
प्रकाश पाटील
Shiv Sena and Socialist Parivar : मुंबईत समाजवादी मंडळीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक तुटून पडत, तसेच डावे आणि समाजवादी पक्ष शिवसेनेचे एक नंबरचे शत्रू होते. ते एकत्र आले आहेत. आज शिवसेना खिळखिळी झाली आहे. समाजवाद्यांची ताकद राहिली नाही. आता ते दोघेही नरेंद्र मोदींविरोधात लढणार आहेत. पाहू या काय होते ते !
१९ फेब्रवारी १९६६ रोजी शिवसेनेच्या स्थापनेनंतर बरोबर चारच वर्षांनी मुंबईत कॉम्रेड कृष्णा देसाईंचा खून झाला. या घटनेनंतर पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक निवडून आले होते. कॉ. देसाईच्या पत्नीचा धक्कादायक पराभव झाला होता. हे सांगण्याचे कारण की या घटनेपासून शिवसेना आणि डावे यांच्यात संघर्ष सुरू राहिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्ट नेत्यांची तर यथेच्छ टिंगल टवाळकी केली. कम्युनिस्टांचा जो काही समाचार घ्यायचा तो बाळासाहेब आपल्या भाषणात घेत राहिले, तसेच कम्युनिस्टानीही शिवसेनेवर जितके हल्ले चढवायचे तितके चढविले. शिवसेनेच्या कार्यपद्धतीविषयी डावी मंडळी नापसंती व्यक्त करीत. हे कधी लपून राहिले नाही. हे झाले डाव्यांचे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
समाजवाद्यांविषयी शिवसेनेची तीच भूमिका होती. या मंडळीवर बाळासाहेब असेच तुटून पडत. मुंबईतील डावे आणि समाजवादी पक्ष शिवसेनेचे एक नंबरचे शत्रू होते. बाळासाहेब, त्यांचे नेते आणि शिवसैनिकांनी मृणाल गोरे असो की अहिल्या रांगणेकर. त्यांच्याविरोधात नेहमीच मोहीम सुरू ठेवली. मुंबईत शिवसेनेचा कोणताही मेळावा असो शिवसैनिक त्यांच्याविषयी शिवराळ भाषेत घोषणा देत. मुंबईत शिवसेनेने जनता पक्षाला हद्दपार केले. शिवाय गोरेगाव या बाल्लेकिल्ल्यालाही खिंडार पाडत येथे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई निवडून आले.
एकेकाळी मुंबई बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाने ओळखली जायची. पुढे बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मुंबईवर अधिराज्य गाजविले. मुंबई महापालिकेवर शिवसेनेने सातत्याने विजय मिळविला. शिवसेनेविषयी समाजवाद्यांना कधीही सहानुभूती वाटली नाही. ज्येष्ठ नेते ना. ग. गोरे यांच्या निधनानंतर सामनाचा अग्रलेख काय होता हेही आठवले. बाळासाहेबांनी प्रारंभी मराठी माणसाची नंतर हिंदुत्ववादाची भूमिका घेतली. समाजवाद्यांनी त्याला कडाडून विरोधच केला. त्यामुळे गेल्या ५८ वर्षांत शिवसेनेच्या उमेदवारांना त्यांनी कधी निवडून आणण्याचा प्रश्न नव्हता.
ठाण्यात आनंद दिघे हे समांतर सरकार चालवितात, असा आरोप डावे आणि समाजवादी सातत्याने करीत. परंतु असल्या आरोपांना आणि टीकेला शिवसेनेने कधी भीकही घातली नाही. समाजवादाच्या मुशीत तयार झालेले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि कपिल पाटील हे मुंबईत सायं. दैनिक चालवित. एकाचे महानगर तर दुसऱ्याचे आज दिनांक होते. ही दोन्ही पत्रे शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. या दोन्ही पत्रांवर शिवसेनेने हल्ले करीत राडाही केला होता. कपिल पाटील यांनी हल्ल्यानंतर मुख्य मथळा केला होता तो आजही आठवतो.
