
Bihar Politics : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएसह इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरून आघाडीने वातावरण तापवले आहे. तर एनडीएकडून आतापर्यंत विकासाचा मुद्दा पुढे रेटला जात होता. पण आता भाजपला नवा मुद्दा सापडला असून त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी प्रचाराचा अजेंडा सेट केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईविषयी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका रॅलीमध्ये अपशब्द वापरल्याचा मुद्दा सध्या बिहारच्या राजकारणात गाजत आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटकही केली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या मंचावरून आपल्या आईला शिवी देण्यात आल्याच्या मुद्दयावरून पंतप्रधान मोदींनी मंगळवारी जनतेला भावनिक साद घातली. त्यावरूनच आता एनडीएने गुरूवारी बिहार बंदची हाक दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी बिहारमधील एका योजनेच्या कार्यक्रमादरम्यान महिलांशी व्हिड़ीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘आईच्या अपमानासाठी मी राजद आणि काँग्रेसला माफ करू शकत नाही. बिहारची जनताही कधी माफ करणार नाही.’ मोदींनी ही भावनिक साद घालताच एनडीएने गुरूवारी बिहार बंदची घोषणा केली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार अधिकार यात्रेदरम्यान शिवी प्रकरणावरून स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित व्यक्तीच्या विधानाचे काँग्रेस समर्थन करत नाही, असे अनेक नेत्यांनी स्पष्ट केले आहे. पण भाजपने हाच मुद्दा आता तापवला असून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या मेहनतीवर पाणी फिरविण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे.
बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये एनडीएच्या महिला मोर्चाकडून बिहार बंदच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. आईचा अपमान बिहार सहन करणार नाही, असा संदेश देण्यात आला आहे. यावरून आता स्पष्ट झाले आहे की, राज्यातील महिलांची मते डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या आईविषय़ी अपशब्द वापरल्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचविणार आहे.
राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून बिहारमधील राजकारण फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना यशही आले. प्रामुख्याने युवक वर्गातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस पक्षाकडून संपूर्ण बिहारमध्ये मतचोरीच्या मुद्द्यावरून रान उठविले जात आहे. पण मतदार अधिकार यात्रेदरम्यान दरभंगा येथे काँग्रेस व राजदच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींच्या आईविषयी अपशब्दांचा वापर महागात पडण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांची मतदार अधिकार यात्रा संपल्यानंतर भाजपने आता हा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल यांनी तयार केलेल्या वातावरणातील हवा काढून घेण्यासाठी भाजपने ही रणनीती तयार केल्याचे मानले जात आहे. बिहारमधील अधिकाधिक महिलांपर्यंत पंतप्रधान मोदींचे कालचे भाषण पोहचविण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. बिहार बंद करून याची तीव्रता अधिक व्यापक करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. पण यानिमित्ताने चर्चाही सुरू झाली आहे की, भाजप केवळ राजकीय फायद्यासाठी या आईविषयीच्या भावनिक मुद्याचा वापर करत आहे.
पंतप्रधान मोदींच्या आईविषयी अपशब्दांचा वापर झाला असेल तर भाजपने केवळ बिहारपुरतेच आपले आंदोलन किंवा निषेधाचा बंद मर्यादित का ठेवला आहे, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. त्यातून देशात इतर कोणत्याही राज्यात बंद किंवा राज्यपातळीवर मोठ्या प्रमाणात अपशब्दांचा निषेध करणारी आंदोलने, मोर्चे झालेले दिसत नाही. त्यामुळे हा भावनिक मुद्दा बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच तापविण्याचा अजेंडा भाजपने सेट केल्याचे स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.