New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच संसदेत काँग्रेस नेते, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांच्यावर जोरदार हल्ला करत काँग्रेसची संस्कृती देशासमोर मांडली. हे करत असताना यापूर्वी मोदींनी 2019 मध्ये काँग्रेस नेते, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि शुक्रवारी थेट काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न देत मोदींनी मास्ट्ररस्ट्रोक खेळला.
एकीकडे काँग्रेसला विरोध तर दुसरीकडे सुधारणावादी काँग्रेस नेत्यांचा गौरव करत काँग्रेसलाच धक्का दिला आहे. आज हरितक्रांती जनक डाॅ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न घोषित करत आॅपरेशन फ्लडअंतर्गत स्थापन झालेल्या अमूल आणि श्वेतक्रांतीचे जनक डाॅ. वर्गीस कुरियन यांच्यासाठी भारतरत्नाची दारे खुली केली आहेत. केवळ राजकीय नेत्यांनाच भारतरत्न नाही, तर संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्याचा हा गौरव मानला जाईल.
देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतरत्न घोषित करत पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत उत्तर - दक्षिणेत पाऊल टाकले आहे. इतकेच नाही तर या वेळी त्यांनी शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्याबरोबर कृषी शास्त्रज्ञ व हरितक्रांतीचे जनक डाॅ. स्वामिनाथन यांना भारतरत्न (Bharat Ratna) घोषित केला. या गौरवाने शेतकऱ्यांविषयी सरकारची निष्ठा त्याचबरोबर जिव्हाळा वृद्धिंगत केला.
दक्षिणेतील राज्यांनी नुकतेच दिल्लीत संघटित पणे 'माझा कर माझा हक्क' असे आंदोलन केले होते. त्याला उत्तर देताना काँग्रेस नेते, देशातील आर्थिक सुधारणांचे जनक पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कार्याचा गौरव करत मोदींनी भारतरत्न घोषित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नुकतेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचादेखील लोकसभेत गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पण, मनमोहन सिंग (Manmohan Singh) हे नरसिंहराव सरकारचे अर्थमंत्री होते, म्हणून पहिले पंतप्रधानांचा भारतरत्न देत गौरव होईल असेच चित्र निर्माण केले. त्याचबरोबर अयोध्येतील राम मंदिर उभारण्यात नरसिंहराव यांची छुपी भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरली होती. त्यांनी 1991 मध्ये प्रार्थना स्थळ कायदा आणला होता. त्या कायद्याचा मोठा उपयोग अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर उभारण्यात सर्वोच्च न्यायालयात झाला.
दक्षिणेतील पंतप्रधान आणि सायंटिस्ट असे दोघांना भारतरत्न देत मोदींनी दक्षिणेतील भाजपची स्थिती सुधारण्यासाठी या राज्यांवर लोकसभेच्या दृष्टीने फोकस करणे सुरू केल्याचे चित्र आहे.
1991 मध्ये नरसिंह राव यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा देशासमोर विविध आघाड्यांवर मोठी आव्हाने होती, पण सर्वात मोठी समस्या आर्थिक संकटाची होती. राव यांना 40 वर्षांचा आमदारकीचा अनुभव होता. ते 1957 ते 1977 पर्यंत आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते आणि 1977 ते 1998 लोकसभेचे सदस्य होते. आंध्रचे मुख्यमंत्री, आरोग्य, शिक्षणमंत्री होते. इंदिरा गांधी मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री म्हणूनही काम केले. 1984 च्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवला. राजीव गांधी मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून सामील झाले.
राजीव गांधींच्या हत्येनंतर निवडणुकीच्या निकालानंतर, राव यांनी 21 जून 1991 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा ते संसदेचे सदस्य नव्हते. तथापि, काही महिन्यांनंतर त्यांनी आंध्र प्रदेशातील नंदयाल मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि जिंकले. नरसिंहराव पंतप्रधान असताना अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली. राव यांनी भारताच्या बाजारपेठा जगासाठी खुल्या केल्या, देशाच्या समृद्धी आणि वाढीसाठी एक भक्कम पाया त्यांनी घातला.
भारताचे परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्र समृद्ध करण्यात राव यांचे विशेष योगदान होते. इतकेच नाही तर विरोधातील अटलबिहारी वाजपेयी यांना संयुक्त राष्ट्र संघात पाठवून राव यानी पाकिस्तानची चांगलीच नाचक्की केली होती. इतकेच नाही तर पोखरण स्फोटानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अभिनंदन करण्यास पी. व्ही. नरसिंह राव स्वतः गेले होते हे विशेष.
भारताचे पंतप्रधान म्हणून काम केलेले दिवंगत चौधरी चरणसिंग यांना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या अविचल समर्पणाबद्दल मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारताचे गृहमंत्री या पदांवर काम केले. सिंग यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे समर्थन केले आणि राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी केलेला प्रतिकार आणि लोकशाहीप्रती त्यांची बांधिलकी संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्रोत म्हणून समोर आली आहे.
चौधरी चरण सिंग जास्त काळ पंतप्रधान नव्हते. पण, त्यांनी गरिबी कल्याणासाठी आणि शेतकरी हितासाठी केलेले कार्य अमूल्य होते. काँग्रेस सोडून भारतीय क्रांती दलाची (बीकेडी) स्थापना चौधरी चरण सिंग यांनी केली. सिंग यांनी दोनदा यूपीचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. इंदिरा गांधींच्या आणीबाणीत सिंग यांनाही एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. आणीबाणीनंतर 1977 मध्ये सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाईंच्या नेतृत्वात सिंग केंद्रीय गृहमंत्री झाले.
त्यानंतर ते उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली. सिंग यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आणि 28 जुलै 1979 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. देशात कोणी उपाशी झोपू नये, यासाठी त्यांनी राजकीय नेत्यांना आवाहन केले. चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न घोषित झाल्याने उत्तर प्रदेशातील जनतेला दिलासा देण्याचे कार्य मोदींनी केले.
बंगालच्या दुष्काळाने व्यथित झालेला एक तरुण म्हणजे डाॅ. एम. एस. स्वामिनाथन होय. या दुष्काळात अन्न नसल्याने अनेकांचे जीव गेले. त्याचे दु:ख त्यांच्या मनात सलत होते. आणि म्हणूनच कृषी क्षेत्रात क्रांती करण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या त्यांनी देशात हरितक्रांतीसाठी कष्ट घेतले. ते 'हरितक्रांतीचे जनक' म्हणून ओळखले जातात. स्वामिनाथन यांनी 1960 आणि 70 च्या दशकात शेतीमध्ये सुरू केलेल्या बदलांमध्ये प्रमुख भूमिका बजावली. पहिले तांदूळ आणि त्यानंतर गहू उत्पादनात वाढ करण्यात मोलाची भूमिका स्वामिनाथन यांची होती.
डॉ. स्वामिनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक होते. स्वामिनाथन यांनी आत्महत्यग्रस्त विदर्भात भेट शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. मोदी सरकारने त्यांची एमएसपी आणि इतर सल्ल्यांचा शेतकरी हितासाठी विचार करण्याची गरज आहे. मोदी यांनी स्वामिनाथन यांना भारतरत्न देण्याचे घोषित करत संशोधकांमध्ये शेती संशोधनाची प्रेरणा निर्माण केली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.