्गत गोंधळाचा फायदा घेत अनेक पक्षांनी ग्रामीण भागात आपला प्रभाव वाढवला होता. मात्र आता शिवसेना पुन्हा संघटित होत असल्याने अनेक मतदारसंघांतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारंपरिक शिवसैनिक पुन्हा सक्रिय झाले, तर आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तथापि, शिवसेनेसाठी ही पुनर्बांधणी सोपी नसल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. जुन्या आणि नव्या नेतृत्वामध्ये समन्वय राखणे, गटबाजी नियंत्रणात ठेवणे आणि स्थानिक पातळीवरील नाराजी दूर करणे ही पक्षासमोरील मोठी आव्हाने असणार आहेत. फक्त बैठका आणि शक्तिप्रदर्शनावर निवडणुका जिंकता येत नाहीत, तर जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने काम करणे आवश्यक असते.
ग्रामीण भागातील पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी आणि स्थानिक विकासाचे मुद्दे आगामी निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला संघटनात्मक ताकदीबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका घ्यावी लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेने अकोला जिल्हा प्रभारीपदाची धुरा युवा नेतृत्व ललित भाऊ वानखडे यांच्या खांद्यावर सोपवल्यानंतर संघटनेला नव्याने आक्रमक दिशा मिळाल्याचे दिसून येत आहे. युवा उद्योजक म्हणून ओळख असलेल्या ललित वानखडे यांनी पदभार स्वीकारताच जिल्हाभर बैठका, मेळावे, दौरे आणि जनसंपर्क मोहिमांचा धडाका लावल्याचे चित्र आहे.
गावोगावी शिवसैनिकांना एकत्र करत संघटना पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. विशेषतः युवा कार्यकर्त्यांना संधी देणे, बूथस्तरावर संघटन मजबूत करणे आणि ग्रामीण भागात नव्या नेतृत्वाला पुढे आणणे यावर त्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे.
आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नव्या संघटनात्मक बांधणीत ललित वानखडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आता आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेची ही नव्याने सुरू झालेली मोर्चेबांधणी प्रत्यक्ष मतदानात कितपत परिणामकारक ठरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.