‘हल्लेखोरांनो, आम्ही तुम्हाला माफ करतो !’ निखिल वागळेंचे, तर काही विचारायलाच नको. अनेक हल्ले होऊनही वागळे डगमगले नाहीत. शिवसेनेला हे दोन्ही पत्रकार पुरून उरले होते. हा सगळा इतिहास आहे. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकीय समीकरणेही बदलली. शिवसेना-भाजपची जी भक्कम युती होती. ती आता तुटली आहे. शिवसेना फुटली. ज्या शरद पवार यांना लक्ष्य केले, त्याच राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना भाजपशी लढत आहे. कधी कोणी असे स्वप्नही पाहिले नसेल, की शिवसेना भाजपची युती तुटेल म्हणून. २०१४ नंतर देशातील राजकीय समीकरण बदलून गेले. भाजपपासून शिवसेना दूर गेल्याचा सर्वाधिक आनंद कोणाला झाला असेल, तर समाजवाद्यांना.
समाजवादी मंडळी मोदी द्वेषाने पछाडली आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत देशात भाजप नको आहे, तसेच मुंबईत मराठी माणसाच्या मागे राहण्याचा आणि उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय समाजवादी पक्षांनी घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, कपिल पाटील, निखिल वागळे, ज्ञानेश महाराव असतील. त्यांनी शिवसेनेच्या विरोधात आयुष्यभर लेखणी झिजविली. आज तीच मंडळी उद्धव ठाकरेंचे तोंड भरून कौतुक करीत आहेत. कपिल पाटील यांच्या पुढाकाराने राज्यातील २१ हून अधिक समाजवादी राजकीय पक्ष अणि संघटनांनी शिवसनेनेला पाठिंबा दिला आहे. तसा कार्यक्रमही मुंबईत पार पडला. ठाकरे आणि पाटील यांनी मोदी सरकारविरोधात लढण्याची प्रतिज्ञा केली आहे.
आज समाजवादी पक्षांची राज्यात ताकद उरली नाही. नेते आहेत, पण कार्यकर्त्यांचे नेटवर्क दिसत नाही. त्यांच्या अजूनही काही संघटना आहेत, त्यांनी मात्र एकेकाळच्या शत्रूंबरोबर मैत्रीचा हात पुढे केला आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, आम्ही हिंदुत्व सोडले नसतानाही भाजपने आमची युती तोडली आहे. संघ आणि भाजपची वाटचाल पाहिली, तर त्यांना दुसऱ्याला मोठे होऊ द्यायचे नाही. स्वातंत्र्यलढ्यात समाजवादी मंडळींनी दिलेल्या योगदानाची आठवणही त्यांनी करून दिली आहे. आज उद्धव यांचे भाषण ऐकल्यानंतर बाळासाहेबांचीही आठवण झाली. त्यांनी समाजवाद्यांचा समाचार कसा घेतला होता. भाजपबरोबर युती असताना ते काय म्हणाले होते, याचेही चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. अगदी टोकाचे मतभेद ज्यांच्याबरोबरच होते ते आज शिवसेनेचे मित्र बनले आहेत. जो भाजप-शिवसेनेचा परम मित्र होता. हिंदुत्ववादी होता. तो एक नंबरचा शत्रू बनला आहे. दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या विरोधकांची संख्या कमी झाली असे दिसते.
मुंबईत शिवसेना पुन्हा सत्तेवर आली पाहिजे, असे समाजवादी मंडळींना आज वाटते आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखंही काही नाही. कारण समाजवादी पक्षाची आणि त्यांच्या नेत्यांचा इतिहास पाहिला, तर नेहमीच भूमिका दुटप्पी राहिली आहे. केंद्रात भाजपला एकेकाळी जनता पक्षाने पाठिंबा दिला होता. जॉर्ज फर्नांडिस असो, की नितीशकुमार केंद्रातील भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. अलीकडेच कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येताच कुमारस्वामी भाजपला जाऊन मिळाले आहेत. समाजवाद्यांपेक्षा शिवसेनाही काही वेगळी नाही. त्यांनीही आजपर्यंत केलेल्या आघाड्या पाहिल्या, तर हे दोघे एकत्र आले, याचे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाहीच.
Edited By : Rashmi Mane