Mahayuti News : फोडाफोडीचा मोह आवरेना; आता सरपंच, सदस्यही महायुतीच्या रडारवर!

Sarpanch Join Mahayuti : लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला इशारा धुडकावून लावत महायुतीतील पक्षांनी फोडाफोडी सुरूच ठेवली आहे. आता ही फोडाफोडी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या पातळीवर येऊन ठेपली आहे.
ajit pawar eknath shinde devendra fadnavis
ajit pawar eknath shinde devendra fadnavissarkarnama

महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच वर्षे पक्ष, नेत्यांच्या फोडाफोडीने गाजली. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. फोडाफोडीला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपसाठी आणि महायुतीतील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेससाठी तो धक्कादायक ठरला.

त्यामुळे आता फोडाफोडी थांबेल आणि सत्ताधारी महायुती लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल, असे संकेत नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातून मिळाले होते, पण सत्ताधाऱ्यांना फोडाफोडीचा मोह आवरत नाही, असे दिसत आहे.

शिवसेनेनं ( Shivsena ) युतीतून बाहेर पडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याचा राग भाजपला होता. त्यातूनच अडीच वर्षांनंतर शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्याच्या वर्षभरानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात आली. हे कमी की काय म्हणून सत्तेची सर्व पदे उपभोगलेल्या काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला धडा शिकवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या महाराष्ट्रात जवळपास 18 प्रचारसभा झाल्या आणि महायुतीचे केवळ 17 उमेदवार विजयी झाले. फोडाफोडी आवडली नाही, असा इशारा मतदारांनी याद्वारे दिला होता. मात्र, फोडाफोडीची ही लागण आता गावपातळीपर्यंत पोहोचली आहे. खासदार संदीपन भुमरे यांनी ठाकरे गटाचे सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य फोडले आहेत.

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Mahayuti Politics : महायुतीत नेमकं काय चाललंय? अजितदादांच्या मंत्र्याला भाजप प्रवेशाचे फडणवीसांचे अप्रत्यक्ष निमंत्रण

संदीपान भुमरे हे राज्यात मंत्री होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील बिडकीन ग्रामपंचायतीची निवडणूक दीड वर्षापूर्वी झाली होती. त्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या पॅनेलचा पराभव झाला होता. सरपंच ठाकरे गटाचा निवडून आला होता. भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील ही ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. त्यामुळे हा पराभव भुमरे यांच्या जिव्हारी लागला होता. बिडकीनच्या सरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी खासदार भुमरे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. 'बिडकीनच्या विकासासाठी शिंदे गटात प्रवेश करत आहे,' असे सांगायला हे सरपंचही विसरले नाहीत.

पक्षांची, नेत्यांची फोडाफोडी आता गाव पातळीपर्यंत आली आहे. आमदार, खासदार, माजी मुख्यमंत्र्यांप्रमाणेच आता सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनाही 'विकास' कळू लागला आहे, त्याची परिभाषा कळू लागली आहे, कुठे गेल्यानंतर 'विकास' होईल, हेही कळू लागले आहे! गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फुटले. कधी हिंदुत्वासाठी तर कधी विकासासाठी भाजपसोबत गेल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितले.

'विकासासाठी सरकारमध्ये सहभागी व्हावे लागले,' असे अजितदादा पवार यांनीही वारवांर सांगितले. हाच कित्ता आता सरपंच आणि ग्रामसेवकही गिरवत आहे. 'विकासा'बाबत नेत्यांमध्ये कधी नव्हे इतकी 'जागरूकता' गेल्या पाच वर्षांत आली, हे महाराष्ट्र पाहतो आहे. पक्ष बदलून सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांनी किती आणि कुणाचा 'विकास' केला, याचे खरेतर सामाजिक लेखापरीक्षण व्हायला हवे.

2109 च्या निवडणुकीत शिवसेना - भाजप युतीने लोकसभेच्या 41 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने जिंकलेल्या नवनीत राणा या नंतर भाजपच्या गोटात गेल्या होत्या. त्यामुळे युतीच्या खासदारांची संख्या 42 झाली होती. 2024 च्या निवडणुकीत भाजपसोबत एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि त्यांचे प्रत्येकी 40 आमदार आणि बहुतांश खासदार होते. असे असतानाही भाजपला 9, एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला 7 आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा जिंकता आली. याचा अर्थ स्पष्ट आहे, मतदारांना फोडाफोडी आवडलेली नाही. ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती. भाजपच्या हे लक्षात आले होते. राज्य विधीमंडळात नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंबही उमटले, मात्र त्याच्या दोन दिवसांतच खासदार भुमरे यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य फोडल्याची बातमी आली!

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Ladli Behna Yojana Maharashtra : '17' ची किमया भारी, म्हणून महायुती सरकारला आठवली 'लाडकी बहीण'

महायुतीकडून फोडाफोडी यापुढेही सुरूच राहील, असे दिसत आहे. विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर असताना मतदारांना यापुढेही गृहीत धरण्याची चूक सत्ताधाऱ्यांना महागात पडू शकते. दिग्गज नेते एकीकडे आणि मतदार, दुसरीकडेच, असे चित्र लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले आहे. अनेक मतदारसंघांत महायुतीकडे दिग्गज नेते एकवटले होते. त्यात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचाही समावेश होता. त्या नेत्यांचे मतदारांनी काहीएक ऐकले नाही. अशा नेत्यांना महायुतीच्या उमेदवारांना आपल्या गावांतूनही मताधिक्य देता आले नाही. भाजपवासी झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाली. संदेश स्पष्ट होता, इशारा स्पष्ट होता. नेते तो समजून घेणार नसतील, तर विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे, मतदारांना पुन्हा एक संधी उपलब्ध होणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com